गुलबकावली

Photo - Google

आज सगळं आठवतय चालबाझ, लम्हे, सदमा, रूप की रानी चोरोंका राजा, इंग्लिश विंग्लिश, चांदनी, नगिना.. त्यांतल्या गाण्यावर लहानपणी नाचणारे आम्ही, त्या सार्या आठवणी तू दिल्यास आम्हांला. मला माधुरी प्राणप्रिय आहे. मी पार्शल आहे तिच्याबाबत. पण हे अमान्य करू शकत नाहीये की तू जास्त गुणाची आहेस. म्हणजे होतीस.  We will miss you.
श्रीदेवीच्या अभिनय क्षेत्रातली कारकीर्द लांब पल्ल्याची होती. इथे जरा वय झालं की हिरविणी मोडून पडतात. त्यांना बाजूला काढलं जातं. पण श्रीदेवी टफ होती. बदलणार्या काळासोबत ती बदलत राहिली. तिचं दिसणं, कपडे, मेकअप ह्या सार्यावर तिने प्रचंड मेहनत घेतली अविश्रांत. हे सारं करत असताना तिच्या मुलींसाठीही स्वप्न पाहणारी त्यांना काही घडवू पाहणारी आई होती. कपड्यांवर, राहण्यावर जगण्यावर खूप खर्च करायची असं ऐकायला यायचं. पण ते सारं वर्थ होतं. मी नाचणार. मीच मीच मीच असा काही तिचा आग्रह होता असं इंग्लिश विंग्लिश पाहताना जाणवलं नाही. तिला विषय महत्वाचे वाटू लागले होते. आपल्याकडे महाबोअर करणारे पन्नाशी ओलांडणारे हिरो आहेत. त्यांना कायम अंगाखांद्यावर खेळलेल्या आणि आता मोठ्या झालेल्या अनेक मुलींसोबत हिरो म्हणून कायम करायचं आहे. ग्लेशियर्समधे जाऊन डान्स करायचा आहे. पण ह्या सगळ्यांसमोर श्री किती वेगळी होती.. तिच्यासाठी म्हणून वेगळे विषय घेऊन सिनेमा करू पाहणार्यांचं तिच्या निधनाने फार नुकसान झालच आहे सोबत प्रेक्षकांचही.
ज्या काळात बाकी मोठे मोठे स्टार्स फॉर्मात होते तेव्हा श्रीदेवी माधुरीसारख्या स्त्रियांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. म्हातारे वाकलेले नायक आज त्यांच्या वयाला साजेश्या चांगल्या सकस भूमिका करण्यापेक्षा हिरो म्हणून नाचताना बागडताना दिसतात तेव्हा ते ह्या कलाक्षेत्राचं किती नुकसान करताहेत ह्याने त्यांना काही घंटा फरक पडत नसतो. तशात श्रीदेवीसारखं दुर्मीळ गुलबकावलीचं फूल आपल्या हाती अजूनही आहे, ती काही वेगळं करेल दणक्यात करेल अशी आशा होती. पण..
आज फेसबुक हाऊसफूल्ल आहे. कुणाला ती आवडो न आवडो पण तिची आकस्मिक एक्झिट सगळ्यांच्याच जिवाला चटका लाऊन गेली आहे हे निश्चित. आज सगळेजण फक्त श्रीदेवीकडे पाहताएत. इथे क्वचित लिहणारे येणारेही तिच्याखातर एक वाक्य लिहून जाताएत इतका धक्का दिलाय तिने जाताना. श्रीदेवी ही एक अशी गुणी नायिका होती जिच्यात वय स्वीकारून त्याला साजेश्या पण जोरदार भूमिका करण्याची ताकद होती. प्रेक्षकांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण ती चालबाझ निघाली. कदाचित तिला वय होणं मान्य नव्हतं. वृद्धत्वाचा स्वत:ला स्पर्शही करू न देता ही चांदनी आता अश्या उंचीवर जाऊन बसलीये जिथून तिला कुणीही कधीही खाली खेचू शकणार नाही.

Comments

  1. तिला विसरणे अशक्य..

    ReplyDelete

Post a Comment