देवस्वरूप

आपले जोडीदार देवस्वरूप असतात
आपण चढवलेल्या प्रेमरूपी
पंचामृताच्या फुलाची त्यांना भूल पडलेली आहे
असं ते छानच वठवतात माशाल्लाह !
आपले शंभर पापे घेत
आपले पन्नासाप्राध हे बाप्पाजी
झाकल्या मुठीत मोदकांसारखे घट्ट पकडून बसतात
मूठ जराही सैल होऊ देईत नाही
आपली सारी रहस्ये पोटात
घालून घालूनच की काय ह्या
देवांच्या ढेर्या अश्या काही सुटतात की
त्याखालचे त्यांचे मातीचे पायही त्यांस दिसेनासे होतात
पुरूष मनाने साफ व निर्मळ असतात
त्यांच मन आकाशाइतकं मोठं असतं
त्यामुळेच पक्ष्यासारखे पंख पसारून
त्यात उडण्याची चैन करता येते स्त्रियांना
पुरूष जमिनीवरूनच आकाशात उडणार्या
स्त्री पक्ष्याची पिसं एका डोळ्याने मोजू शकतात
पतीपरमेश्वर
आपले गुन्हे माफ करून आपणास
सतत गिल्ट का बरं देत असतात ?
कदाचित किमान त्याने तरी
भूतकाळातील
पापाचं प्रायश्चित्त व त्यापासून मुक्ती मिळेल
अशी समईच्या ज्योतीइतकी भाबडी मिणमिणारी
आशा त्यांना देव्हार्यात तेवत ठेवता येते असेल..
हरी हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी

Comments