आत्मा

फळ पिकण्याचीही वेळ यावी लागते
त्याने फांदीचा देठ सोडण्याची वेळ यावी लागते
नातं गोड घट्ट होण्याचीही वेळ यावी लागते
दूध विरजल्यावर त्याचं अफलातून यमयमीत
दही होण्याचीही वेळ यावी लागते
हे फटाफटवालं काम नाहीये
झाडांना लागतो तसा रीलेशनशिपलाही लागतो
मेटेनन्स
मग खाता येईल चवीने
चाखता येईल त्याची सहजचव
घाईगडबडीत
अगोड दाढुरलेला कवकवीत पांचट माल हाती लागेल
सावध


पिकलेल्या गोड फळाचा,
परिपक्व अर्थपूर्ण स्वच्छ मोकळ्या नात्याचा
सुगंध आपोआप पसरतो
तो नाकाला कळतो, डोळ्याला दिसतो, कानाला ऐकू येतो
त्याला नाक डोळे लाऊन बसायची गरज पडावी?
बाहेरून तयार वाटणारी आणि कापली की अविकलेली किडकी
नाती फटके मारून गेलेली असतात आपल्याला
तेव्हा एका टप्प्यावर यायला हवं शहाणपण
नाहीतर नशिबाने समोर आलेलं प्रत्येक फळ
तुम्ही खादाडायच्या भानगडीत
विषारी रसायनं लाऊन पिकवणार रंगवणार
आणि सडत जाणार फळाचा आत्मा.

Comments

Post a Comment