पाणी अडता कामा नये..


माणसांमध्ये जगताना आपण आपल्या आसपासच्या जगाशी तुटत जातो. तुटक व्हायला लागतो. का होतं असं..

लुप्त होण्याआधी वेदना व आनंद हे झऱ्यासारखे  वाट मिळेल तिथून बाहेर पडण्यासाठी आटापिटा करत राहतात म्हणून माणसं व्यक्त होतात. जीवनातल्या काही अतिशय महत्वाच्या आनंंदाच्या घटना जसं की मुल होणं, लग्नं होणं, पुरस्कार मिळणं, घर होणं इ. तर काहीजणं विविध कारणांनी निराश असताना एखाद्या वेदनेचा प्रवास करत असताना ती मांडत राहतात. कुणी कविता करतं, कुणी त्यावर कथा लिहतं. कुणी जे जसं आहे तसं नोंदवतं.
मनात ठेऊ नये, कुढत राहू नये, असं सांगत असतानाच हळूहळू हे गाजावाजा करतात सुखदु:खाचा असा एक सूर उमटायला लागतो. इतकं व्यक्त होण्याची लिहण्याची काय गरज असते म्हणतात, दिवसातून शंभर पोस्टी लिहण्याची काय गरज इ. इ. तुमच्या व्यक्त होण्यावरचे आक्षेप पेन्सिलीला टोक काढल्यासारखे नियमाने फिरते रहायला लागतात. 
आपल्याला वेडं ठरवणाऱ्यांबद्दलच कीव कौतुकही वाटणं बंद होतं सावकाश. त्यांनाही हवं तसं वागण्या बोलण्याची मुभा असते. पण दुसर्यांवर ओकल्याशिवाय त्यांना त्यांचा आनंद पचत नसावा. जी माणसं त्यांच जगणं लोकांसमोर खुलेआम आणतात तितक्या बिनधास्तपणे असं जमत नसलेले हे सारे प्रकार लपवाछपवी करून, चोरून करतात. त्यांना अनेकदा आपला हेवा वाटतो हे मान्य करता येत नसतं ते ज्या घोळक्यात राहतात तिथे. मग तिथली शहाणी माणसं त्यांनाही वेडं, मानसिक तोल ढळलेली म्हणायला एक सेकंदाचाही वेळ घेणार नाहीत ह्याबद्दल त्यांस खात्री असते. म्हणून मी कुठल्याही घोळक्याचा भाग बनून जात नाही. सगळ्यांत रहावं. मैत्री फक्त स्वतःशी. घोळका कुणा एकाचे स्वामित्व पत्करत नसतो. मजा येणार असेल तर ते त्या घोळक्यातल्याच कुणाचीही चड्डी खाली खेचायला मागेपुढे पहात नसतात हे तिथल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. 
आपण एकटे असतो. मग हळहळू माणसाच्या संपर्कात येऊ लागतो. बरं वाटू लागतं. खांद्यावर धीर देणार्यांचे आश्वस्त हातांचे पंजे उमटू लागतात. मग तेच पंजे सावकाश आपला गळा घोटण्यासाठी पुढे पुढे सरकू लागतात. म्हणून वाटतं आपण एकटच असावं.
जे काहीच बोलत नाहीत त्यांच्याकडे ते अतिसामान्य, गळाबचाऊ, हिशोबी, व्यक्त होण्याची क्षमता नसलेले आहेत, सगळं कळत असून मुद्दाम गप्पा राहून फक्त मजा पाहणारे अश्या पद्धतीने पाहिले जातं.
काहीजणं ते जसे असतात तसेच्या तसे काही कॅल्युलेशन्स न करता लोकांसमोर येतात. कमी किंवा भरपूर लिहतात. त्यात काही छुपा डाव नसतो. आत एक बाहेर दुसरं नसतं. तर ह्या सगळ्यावर हे भावनांचं अति प्रदर्शन, मळमळ बाहेर काढण्याचे प्रकार, आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांना फेमस होण्यासाठी विकणं, मनाचा तोल ढळलेला आहे ह्याचा किंवा हिचा, अमुक अमुक फार लिहतात किंवा ते अमुक अमुक का लिहतात ते ते टाळत नाहीत म्हणजे ते मनोरूग्ण इ. इ. सगळं सगळं बोलत राहतात. मी फेसबुकवर खूप लिहिते, दिवसाला शेकडो पोस्टस लिहिते, भावनांचं प्रदर्शन करते, माझं मानसिक संतुलन ढळलेलं आहे, फोटोग्राफर घरचा आहे म्हणून सारखे आपले फोटो टाकते, मी अमक्याच्या किंवा तावक्याच्या गटातली आहे, फोटोत बारीक दिसते पण मुळात मी फार ढोली आहे, मी फक्त दारू सिगरेट सेक्स ह्यावर लिहिते आणि त्याला स्त्रीवाद समजते, अशी बरीच चर्चा चालते. मीही जो जितका विचार करत नाही तो विचार मजविषयक काहीजण करतात, त्यावरून आपण बर्यापैकी इंटरेस्टिंग आहोत हे मला कळलय.
आपल्या समोर तोंडाला काकवी लाऊन येणारेही आपल्याविषयक सगळ्या तोंडांना बोलत राहतात. कारण ते हा सारा प्रकार जिथे करत असतात तिथे टिकून राहण्यासाठी असले फालतू म्हणत नाही पण चार चौघांना रस वाटेल असे प्रकार करत राहणं, गॉसिप करणं, कुणी फार विश्वासाने सांगितलेल्या गोष्टींची तिथे कुचेष्टा करणं, त्या सहज भेळपुरीसारख्या शेअर करणं ही त्या माणसांची गरज असते. त्याशिवाय त्यांना कुणी नाक्यावरच्या कोंडाळ्यात का बरं घेईल ?
प्रत्येकाला मत बनवण्याचा अधिकार आहे. तसंच ज्याला जे हवं ते हवं तितकं लिहण्याचा, दिसण्याचा, आपल्या आयुष्याबद्दल सीक्रेट किंवा खुलं राहण्याचा अधिकार आहे इतकच ते आहे. पण त्याबद्दलच्या चर्चा केल्याने काहींना वैचारिक मॅस्ट्रबेशन करण्याची परमानंद मिळत असेल तर आपण त्यावर हरकत घेऊ नये. आपण आपल्याला हवं तेच हवं तसं करत रहावं. सगळेच आपल्याला समजून घेऊ लागले तरीही बोअर होईल. कुणी आपल्याला अनफॉलो करणं, ब्लॉक करणं आणि तरीही आपल्याबद्दल घनघोर चर्चा करणं, आपण कटकट नको म्हणून त्यांना टाळण्याचा केलेला प्रयत्न हाही त्यांच्या पचनी न पडून त्यांना आपल्याविषयी सतत उत्सूकता वाटतेय हे सगळ्यांच्याच लक्षात येत राहणं हे फार फार भारी आहे.
गेल्या आठवड्यात काही लोकांना भेटले तेव्हा माझ्या लिखाणाबद्दल काहींना प्रश्नं होते तर काहींना माझ्या वजनाबद्दल प्रश्न पडले होते. म्हणजे मी फेसबुकवर दाखवते एक पण मुळात मी फार जाड आहे इ. असं त्या बाईंनी सांगितलं. मला काही वाईट वाटलं नाही. पण त्यांच्या मनात लिखाणाबद्दल कमी पण केवळ मला पाहण्याची आणि केवळ त्याचबद्दल बोलण्याची खुमखुमी होती, हे दिसलं. 
एकुणात लोकं बोलत राहतात. ते तसं करतच राहणार आहेत. गटारं गटारांना मिळतच राहणार आहेत. आपण नदीसारखं वाहतं राहून समुद्राला मिळावं. ते करत असताना कोण काय म्हणेल ह्याने आपल्या पात्रात गलिच्छ गाळ साचून राहता कामा नये. वाहतं पाणी अडता कामा नये. 

Comments

  1. दिलीप)राजिव साने लोकसत्ता(28-2-18)आळसावणे साहजिकचआणि स्वस्थ बसवत नाही हे ही साहजिकच.पण जेंव्हा काम करणे क्रमप्राप्त असते तेव्हां ,आपल्यालाच एरवी स्वस्थ बसवत नाही,हे आठवत नाही.

    ReplyDelete
  2. गटारं गटारांना मिळतच राहणार आहेत. आपण नदीसारखं वाहतं राहून समुद्राला मिळावं. ते करत असताना कोण काय म्हणेल ह्याने आपल्या पात्रात गलिच्छ गाळ साचून राहता कामा नये. वाहतं पाणी अडता कामा नये. हे खुप आवडल khup chan lihita mam tumhi😘😘😘😘 agadi manatl

    ReplyDelete

Post a Comment