ओकारी

एक गाढव बावळट्ट सहकारी होता. मंदाड. पण विनोदी होता. म्हणजे त्याने काही जोक मारला की सगळे ही ही ही करून हसत. मग मी पण ही ही ही. आपल्या बापाचं काय जातं.
तो माझ्यावर माफक लाईन मारे वगैरे अंदाज. पण कधी फार वाटेला गेला नाही. मग मैत्री वगैरे. पण मला नाही तो आवडायचा. मी लांबूनच हॅल्लोजी ए जी ओ जी. बस.
मग ऑफीस सुटले तेव्हा तो फोन करायचा क्वचित. तेव्हाही हो.. हो का.. असं... यांव यांव यांव यांव करून ठेऊन द्यायची फोन. आपली काय तूर डाळ नाही ना मूग डाळ. आपण चणाडाळ. गळायला कठीण.
एक दिवस फारच इमोशन झाला. मी फार उपाशी आहे म्हणू लागला. मला लगेच वाईट वाटलं. तुझी कुणी मैत्रीण मग ती मॅरीड असेल वा अनमॅरीड तीही नं माझ्याच सारखी उपाशी असेल तर मीही उपाशी आहे हे तिला नक्की सांग. मी बाकी काही अपेक्षा ठेवणार नाही. मी कधी मागे लागणार नाही. सारे सहमतीने असेल. मी तिच्या नवर्याला काही सांगणार नाही. तिला त्रास देणार नाही असं सारं सारं त्यानं मला सांगितलं. तू ओपन माईंडेड आहेस तू गैर विचार करणारी नाहीस. तू समजू शकशील असं काय काय बोलला. मी बावळट. मी अडाणी अक्कलशून्य गाढव महामूर्ख. मला खरंच वाटलं अरेरे.. काय काय प्रॉब्लेम असतात नं एकेकाचे. शिवाय हा मला किती मनापासून खरेपणाने सारे सांगतो आहे. मी ह्याच्याबद्दल फार वाईट विचार करत होते. त्याने माझ्या एका सहकारी मैत्रिणीला फार वाईट त्रास दिला होता. त्याबद्दल भयंकर राग होता माझ्या मनात. पण एखाद्याची वाईट बाजू असते पण चांगलीही बाजू असतेच की असले तुपकट विचार तेव्हाही माझ्या मनात असत आणि आजही मी अश्याच विचारांनी आणि संवेदनशीलतेने बरबटलेली आहेच.
मी त्याचे सारे ऐकून घेऊन फोन ठेवला आणि खरोखर आपल्या परिचयात अशी कोणी स्त्री आहे का असा विचारही तेव्हा केला होता. पण जी म्हणून कुणी बाई माझ्या डोळ्यासमोर आली तिला त्याच्यपर्यंत पोहोचवावं कसं श्शी तो किती घाण आहे. मी नाही हं माझ्या मैत्रिणीला त्याच्यासोबत चुम्माचाटी करू द्यायची असंही लगेच वाटे. त्यापेक्षा ती सेक्सशिवाय तडफडून मेली तरीही चालेल, असंही कायबाय वाटायचं.
ए बावळटा.. तुला कुणी हवं असेल तर तुझी तू बाई शोध हं, हे अस्सं लगेच मी त्याला बोलायला हवं होतं. हो. पण माझी गव्हर्मेंट ट्यूब नेहमी उशिरा पेटते.
त्यातून अलिकडे हे सारं त्याला आणि मला दोघांनाही ओळखणार्या माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं. तेव्हा ती अवाक झाली. गाढव.. अगं कश्यावरून तो तुलाच तू माझ्यासोबत झोपायला ये असं सुचवत नसेल.. अगं तो हे तुलाच का सांगत होता.. तो सहानुभूती मिळवून तुलाच पटवायला बघत होता माकडे.. आणि हे तुला कळू नये.. किस्सा म्हणून काय सांगते आहेस.. तुझाच आयटम झाला बघ.. असं सांगून ती ठो ठो हसायला लागली.
मला हे सारं ऐकून कसं तरी झालं. मी त्याच्यासोबत मला इमॅजिनही करून पाहिलं आणि ओकारी आली.

Comments