सॅक्सोफोन

झणझणीत लाल गाऊनमधली
सोनेरी केसांची चिंचोळी मुलगी
कमनीय वळणदार सॅक्सोफोन ओठांत धरून
मॉलमधे पैंशाचा एक आकडा वाजवते आहे

माझ्या पुढ्यातच बुरख्यातल्या
दोन स्त्रिया उभ्या उभ्या भान हरपून पाहताएत 
लाल परीचं प्रत्येक मदमस्त अंग
त्यांना अप्रूप वाटत असेल तिच्या स्वातंत्र्याच
ती दाखवू शकत असलेल्या अंगाच
तिच्या मेक अपचं, ती घेत असलेल्या गिरकीचं
तिच्या आसपास उभ्या असलेल्या पुरषांचं
लाल परीकडे अजिबात लक्ष नाहीये
ते वाजवताएत त्यांची त्यांची वाद्य..
ह्या सगळ्याचं अप्रूप !

लाल गाऊनमधली मुलगी
आणि बुरख्यातल्या बायका
ह्यांच्यामागे उभी आहे मी

ना मला काही संगीत वाजवता येतं
ना माझ्या आत कोणताही सूर आहे
जो बाहेर पडण्यासाठी करतोय धडपड
ना उत्सूकता ना स्व चा शोध शिल्लक

लाल परी पैशासाठी काही करण्यासाठी मजबूर 
बुरख्यातल्या स्त्रिया मजबूरच वाटतात
माझ्याकडे कोणत्याही प्रकारची
कश्याबद्दलचीही, कश्यामुळेही आलेली मजबूरी नाहीये
माझ्याकडे कोणतच स्ट्रगल नाहीये
तो स्ट्रगल शोधण्याची आग माझ्यात नाहीये
ह्याहून अधिक कीव करण्याजोगं ते काय असावं? 

Comments