दोस्त दोस्त ना रहा..


आपला काही म्याटर झाला की त्यात आपल्याबाजूने आपला आवाज उंच व्हावा म्हणून नेहमी मैत्रीत येणारे नेमके अत्ता संकट आलेलं असताना आता बाजूला झाले ह्यावरून मैत्रीची परीक्षा करणं हे मला अनाठायी जुलमाचा रामराम द्या हो, ची जबरदस्ती केल्यासारखा वाटतो.
एखाद्या म्याटरमधे पडू नये, असंही आपल्या मित्र मैत्रिणींचं मत असेल, तर त्यालाही विविध कारणं असतात. त्यासाठी त्यांना लगेच स्वार्थी ठरवणं हा स्वार्थच झाला. शिवाय कुणी मदतीसाठी आलं नाही तर त्या दोस्तांना ते लगेच ऐकवून दाखवणं, त्यांच्या प्रेमावर शंका घेणं ही हातघाई फार दु:खदायक ठरू शकते. असं ताड की फाड निष्कर्षाप्रत येऊन जो आपल्यासाठी वेळेवर धाऊन आला तोच आपला सख्खा दोस्त बाकीचे ते सगळे वरवरचे नाटक करणारे असा समज करून घेणं मला इम्यॅच्युरिटी वाटते.
माझी एक मैत्रीण होती लहान असताना. ती माझ्या घरच्यांना अजिबात आवडायची नाही म्हणजे मीच बावळट. तिला नं बॉयफ्रेंड आहे, हे मी आठवीत असताना घरी सांगण्याची काहीच गरज नव्हती. झालं आमचे पालक.. ती मुलगी भाजीपाला आहे, असा शिक्का मारून लगेच मोकळे ! ती आमच्या घरी येऊन आम्ही साध्या गप्पा मारत असलो तरीही काका शंभर वेळा फेर्या मारत.. म्हणजे ही फारच बिघडलेली आहे, असं त्यांना इतकं वाटायचं की हीच आपल्या पोरीला किसबिस करेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती की काय देवास ठाऊक !
ती फारच येडझवी होती हेही खरं आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढूही लागलं होतं. तिची अफेअर्स होत राहिली ना बाकी काय काय सगळं. ते मरो. मी काही तिच्याशी मैत्री तोडली नाही. तिचं प्रेम होतं माझ्यावर. मनाने खूप चांगली होतीच ती. काका काकू कधी कधी बडबड करत मी दुर्लक्ष करायचे.
एके दिवशी रात्री साडे नऊला घरी फोन आला. मयुरा माझ्या असाईनमेंट अपूर्ण राहिल्या आहेत. माझं उद्या सबमिशन आहे. तू त्या पूर्ण करायला मदत करायला ये. एक तर त्या इंजीनिअरिगच्या शीट्स.. त्यात मला काही इंटरेस्ट नव्हता आणि इतक्या रात्री जागरण करायला एकमेकांच्या घरी पाठवण्याचं तेव्हा पेव फुटलेलं नव्हतं. त्यातून माझे पालक... परवानगी देतील अपेक्षाच नको. काही विषय मी काका काकूंपर्यंत पोहोचवायचेच नाही. मला खात्री असायची की ते नाहीच म्हणणार. मग एक तर त्या गोष्टी मी त्यांच्यापासून लपवून करत असे तेही क्वचित म्हणजे घरात चोरून मैत्रिणींसोबत नॉनव्हेज खाणे वगैरे असले फालतू कुचुंदे उद्योग, अन्यथा जे आहे ते बाहेरच्या बाहेर सलटवून रफा दफा करून मोकळी यायची. घरापर्यंत काही मॅटर येता कामा नये, ह्याबाबत मी फार दक्ष असे. 🤪
त्यातून मज्जा करायला ते नाईट आऊट नव्हतंच तर तिचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करायला जायचं होतं, ते ऐकून तर माझ्यावर एक मोठ भिंतच कोसळेल की काय अशी भीती वाटायला लागली होती. मला लहानपणापासून स्वत:चाच अभ्यास करण्याची सवय होती. माझा अभ्यास गरजेपेक्षा जास्त पूर्ण असतो आणि मला पुढच्या सगळ्या धड्यांची उत्तरं माहीत असणंच काय ते धडेच्या धडेच पाठ असतात, असे आरोपही शाळेत होत असत. त्यामुळे अपूर्ण अभ्यास वगैरे अशी नामुष्की माझ्यावर कधी ओढावलेली नसल्यानं तसं झालं की किती दयनीय अवस्था होऊ शकते इ. समजण्याची तेव्हा माझी कुवत नव्हती. कॉलेजला गेल्यावर मी कधी अभ्यासच केला नाही. अभ्यास काय होतो वर्गात ह्याचाच मला पत्ता नसायचा त्यामुळे तिथे अपूर्ण काय राहिले आहे का, ते पूर्ण करून प्रोफेसरला दाखवायची काही गरज असते का, हे सारे प्रश्न तर अलाहिदाच. तेव्हा फक्त ब्लॅक लिस्टमधे आपलं नावं आहे का.. हे जाऊन पाहण्यापुरताच माझा कॉलेजशी संबंध होता. बाकी पूर्ण वेळ कॅंटिनाभ्यास.
पाणी पसरलं. हं तर विषय हा होता की मी तिच्या असाईनमेंट्स पूर्ण करायला जायला नकार दिला. साडेनऊ ते पावणेदहा म्हणजे डोक्यावरून पाणी. मला घनघोर झोप आलेली असायची तेव्हा. झोप आली की आपल्या बेडवर जाऊन पडायचं आणि मग मला काका पांघरूण घालणार आणि आम्ही दोघं झोपण्यापूर्वी
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला
जयाने सदा वास नामार्थ केला
जयाच्या मुखी सर्वदाना मकिर्ती
नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमूर्ती
श्री. सद्गुरू गोंदवलेकर महाराज की जै
श्री. सद्गुरू नाना महाराज की जै
श्री. सद्गुरू सर्व महाराज की जै
अशी प्रार्थना म्हणणार हे ठरलेलं असायचं. ते रीच्युअल माझ्या इतकं अंगवळणी पडलेलं होतं की त्यापुढे मला बाकी कश्याचीही शुद्ध नसायची. मैत्रिण बैत्रिण गेली तेल लावत असा काही विचार करून तेल लावून शांतपणे तेव्हा झोपी गेले असेन. ही एक प्रार्थना म्हणण्यापुरेसाच माझा काय तो बाप्पाशी संबंध होता. मग काका रोज रात्री मी झोपले की कपाळावर अलगद बोटं टेकवून अंगारा लावत. बाकी मी पहिल्यापासून अंतर्बाह्य नास्तिकच होते.
असो मग सकाळ उजाडल्यानंतर हिच्या आईचा मला फोन आला की घरी ये म्हणून. मी संध्याकाळी घरी गेले. तर दोघींचे चेहरे फुगलेले होते. तिचा चेहरा रडून सुजलेला होता. माझा कश्यात काही दोष नाही आणि मला फुकट घोडे लागणार असं दिसत होतं. मग चालू झाली बडबड.
तू तिची मैत्रीण ना गं.. तिला मदत करायला काल आली असतीस तर तिचं काम पूर्ण झालं असतं..
अहो पण काकू..
अगं मैत्रिणीच एकमेकांना मदत करतात..
अहो पण काकू..
अर्चूला किती वाईट वाटलं. मलाही वाटलं की तू येशील पण आली नाहीस..
अहो पण काकू ..
संकटात जो मदतीला येतो तोच खरा मित्र असतो..
अहो पण काकू..
अरे काकू काकू क्या कर रहा है काकू काकू, कितना बावळट है रे तू.. दे डालनेका थ्या नै एक झापडिंग तोह चड्डी गिल्ला हो जाता था नै दोनोंका. असं तिथून बाहेर पडल्यावर सारखं वाटत होतं.
'' तुमच्या मुलीने अभ्यास केला नाही. त्याला मी काय करू.. तुमची मुलगी लफडी करत फिरत असते तिला काय होतं वेळेवर सबमिशन्स पूर्ण करायला. मला नाही पाठवू शकत माझे पालक मी काय करू आणि मला कंटाळाच आला असता ते सारं करायलाही. त्यावरून मी सच्ची मैत्रीण नाही हे तुमचे बोलणे फार वाईट आहे. तुम्ही दोघी स्वार्थी आहात. बरं झालं तुम्हांला अशी मुलगी मिळाली ते. खरच बरं झालं. '' हे सारं मी घरी येऊन घुश्श्यात आरश्यासमोर बडबडले.
बाहेर आल्यावर काकूने विचारले, काय गो एकटीच काय बडबडत होतीस आतमधे..
तुला काय करायचंय, तू कश्यासाठी ऐकत होतीस दाराला कान लाऊन.. मी फणकार्याने म्हणाले. काकू फार साधी होती पण तिला माझ्या फुदफुदण्याने कळलं असेल की साला कुछ तो लोच्या हो गयेल्ला है..
तेव्हा ती हसायला लागली गालातल्या गालात. काय म्हणते तुझी मैत्रीण अर्चना.. झाली का तिची काय ती सबमिशन्स कॉलेजात.. ? तिला फार गरज होती तर तासभर जाऊन यायचं होतस, काका आले असते न्यायला तुला तिच्या घरी, हे आणि वर सांगून बसली.
परमेश्वरा... किती साधी आणि चांगल्या मनाची माणसं आहेत नं ही सारी..😨 मीच एकटी वाईट्ट वाईट्ट आहे.
मी तिला मदत केली नाही हे ठीक आहे पण त्यामुळे मी वाईट कशी.. तेही असल्या पादरट फुसकाड्या कारणांवरून.. हे लहानपणी घडलेलं. पण मोठं होऊनही ह्यात काही फार फरक पडलेला आहे असं दिसत नाही. मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी इथे लोकांना एक लहानश्या चहाच्या चमच्याइतकं कारण पुरतं. गाढव लोक्स. 

Comments

  1. Well said... too good... 👌👌👌 Started reading your blog... and now just can't resist... You are awesome.

    ReplyDelete

Post a Comment