लिहायला स्त्रिया का आढेवेढे घेतात.. का घाबरतात.. ?

मनातलं जे आहे ते व्यक्त करायला, लिहायला, बोलायला स्त्रिया का घाबरतात? कारण तिचा आवाज बंद करण्यासाठी शेवटी तिच्यासमोर नागडं नाचायला काही लोकं सुरवात करतील आणि ते दृष्य बघवणार नाही ह्याची तिला भीती वाटत असते. आपला समाज घाणेरडा, मागास आणि विकृत आहे. लिहणार्या स्त्रियांना अशक्य घाणेरड्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्यातून तिने शेणगोळे फेकणार्यांना विरोध केला तर तिच्यावर अश्लील गलिच्छ बोललं जातं. त्यालाही तिने विरोध केला तर मग, स्त्रीत्वाची ढाल करते, कश्याला बाप्यासारखी लढायची नाटकं, तू बोललीस दणकून आता झाली बरोबरी असंही म्हंटलं जातं. मग आता झालं गेलं विसर, असही सुनावलं जातं. असा प्रकार होत असताना बघे शेकोटीची भर उन्हाळ्यात ऊब घेत बसतात. कोणत्या मातीचे बनलेले असतात हे, असा प्रश्नं पडतो. आपण काही लिहलं तर त्याचा बभ्रा होईल अशी भीती अनेकींना आहे.
लिहतेस हाच तुझा गुन्हा. हाच चॉईस असेल तर मग जे वाट्याला येईल ते भोगायची तयारी ठेव, असाही कल्ला केला जातो. इतकीही सहनशीलती नाही? अशीही कातडी काढण्याची तयारी असते. हे सारं एक निमित्त होतं आणि त्याने अनेक माणसांचे चेहरे उघडे होतात आपल्यासमोर लख्ख, इतकं समाधान मात्र बाकी काही नाही तरी नक्की मिळतं.
पण हे काही स्त्रियांना झेपणारं नसतं. कारण त्याने थकवा येतो. मनातलं जे काही आहे.. त्याचा बाजार करणार लोकं ह्याची त्यांना खात्री असते. कुणी स्वत:बद्दल लिहा किंवा इतरांच्या अनुभवांवर बेतलेले. लिहणार्यांना भोसकायला मागेपुढे न पाहणारी श्वापदं समाजाला हवी आहेत. मनोरंजनासाठी. म्हणून स्त्रिया घाबरतात लिहायला. समाज असा गांडू आणि हरामी आहे म्हणून घाबरतात. इथे मोकळेढाकळेपणाचे बुरखे ओढलेले ढोंगी कधी वार करतील ह्याचा नेम नाही म्हणून घाबरतात. 

Comments