ग्रे ब्लॅक जिंदाबाद

ग्रे हा उच्च अभिरूची असलेल्या पुरषांचा आवडता रंग आहे असा निष्कर्ष नुकताच हाती आला आहे. कुणाच्या ते माहीत नाही. पण हे असं अख्ख्या जगात होत असणार. त्यामुळे १ ग्रे व १ ब्लॅक रंगाचा टीशर्ट आणि त्यातलेच विविध टिंट्स व टोन्सचे दोन शर्ट खरेदी केले की पुरूष त्यावर सहा वर्षं आरामात राहू शकतो. राखाडी आणि काळा म्हणण्याची हिमाकत करू नये कुण्या नालायकानं. हे दोन टीशर्ट किंवा शर्ट अलटून पलटून ग्रे ब्लॅक ग्रे ब्लॅक करत झोपताना, खरेदीला जाताना, प्रपोज करायला जाताना, टॉईलेटला जाताना, तो घासताना, मयताला जाताना, बारश्याला जाताना, मच्छीबाजारात सखी कोळिणीशी प्रेमालाप करताना असा सर्वत्र वापरण्याचा प्रघात आहे. कुठेही जायचं असलं की रापकन हे शर्ट घातले की चपकन निघालं.. बाकीचे रंग काय घालण्याच्या लायकीचे असतात का.. नाहीतर व्हाईट. पण ग्रे ब्लॅक पुरषांचा ऑल टाईम फेव्हरेट आहे. त्यात त्यांनी आंघोळ केली की दोन दिवसांचे पारोसे आहेत हेही काही श्याट कळत नसल्याने त्याचाही बेनिफिट मिळतोच.
घरातही तेच बाहेरही तेच. मिनिमलिस्टिक कसे जागवे ते पुरषांकडून शिकावं स्त्रियांनी. पार भोकं पडेपर्यंत ह्या रंगाचे शर्ट टीशर्ट मायेने घालून कवटाळूनही पुरषांचे मन भरत नाही तेव्हा त्यांच्या कातावलेल्या दातओठ खाणार्या बायका त्यांस धमक्या देतात.. हे दळिद्र्य घालून तू माझ्यासोबत येणार असशील तर लांबूनच चाल. रस्त्यात नवरा, बीएफ म्हणून मला ओळखही दाखवू नकोस. असे सांगितले की त्यांचं मन दुखतं. मग ते जड थरथरत्या हाताने ते दोन टीशर्ट वा शर्ट तिच्या हाती देतात. तेही प्रेमळ बायकोला पहावत नाही. पण ते त्याने पुन्हा अंगावर घालू नयेत हे मात्र तिनं नक्की केलेलं असतं. ती विरघळते. स्त्री ही कितीही रागावली तरीही ती नवर्याच्या आवडीनिवडी किती जपते हे नेहमी दिसून येतं ते असं.. निदान त्या विटलेल्या टीशर्टांचा नवर्याला अंश तरी दिसत रहावा म्हणून बायको त्यांचे कात्रीने एकसरीके तुकडे कापून धूळ पुसायला त्यांची बारकी बारकी पुसणी करते. तेही त्या पुरषांना चालतं. त्या काळ्या रंगाच्या टीशर्टची फाडून अंडरपॅण्ट, मग रूमाल, मग बारीक पुसणी आणि तीही विटली की त्याच्या निरांजनासाठी वाती केल्या तरीही ते प्रेमाने त्यांना घरात ध्रूवस्थान देतात. अश्यापद्धतीने हे दोन रंग असलेले कपडे घरातून लौकर बाहेर नाहीत ते नाहीत. ग्रे ब्लॅक जिंदाबाद. 
दुसर्या दिवशी मोठ्या लाडाने बायको, गर्लफ्रेंड आपल्या पुरषास खरेदीसाठी मॉलमधे बाजारात ढकलत ढाकलत नेते. आणि तो दिसतो.. एका ग्रे रंगाचा टीशर्ट घालून खड्या केलेल्या मरतुकड्या मॅनिक्वीनसमोर.. भान हरपलेल्या अवस्थेत. ती हतबुद्ध होते. पुन्हा बिल फाडलं जातं १ ग्रे आणि १ ब्लॅक टीशर्टवरतीच.

Comments

  1. Life is not always black and white. Hence grey rocks!

    ReplyDelete
  2. मनकवडे आहात तुम्ही !!!

    ReplyDelete
  3. जर हिकमत+हिम्मत = हिमाकत(एकदम कातील!) असेल तर नालायक कसे वा का?

    ReplyDelete
  4. ग्रे च्या फिफ्टी शेड्स असतात.
    https://en.wikipedia.org/wiki/Fifty_Shades_of_Grey

    ReplyDelete
  5. सोय महत्वाची !

    आणि ह्यात काही चूक नाही की नाही ?
    :-)

    ReplyDelete

Post a Comment