अंतर

मला काकू नेहमी सांगायची, आपण दुसर्याशी नेहमी चांगलं वागावं. त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं, ते आपल्याविरोधात काय करतात ह्याने आपल्या वागणुकीत बदल करायचा नाही. आपण त्यांच्या पातळीवर उतरायचे नाही. तिच्याशी काकांशी कोण कोण कसे कसे वागले हे मला लहानपणापासून सहाजिकच ठाऊक होते. कारण काकांना तेच तेच तेच तेच उगाळायची सवय आहे असं आम्हांला वाटे. काकू तर पार कंटाळून जायची. पण जसजशी मी मोठी होऊ लागले तेव्हा कळू लागलं की काका ज्यांच्याबद्दल पोटतिडकीने काही सांगायचे त्यांनी त्यांना फार त्रास दिला होता. ते त्यांच्या मनात फार घर करून राहिले होते म्हणून ते तो विषय सतत काढत.
त्यांच्या कष्टाच्या दिवसांत ज्यांनी त्यांना मदत केली त्यांचीही आठवण ते सतत काढत. पण क्वचित वाईट वागलेली माणसंही समोर आली तरीही त्या दोघांचे वागणे कधीही बदलले नाही. ते त्यांच्याशी सलोख्याने वागले, त्यांची आवभगत त्यांनी अगत्यपूर्वक आनंदानेच केली. ह्या सार्याचे मला विलक्षण आश्चर्य वाटते.
काकांचा जे आहे ते तिथल्या तिथे बोलण्याचा स्वभाव अनेकांना लागायचा. ते खरं आहे ते बोलायचे. कधी नको तिथेही गरज नसताना बोलायचे हेही खरं. एकदा सत्यनारायण कधी करायचा अशी चर्चा ते गाडगीळ गुरूजींशी करत असताना मी समोरच असताना काका मोठ्याने बोलले.. नको पाच तारखेला नको. तेव्हा ही बाहेरची असत्ये. असला सणकून राग आला होता तेव्हा. गुरूजी गेल्यावर मी जाम कडाडले होते त्यांच्यावर तर त्याला बरं बरं असं म्हणून त्यांनी तिथून विषयाला छान बगल दिली होती. म्हणजे हे असं नको तिथे खरं बोलणंही होतं.
जे त्यांना त्रास देतात त्यांच्यापासून लांब राहताही येईल नाही का, असं मी तेव्हा त्यांना सांगू शकले असते तर फार बरं झालं असतं. मलाही हे फार उशिराने कळलं आहे. शांतपणे अंतर वाढवता येतं. आपण एकटे पडलेलो आहो ह्याचा मागमूसही समोरच्यास लागू न देता. 

Comments

  1. असं इतकं भावबिहीन लिहितेस की तो ती प्रसंग जणू आपल्या डोळ्यासमक्ष घडतोय हा भास होतो...हॅट्स ऑफ ..👌💐

    ReplyDelete

Post a Comment