प्रॉप

तुला केवळ कवटाळून घेता यावं
ह्यासाठी तू मला हवीएस
तुझ्या वेदना, तुझं कण्हणं, किंचाळणं, हसणं
अस्ताव्यस्त होणं
श्वापदासारखं माझ्यावर एकसारखं धावून जात
तुटून पडणं आणि थकून शोध घेत राहणं मृगजळाचा
मला भीषण आवडू लागलं आहे
ह्या जवळ असण्यात तुला काही नातं नकोय
तुला काहीही प्रश्नं विचारायचे नसतात
एकही चौकशी नसते
मला पाहताच तुझ्या डोळ्यात दिसणार्या वासनेच्या
अरण्यसमुद्रातून मीच कसा काय येतो लाटेसारखा उसळून ?
का निवडलं आहेस तू मलाच ?
मी खाल्लं का आंघोळ केलीये का
मी नोकरी करतो का किती कमावतो
माझं स्वत:च घर आहे का
कोण आहेत माझे आईबाप, माझे रूट्स
ह्याची एक पैश्याची माहिती नसतानाही
तू माझ्यात नदीसारखी उतरतेस
मला समुद्र झाल्यासारखं वाटतं उगीच
दाढीतून बोटं फिरवत राहतेस
भुवयांवरून खाली उतरत जातेस
माझ्या पापण्यांना ओठांमधे घेऊन
स्पर्श करत राहतेस.. दातांना कानांच्या पाळीला
मणक्याचा सर उसवून सारे मोती उधळून टाकतेस
मला भिकारी झाल्यासारखं वाटतं
तू पुन्हा भेटशील ह्याची शाश्वती का वाटत नाही?
मला आस असते
बोटं घुसवत राहतेस अंग दुखेपर्यंत
हसत राहतेस मंदमंद ज्योतीसारखी
मेणबत्तीसारखी वितळत राहतेस
तू संपून गेल्यावर अंधारात काही शोधायचं आहे का
असे प्रश्न मला का पडत नसतात गं ?
मिठीत येऊन नातं न शोधणारी स्त्री असते ?
तू आहेस. स्त्री अशीही असू शकते ?
अनोळखी अनामिका तरीही सदा आकर्षक वाटणारी
जिवाची तगमग करून शोष पाडणारी तू
की तू डोळे उघडल्यानंतरही मला दिसणारं
दिवसरात्र कधीही उजाडणारं स्वप्नं आहेस ?
की मी एक पुरूष म्हणून वापरला जातोय
तुझ्या बंद डोळ्यांच्या आतील अंधारात प्रॉप म्हणून
तुला ऑरगॅझम येईपर्यंत..?

Comments

  1. AMAZING.... Speechless..... Mind blowing......

    ReplyDelete
  2. Intense! खूप मनस्वी , उत्कट असे काही. जे वाचून आवाका व्हायला व्हावे असे काही.

    ReplyDelete

Post a Comment