अनटायटल्ड

एखादं माणूस आपल्याला आवडू लागलं.. म्हणजे च्यायला सेक्सबिक्स मिठ्याबिठ्या लाईनवाईनसाठीच्च असं नाही.. असच जनरल तर त्याला शक्यतो कमी भेटावं, त्याला शक्यतो त्याची जास्त माहिती विचारू नये व आपल्याबद्दल काहीच वैयक्तिक फार सांगू नये. अश्यांशी फार दीर्घकाळ संबंध टिकतो. अगदी अश्या अपरिचिताच्या मिठीतही दोन घटका शांतपणे विश्वासाने विसावता येतं.
माणूस जितका आपल्याशी अपरिचित तितकच त्याच्यापाशी सेफ वाटतं. त्याला आपण आपल्या समोरच्या भिंतीसारखं वापरू शकतो. त्याला किंवा तिला आपण आपलं काही काहीही सांगू शकतो. माझ्यापाशीही कधी कुणी काही सांगितलं की मी अशी भिंत होण्याचा प्रयत्न करते. शोषून घ्यायचं.. समोरच्याला बडबडू द्यावं त्याला जे काही सांगायचं आहे ते सांगू द्यावं. मग सुट्टी घ्यायची. अजिबात जजमेंटल न होता. समोरच्याबद्दल काहीही आडाखे न बांधता. मग तो समोरचा सज्जन असेल वा नीच त्यालाही मोकळं व्हायला, बिनधास्त बोलायला एक माणूस लागतं.
आपल्याला जरा बाकीच्यांपेक्षा बरं कळेल, आपण समजू शकू असं वाटावं कुणाला तरी. तो अपरिचित असण्याचा फायदा टिकवून धरता आला पाहिजे. लगेच घुसायचं नाही. लगेच मंत्रमुग्ध होणं सहवासाने, लगेच आपल्यात काहीतरी एक नातं असेल नं नक्कीच असल्या चुतियापात घुसणं मला तर चोक अप करतं. कश्याला हवीये दोस्ती नी प्रेमाची नाती, नात्यांची बारशी. चार घटका क्वचित भेटलं, बोललं किंवा भेटून गप्प बसलं, फुटायचं. इतकंच बास असतं यार. त्यापुढे नात्याफित्याचा फार विचार करायला आणि भावनांचा चिवडा चिवाडा करायला कंटाळा येतो आयच्या गावात. एक अपरिचित कोपरा हवा असतो प्रत्येकाला रडायला, कोलायला, शिव्या घालायला, मोकळं व्हायला. आपण तसं व्हावं कुणासाठी कधीतरी.

Comments

  1. Mast !!! Very few people can play this role well and its very difficult but not impossible if tried !!

    ReplyDelete
  2. Totally agree with you Renu. अति परिचयात अवज्ञा!

    ReplyDelete

Post a Comment