गिल्ट

रात्री सगळं आठवावं
पण पिकाला पाणी मिळावं म्हणून
रात्रीच्या अंधारात आकडे टाकून
वीज चोरणारा आणि त्याच्या शॉकने उडालेला
गाभ्रीच्या पावसातला किस्ना शेतकरी आठवू नये

ओलसर दु:खांची ढेकळं झाट की जू वाटावी
ह्यासाठी आठवू नयेत रात्री
विष प्यालेल्या शेतकरी बायापोरांच्या बातम्या

रात्री तलफ आली रे आली की
हाताला मिळावी सिगारेट
पण अकारण तेव्हाच नेमकं गळफासाला लटकलेल्या शेतकर्याचे
गार्हाणी सांगण्यासाठी देवचारासारखे
बाहेर पडलेले तांबारलेले ताठ डोळे आठवू नयेत

मी खावं पोटभर किंवा फेकून द्यावं उरलेलं एका पोटभरीचं अन्न
पण ती सारी शितं काळ्या मातीतून सोन्यासारखी पिकवणार्या
शेतकर्याचं पोट जाळून काढणारी दुष्काळी भूक आठवू नये तेव्हा फक्त
डोळे बंद केल्यावर आतल्या अंधारात
बापाने विकलेल्या बैलाचे काजळभरले डोळे आठवू नयेत

रात्री मी प्यावा बर्फ स्टर करून 30 ml पेग
तेव्हा आठवू नये, जमिनी झालेल्या आहेत पाण्यासाठी मोताद
भाकरीच्या कोरड्या मुटक्यांना ओलं करण्यापुरतं घेतलेलं पेलाभर पाणी
कित्येक उपाशी लेकरांच्यामागे बसलेली आशाळभूत गिधाडं

रात्री झोप लागावी अनकट पण ती विस्कटली तरी
कर्जाखाली चेंगरून पडलेल्या शेतकरी बायांची
कुंकवाने लालेलाल झालेली घामट विस्कटलेली कपाळं आठवू नयेत

साला तेव्हा आठवू नये
आपला काही काही दोष नाहीये ह्यात
पण
फालतू आहोत आपण
साला खूप फालतू आहोत
ह्या कवितेइतकेच पोकळ आणि खोटे सुद्धा.

Comments

  1. सुरेश भटांच्या काही ओळी आठवल्या...
    "ज्यांचं सगळं काही सुरू असतं सुरळीत
    पगार-बोनस-अरिअर्स..
    सारं काही वेश्येच्या पाळीसारखं एकदम नियमित...
    त्यांना सगळं काही नीट कळतं.


    कविताही.

    ReplyDelete
  2. श्रीकांत14 March 2018 at 23:41

    शेवटच्या दोन ओळी.. खरंय

    ReplyDelete

Post a Comment