वाळूचा किल्ला

तिला तिच्या कर्माने मरू दे
त्या शांततेला भोसकू नकोस
तल्लीन होऊन शांतपणे आनंदाने
वाळूचा किल्ला बांधण्यात ती स्त्री रममाण झालेली आहे
बघवत नाही का ?

तो बांधून तिला काय मिळणार ?
त्याने तिचा काय फायदा होईल ?
मोठं होऊनही असले रिकामचोट उद्योग ?
ह्याने पैसे मिळतील का ?
सगळं काही फायद्यासाठी असतं तर
वयात आलेल्या प्रत्येक मुलानेही जबाबदारी नको म्हणून
आपल्या आईचा गळा घोटून टाकला नसता का ?

अश्या चौकश्यांची, टिकेची, प्रश्नांची
त्सूनामी तू तिच्यावर लोटल्यानेही काय होईल ?
तिच्याकडे तिने कमावलेला वा दुसर्याच
कुणीतरी तिच्यासाठी कमावून ठेवलेला
जगण्यासाठी आवश्यक इतका पैसा असेल
तुला काय घेणंदेणं ?
बघ तिच्याकडे.. जे आहे जितकं आहे त्याने
तिला हा वेळ खरेदी करता येतोय
इथे तो पैसा कुणाचा तो कुठून येतो कुणी दिला
हे महत्वाचं नाहीये खरच.
त्याने तिला वाळूचा किल्ला बनवण्यासाठी
काही तास निवांत लिबर्टी घेता येते
हे जे तिला समजलय.. तुला कधी समजेल ?

तू खूप पैसे कमावशील तू खूप फायदे तोटे बघशील
आणि एक दिवस डेबिट क्रेडिटची बॅलन्सशीट टॅली न करताच
कमावलेल्या पैश्याच्या गादीवर मरून पडशील
तीही मरेल पण मरताना
वाळूचा किल्ला बनवण्याची हौस भागवू शकलो ह्याचं समाधान खाती जमा असेल

तिच्या - तुझ्या पेशींची राख ह्याच सागरात विरघळणार
त्या राखेच्या अणूरेणूंमधूनच वाळू तयार होणार
एखादी स्त्री, एखादं मूल, एखादा आजोबा
पुन्हा त्यातूनच वाळूचा किल्ला बनवणार
तेव्हा त्या वाळूच्या भिंतीत तुला ह्याच स्त्रीसोबत मिसळून जावं लागेल
तेव्हा तुझ्या तक्रारी कुणालाही ऐकू येणार नाही
म्हणून त्या मातीत मिळायच्याआधीही सतत करायच्या नसतात
कंटाळा येतो. 

Comments