प्रार्थना

प्रत्यक्ष घाणेरडा स्पर्श करता येणार नाही
म्हणून त्या स्त्रीची शब्दांनी विटंबना करणार्या
तिचे चारित्र्यहनन करू पाहणार्या
तिच्या प्रतिमेवर डाग लावून
समाजातल्या प्रत्येक स्त्रीच्या
अस्मितेवर जणू बलात्कारच करू पाहणार्या
दहशत निर्माण करू पाहणार्या
हे नराधमा
गलिच्छ बोलत असताना
तू तिला किंवा तिच्या मुलांनाही सोडले नाहीस
मग लक्षात आलं की दैत्य भेकडही असतो
ती स्त्री मात्र प्रार्थना करेल की
तू खूप जग, निरोगी अस
तुझ्या गलिच्छ जिभेत
वळवळणारे चिकट किडे पडू नयेत
कारण ते तुझ्या मुलांना बघवणार नाही
ती स्त्री प्रार्थना करेल की
तुझ्यातला सडलेला पुरूष म्हणजे
आपला बाप आहे हे तुझ्या मुलांना
कधीकधीही कळायला नकोय
तिला तुझ्याबद्दल तीळमात्रही सहानुभूती नाही बरं
पण तिला गर्भाशयातून जन्माला येणार्या
लेकराचं रडणं सहन होत नाही
मग ते तिचं असेल किंवा तुझं
ती तुझ्यातला दैत्य मरो आणि माणूस जगो
अशीच प्रार्थना नेहमी करेल
कारण ती एक आई आहे

Comments