Being सुगरण.. एक ट्रॅप

जेवण करणं हे माझं काम नाही. स्वयंपाकघरात असले वेळखाऊ कंटाळवाणे प्रकार सारखे करून तुमच्या कौतुकाच्या पावत्या हाणायची मला अजिबात हौस नाही. तुम्ही करा मी खाते. असं सासरी गेल्यावर किती सुनांना मनात असूनही बोलता येतं? मला हवं तेव्हा मी किचनमधे येईन आणि हवं ते करीन बाकी जेवणासाठी बाई ठेवा, मला ह्यात गिनूच नका, असं किती पोरींना सांगता येईल... लग्नं झाल्यावर आपसूक सासरच्या लोकांशी जे आपल्याशी कसे वागतील हेही माहीत नसतं, ज्यांच्याशी आधी काहीच संबंध नसतो तिथे जाऊन पहिल्या दिवसापासून खपणारी स्त्री ही कौतुकास पात्र ठरते. आणि आयुष्यभर ह्या पात्राने स्वयंपाकघरात खपावे अश्या अपेक्षा असतात... मुलगी बायको म्हणून घरी आलीये तर तिचा नवरा जो की त्या घरचा मुलगा तोच टीशर्ट खोचून आधी कधीही श्याट काम केलेले नसतानाही किचनचा काही अनुभव नसतानाही आईच्या हाताखाली शिकायला म्हणून ओट्यापाशी का बरं उभा रहात नाही.. आपल्या नव्या बायकोसमोर आपले इंप्रेशन चांगले व्हावे म्हणून?
अनेकदा स्त्रियांना सासरी गेल्यावर त्या घरातला स्वयंपाकाचा जो पॅटर्न आहे त्यानुरूप जेवणास जुंपून घ्यावं लागतं. तिने स्वत:साठी काही वेगळं बनवलं, वेगळं काही खाल्लं तर तसं चालत नाही. ते सगळ्यांना चालणार आहे का.. सगळेच ते खाणार आहेत का तर बनवा, असा माज असतो. बरं सगळ्यांना न आवडणारं तिने स्वत:साठी बनवलं तरीही आडून आडून कुसके नासके सडीयल बोलले जाते. एकूणच पोटापाण्याच्या आवडीनिवडी सवयींवर गदा येते. त्यात कामाचा ताण. अनेकींची तब्बेत लग्नानंतर ह्याचमुळे खालावते. काहीजणी जाड होतात. ते लग्नं मानवते म्हणून नव्हे तर माहेरी जसे खाणे असे ते मिळत नाही त्यामुळे.
मी लग्नाआधी २५ वर्षे सातत्याने दूध पीत असे. जेवणानंतर ताक असे. तुपाची धार असेच. ते सारं बंदच झालं. लग्नानंतर नवर्याच्या हाती दूधाचा ग्लास नेऊन देण्याचे काम सासूबाई मला सांगत. पण मला दूध हवे का.. माझ्या खाण्यापिण्याचा पद्धती काय हे त्यांनी मला कधीही विचारलं नाही. असो. मग सांगितलं हा तुमचा मुलगा, हा दुधाचा ग्लास.. घ्या दोघे गोंधळ घाला. अचानक हे काम मला कसं काय लागलं? मी अशी अनेक कामं नाकारली आणि बरीच बोलणीही खाल्ली पण माझ्या भूमिकेवरून हटले नाही अजिबात. आता मात्र देते मी सगळं हातात नेऊन, तोही देतो. हे सारं रूजल्यावर हळूहळू शक्य होतं. सगळं एकानेच करायचं हे मी मोडून काढलेलं आहे. नशिबाने घरात त्याला नवर्याकडून चांगली साथ मिळाली. सगळी कामं वाटली जाऊन न बोलता चूपचाप होत राहतात. एकाने केले नाही की दुसर्याकडून ते होते. स्वयंपाकात त्याला काहीच येत नाही. पण ती सारी कसर बाकीची मदत करून साहेब इतकी भरून काढतात की मला बोलायला काही जागा उरत नाही.
कष्टाने केले तरीही कौतुकाचा शब्द निघेलच असे नाही. मी तर ह्या सगळ्याला फाट्यावर मारते. मी स्वयंपाक केला आणि कुणी कौतुक केले नाही किंवा ज्या बाईने फार कष्ट करून स्वयंपाक केला आहे तिला तो कसा झाला आहे हे जर का तिच्या नवर्याने मुलाने सांगण्याचे कष्ट घेतले नाही तर माझे डोकेच आऊट होते. असल्या माजखोरांसाठी जेवण करायचंच कश्यासाठी, असा प्रश्नं मला पडतो. रोज काय करायचं कौतुक.. रोज खाता ना आयतोबासारखे.. मग? साधा आमटीभातही काही स्त्रिया सुंदर करतात.. त्यालाही कष्ट पडतात की नाही? सांगायला नको का ते..
चांगलं झालं तर ते कश्यासाठी सांगायचं? स्वयंपाक करणार्या बाईने ते समजून जायचं.. वाईट झाला वा एखादा प्रकार बिघडला तर सांगतो, असं सांगणारे चुतिये तर प्रचंड प्रमाणात आहेत. थोबाड उचकटून झालेल्या पदार्थाची तारीफ करणं किंवा जेवण करणार्या बाईनेही सोबत बसूनच आपल्यासोबत जेवावं असा आग्रह करणं, तेव्हा प्रेमाने काही बोलणं, तेव्हा थोबाडतोंड्यासारखं तिने वाढायचं आणि आपण टीव्हीच पहायचा असा नीचपणा न करणं हे जमायला काही पैसे पडतात का.. पण नाही.. बाईने वाढायचं आणि घरातले शेख पुरूष मंडळी टीव्ही लाऊन बसणार आणि जेवणार.
स्वयंपाक कसा झाला आहे हे जर बायकोने आईने विचारले तर सांगणार. ठीक आहे चांगलं आहे बस.. झालं.. संपलं.. त्यापलिकडे.. तिच्या कष्टाचं काही मोल नसतं. टीव्ही कधीकधी सगळेच सदस्य काही महत्वाची मॅच वगैरे असेल तर त्याचा आस्वाद घेत जेवतात पण तो अपवाद झाला. पोळी नीट झाली नाही म्हणून भरलेलं ताट उचलून फेकून देणारे हरामखोरही कमी नाहीत. ह्या पुरषांच्या हे कसं लक्षात येत नाही की जी बाई आपलं पोट भरू शकते ती त्या जेवणातून आपला जीवही घेऊच शकते. शेवटी सगळ्या सुर्या तिच्याच तर हाती असतात.. 😛
बाईला जास्त त्रास द्यायचा नसतो. कौतुक करायचं, मदतही करायची, शिस्तीत रहायचं आणि तिला स्वयंपाक करता येतो वा नाही ह्यावरून तिची पात्रता ठरवण्याच्या फंदात पडण्यागोदर आपली लायकी जरूर पहायची.

Comments

  1. लाजवाब लिखाण मँम..........
    ....बरोबर WHY ONLY WOMENS ARE DONE EVERY WORK IN KITCHEN ....??

    ReplyDelete

Post a Comment