मुरांबा

दोन वाट्या हापूसच्या आंब्याच्या गराचे तुकडे
चार वाट्या साखर
केशर
वेलची दाण्यांची पोलपाट लाटण्याने केलेली भरड
धुतलेली स्वच्छ आरपार काचेची बरणी.


खूप जास्त न पिकलेले पण मस्त गोडसर वास येणारे हापूसचे गरगरीत मोठाले पिवळेधम्मक आंबे घ्या. ते प्रेमाने कापून त्याच्या गराच्या चौकोनी मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. फार बारीक फोडी करू नयेत नाहीतर मिश्रण ढवळत असताना त्या मू मू पडतात आणि वितळतात. कोय चाटून खाऊन टाकायची. कोयीपर्यंत गरीचे पातळ काप काढून मुरांब्यात मी घालत नाही. कोयीपाशी आंबा जरा जरा आंबट असतो त्यामुळं.
आता पुढे काय ब्र करावं. हममम... छान धुतलेलं चकचकीत कोणतही भांडं, कढई घ्या. त्यात आधी चार मध्यम आकाराच्या वाट्या भरून साखर ओता आणि गॅस पेटवा. साखर वितळून पूर्ण आरपार पाण्यासारखा पाक तयार झाला रे झाला की दोन मिनिटांनी त्यात आंब्याच्या केशरी फोडी सोडायच्या. काहीजणं आंब्याच्या फोडी आणि साखर सारं एकत्र करून मग ते मिश्रण ढवळायला ठेवतात. पण ते सारं ढवळत असताना आंबा पिकलेला असल्याने तो लवकर मऊ होऊन कढईत तुटून विरघळत राहतो. ते टाळण्यासाठी मी आधी साखरेला पूर्ण वितळू देते आणि मग त्यात फोडी टाकते. हे सारे मिश्रण ढवळण्यासाढी मी फोर्क वापरते.
मी मुरांबा फ्रीजमधे ठेवते. फ्रीजमधे मुरांबा ठेवल्याने तो घट्ट होतो. त्यामुळे तो करत असताना फार जास्त आटवायचा नाही नाहीतर फ्रीजमधून बरणी बाहेर काढल्यावर चमचा मुरांब्याच्या आत जाईल.. पण तो बाहेर उपसून काढावा लागेल. हॉहॉहॉ.
मुरांबा करीत असताना गॅस नक्की कधी बंद करावा, हा कळीचा प्रश्न आहे. कळीचा प्रश्न म्हणजे नेमकं काय? कळ काढण्यातली ही कळ की फुलाची कळी ह्याअर्थी हे आहे?
साखर पूर्ण वितळल्यावर जरा कढ आला की पाक व्हायला सुरवात होते. मग त्यात आंब्याच्या फोडी टाकल्यावर पुन्हा त्या आंब्याचे पाणी पाकात मिसळते आणि तो पातळ होतो. थोडा वेळ गॅस मंद ठेवला तरी चालतं. मग ढवळो बिझनेस. हे करत असताना त्यात लाडाकोडाच्या केशराच्या काड्या टाकाव्यात, दोन चार लवंगमामी ढकलाव्यात. साधारण फोडी टाकल्यावर गॅस मधेच मोठा मधेच लहान असे खेळ खेळता खेळता टाईमपास करावा. मग सार्या मिश्रणाला मस्त फेसाळ उकळी आली की दोन मिनिटांनी बंद करावं. पाक अगदी एकतारी होण्याच्या बेताला आला की बंद करावं. पूर्ण एकतार येईपर्यंत गॅसपाशी खोळंबण्याची गरज नाही. आपल्याला काय ती पूर्ण तार जुळवून वीणा वाजवायची काय?
कितीही काही म्हणा एक तार येतेय. 😜
सारं मिश्रण फोर्कनेच ढवळायचं. गॅस बंद केल्यावर मिश्रण कोमट गार झाल्यानंतर त्यात पोलपाटावर लाटण्याने बारीक केलेली वेलचीची भरड टाकायची आणि मग ते सारं ढवळून मश्तपैकी बरणीत ओतायचं. बरणीत ओतल्यावर त्यात वेलची टाकलीत व ढवळून ठेवलेत तरीही बेस्ट. मिश्रण गरम होत असताना त्यात वासाचे घटक टाकल्यावर ते तापमानामुळे जळून खाक होतात असा मी आपला समज करू घेतलेला आहे. जसे काही परफ्युम हे ज्यांचं अंग जास्त गरम असतं किंवा जे जास्त घामिष्ट असतात त्यांच्या त्वचेवर लावल्यावर ' कोण होतास तू काय झालास तू ' असे गंध द्यायला लागतात. जेवणातही असंच काही असावं असा माझा अंदाज. आम्हनून वेलची पूड, जायफळ पूड असे मादक सुगंधी जिन्नस पदार्थ ढणाणढणा उकळत असताना कधी घालत नाही. शांतपणे घालण्याच्या ह्या वस्तू आहेत.
चला झाला मुरांबा तयार. भरा बरणीत. ठेवा फ्रीजमधे बरणी. काचेच्या बरणीकडे बघत बसायचं असतं का.. कुणाचं लक्ष नसताना एकेक चमचा बरणीतून मुरांबा काढून घेत तो चमचा तोंडात ढकलून डोळे बंद करून आनंद आनंद वाटून घेण्यात किती मजाए. झालं झालं आता. इतकीच असते मुरांब्याची रेसीपी. सगळ्यांना येते. हे काही जगावेगळं सांगितलं की काय रेणके, त्यात काय एवढं... तेच तर.. जे जगाला येतं, माहीत असतं तेच मी पुन्हा पुन्हा सांगते, ह्याहून अधिक पेश्शल ते काय.. 😋😋
चला पळा आता. मी वाटीत मुरांबा घेऊन एका बोटाने चाटून चाटून स्लर्प स्लर्प असा आवाज करत खातेय. DND.


Comments