बकुळीची फुलं


अंगणात किंवा घराकडे येण्या जाण्याच्या वाटेवर बकुळीचं झाड असणं ह्यासारखं सुख नाहीये. आमच्या म्हाडा कॉलनीत फक्त अशोक अशोक अशोक. मला अशोकाचं झाडं अजिबात आवडत नाही. शोकमग्न.. सगळी पानं खाली पडल्यासारखी.. त्याची कोवळी पानं तोंडावर दाबून येता जाता शिट्या मारता येतात एवढाच काय तो उपोगाला. आमची सोसायची फार म्हणजे पारच सुंदर राखतात. कुणालाही घराच्या खिडकीत कुंड्या रोपं लावायची परवानगी नाही. डास कमी व्हावेत म्हणून आणि इमारतीचा रंग खराब होऊ नये म्हणून हे असं सारं. पण खाली कंपाऊंडमधे हे ओळीने लावलेली अशोकाची झाडं नियमाने ओळीने लाऊन काय साध्य केलं देव जाणं. सावलीसाठीही त्याचा श्याट उपयोग नाही. मग सोसायटीतल्या काही उत्साही लोकांनी सुशोभिकरणासाठी कंपाऊंडमधे मोठ्या मोठ्या कुंडया आणवून त्यात शोभेची जिथे तिथे दिसणारा चिकार रोपं लावली. त्याला रोज पाणी वगैरे.
घरात कुंडी ठेवता येत नाही मग निदान इथे जी बरीच रोपं लावण्यात आली त्यात उपयोगशून्य रोपं लाऊन ह्यांना काय मिळालं असा प्रश्न पडतो. इतक्या सगळ्या कुंड्याच कुंड्या आहेत त्यांत तुळशीची किती तरी रोपं मुबलक पाणी आणि ऊन असताना किती छान वाढली असती.. कोरफड लावता आली असती. रातराणीचे वेल चढवता आले असते. बकुळ, प्राजक्त, तगर लावता आले असते. अगदी आंब्याचं झाड लावा असं काही म्हणत नाही. पण तुळस, दुर्वा, कडिनिंब, कडिपत्ता ह्यांचा सोसायटीतल्या सगळ्यांनाच उपयोगही झाला असता, असा विचार मनात येऊन हळहळ वाटली. पण मरो कुठे कुठे बोलणार आपण अस वाटतं. जे चाललय ते चालू दे. गप्प बसते कधीकधी.
काही लोकांच्या घराखाली दारापाशी बकुळीचं भलंथोरलं झाड पाहून मन कासावीस होतं. मला फार आवडतात ही फुलं.. दादरला रानडे रोडच्या सिग्नलला एक गजरेवाला बसतो. तो ज्या किंमतीला बकुळीचा गजरा विकतो ती किंमत अदा करून गजरा विकत घेतला की त्याचा सुगंधच येईनासा होतो. बकुळीचं फुलं कशी कुणी प्रेमाने आणून देण्यासाठी, आपण जिथे जातो येतो तिथे पुडीत बांधून कुणी तरी आपल्यासाठी प्रेमाने सोडून जाण्यासाठी किंवा आपण स्वहस्ते त्या मखमली सड्यात वाकून वेचण्यासाठी आणि ती ओंजळभरून हुंगून नशा घेण्यासाठी असतात. विकत घेतलेली बकुळीचं फुलं पाहून पोटात थोडं दुखतं. तरीही मी कधी कधी विकत घेते तो गजरा..
आत्याच्या गावी चिपळूणला गेले होते लहानपणी. तेव्हा त्यांच्या इथे खेळत असताना मी एकटीच घराच्या पायर्या उतरून थोडा खाली खाली गेले तिथे एक मोठा माळ होता आणि एक भलं मोठं झाड तिथे सावली धरून पसरलं होतं. झाडाला फेर धरलेली गोल विटांची बसू शकता येईल अशी बैठक बांधलेली होती. त्यावर बसून मी असच इथे तिथे पहात असताना माझं लक्ष पायाकडे गेलं. त्यावर एक फूल पडलं होतं. टपोरं, बटणासारखं. अतिशय गोड. नवजात बाळासारखं. मग चिकार फुलं दिसली तशीच सभोवताली. त्या पखरणीत एक वेगळाच मादक गंध होता. थोडासा गोडसर शांत मधाळ गंध. त्याने त्या झाडाचं अस्तित्व मंत्रावल्यासारखं झालं होतं. मी येडी झाले. तो बकुळ फुलांचा सडा होता. मी खूप खूप फुलं गोळी केली होती बेभान होत. केवढा आनंद होता चेहर्यावर.. फ्रॉक घातलेली, दोन वेण्यांमधली मी, ते बालपण, तो क्षण मला केवळ त्या फुलांमुळे, त्या झाडापाशी बसल्यामुळे कायम लक्षात राहिला. त्यामुळे जिथे बकुळीचं झाड ते घर सुंदर असा काहीसा माझा समज आहे. वेडा असेल तरीही आहे.

Comments

  1. माझ्या कंपनीत आहे. जाम श्रीमंत वाटतं च्यायला बकुळ अशी पायाखालच्या रस्त्यावर असली की. कुणाला सुख सांगून कळतं असंही नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अहाहा.. भन्नाट फिलिंग आहे ते.

      Delete
  2. लहानपणी उन्हाळा म्हणजे भयंकर उकाडा, त्यात आई स्वैपाकघरात आकाशवाणी लावून काम करायची घामाघूम होऊन! तेव्हा ऐकलेलं गाणं "त्या बकुळीच्या झाडाखाली" मनाला थंडावा द्यायचं.. अजूनही देतं

    शनिवारवाड्यात आहेत बकुळीची झाडे.. बाकी काही नसलं तरी फक्त बकुळीसाठी मला तिथे जायला आवडतं.

    ReplyDelete
  3. माझ्या घराजवळ दोन वाटांवर दोन आहेत .आम्ही सज्जनगडला गेलेलो मी लहान असताना तिथे एक मोठं झाड होतं, तेव्हा माझी बहीण ही फुलं गोळा करून गजरे करायची आम्हाला

    ReplyDelete
  4. बकुळ फुलांचा सुगंधच दरवळतोय जणू लिखाणात...

    ReplyDelete

Post a Comment