प्यार बदनाम होने के लिये भी करना

आपल्या प्रेम प्रकरणांची नावानिशी सोशल मिडीयावर दणकून चर्चा करण्याचा प्रत्येकाला हक्क आहेच. पण त्यावरून कुणालाही खिल्ली उडवावीशी वाटली, टवाळी करावीशी वाटली आणि तीही समोर न होता आपापसात ती होत असल्यास त्यावर हरकत घेणं अयोग्य वाटतं. प्रेमप्रकरणं ही हॉट असतात. तो चर्चेचाच विषय असतो. जर तो तुम्ही स्वत:हून सगळ्याच लोकांसमोर मांडता दाखवता तर त्यावरून सगळ्यांनीच तुमच्याबाबत हाऊ क्यूट, वॉव, किती मस्त ना छाप बोलावे अश्या अवास्तव अपेक्षा कश्याला. केलत ना प्रेम, केलात की गाजावाजा तेही ही डंके की चोट पे. मग कोण आपल्याबद्दल काय बोलतं त्याने डोकं फिरवून घेण्याइतपत आपलं नातं, प्रेम उथळ बनवून घेण्यात काय हशील ? मजा मस्करी करणारे हे पूर्णपणे आपल्या वाईटावर टपलेले असतात, हा चष्मा बाजूला काढून ठेवला तर बरं होईल. आपल्या समोर वावा करणारे आपल्या परोक्ष वाट्टेल ते ऐकवणार नाही असं बोलत असतात. ते फक्त उघड होत नाही इतकच.

माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव. तिच्या लग्नाच्या वेळेस तिचीच एक जवळची मैत्रीण तिला न राहवून म्हणाली, आम्हांला वाटलं होतं बै तू छान राजबिंड्या देखण्या मुलाशी लग्न करशील. हा काय धरून आणला आहेस.
त्यावर ती शांतपणे म्हणाली, तू अगदी सगळ्या मुलींची धडकन असलेल्या मुलाशी पार पळून जात लग्नं केलस. रोज रात्री मरतेस आणि आपण हे लग्नं का करून बसलो, असं म्हणत पस्तावा करत बसतेस. चिकण्या थोबड्यांना काय तूप लागलंय? त्याने मातेरं केलच की तुझ्या आयुष्याचं.. त्यापेक्षा तुला माझ्या नवर्याचं तोंड पोतेर्यासारखं वाटतं पण ते कामाचं आहेच बयो. माझे पाय स्वच्छ राहतील कदाचित.

बोलणार्या माणसांना कधी ना कधी आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत, असा अनुभव येतो. आपण वेगळं काही सांगायची गरज उरत नाही. तसच कधी क्वचित आपल्याबद्दल झालेली मस्करी टवाळी सोडूनही देता आली पाहिजे. त्याने आपलाच वेळ बर्बाद होतो. फेसबुकसारख्या ठिकाणी तब्बेतीत होणारी मस्करी फार गांभिर्याने घ्यायची नाही. पण इथले काही कंगाल भिकारी मस्करी करत असताना जेव्हा गलिच्छतेवर उतरून येतात तेव्हा त्यांना क्वचित दणका द्यायला घाबरायचंही नाही. जिथे तिथे सहनशक्तीचा कडेलोट होणं इज आऊटडेटेड.

प्यार बदनाम होने के लिये भी करना मेरी जान
बहोत इज्जत मिलती है..

Comments