आमरस

जेवायला बसलो. समोर मोठ्ठं चकचकीत स्टीलचं पातेलं भरून हापूस आंब्याचा रस होता. आम्ही तिघे बसलो जेवायला. छोटे तात्या मधोमध. तात्या हातांनी अजिबात जेवत नाहीत. सारखी नाटकं असतात. पण बाबा फार पाघळतो आणि त्याला तात्यांना हाताने खाऊ पिऊ घालण्याचा भारी शौकसुद्धा. त्यामुळे मी त्यांच्या फंदात सहसा पडत नाही.
पण ताटावर बसल्यावरच आम्हां नवरा बायकोत एका विषयावरून आधी चर्चा, मग वाद आणि मग खडाजंगी झाली. चांगलीच. कुणीच हटायला तयार नाही. मग तात्यांनी काय गंमत केली. हळूच दोघांकडे शांतपणे पाहून अंदाज घेत हळूहळू हात पुढेपुढे सरकवत वाटीभर आमरस वाढून घेतला. पोळीच्या डब्यातून दोन पोळ्या ताटात घेतल्या आणि ताव मारायला सुरवात केली. ते लक्षात आल्यावर आम्हांला दोघांना हसायला आलं आणि आम्ही खोटं खोटं भांडण चालूच ठेवलं.
एक वाटी संपली दोन पोळ्याही संपल्या. एरव्ही चार कोंबड्या खातील इतकं सर्वत्र सांडून ठेवणार्या तात्यांना एक कणही रस न सांडवता फारच सफाईने सारे चट्टामट्टा करून टाकले. मग दुसरी वाटी भरली पाय सावकाश पसरले आणि समोर लागलेल्या टीव्हीकडेही पूर्ण दुर्लक्ष करून आमरसाने भरलेल्या वाटीकडे सारे लक्ष एकाग्र करून आईबाप गेले उडत अश्या थाटाने चमचे भरभरून रसास्वाद घेऊ लागले. आम्ही दोघेही बोलायचे थांबलोत आणि आमरस खाण्यात बुडून गेलेल्या बुटक्या माणसाकडे गंमतीने पहात बसलोय हेसुद्धा तात्यांच्या लक्षात आले नाही.

काय रे मी तू जेवल्याशिवाय कधीच जेवत नाही, तू बरा खातोयस आंब्याचा रस माझ्याशिवाय कबीर..
आरे.. तू बिझी होती ना.. बाबासुद्धा तुझ्याशी बोलत होता ना.. मला भूक लागली होती मी काय क्रू..?
मुलं कधी मोठी होतात.. कळत सुद्धा नाही. आनंदही होतो आणि कुठेतरी ती आपल्यापासून वेगळं आपलं आपलं जग उभं करू शकतात ह्याचं समाधान होत असूनही रिकामं रिकामं वाटतं.

Comments