ससा

आता ही अजून एक उलट गोष्ट. स्वयंपाक करण्याची अती हौस असलेल्या पुरषाची ही गोष्ट. कधी कधी ह्या पुरषांच्या अंगात येतं अंगात. मग ते थेट बिर्याणीच बनवतात, अधलं मधलं काहीच नाही किंवा थेट मालवणी मटण.
मी घरी येणार म्हणून माझ्या एका मित्राच्या अंगात आलं होतं. त्याची आई, बायको आणि मला त्याने स्वयंपाकघरात यायला मनाई केली होती. दोन तीन तास झाले तरी तो काही त्या मटणाच्या कहारातून बाहेर येईना. त्यात घरातली हवी असलेली आणि एरव्ही वापरात नसलेली सुरी त्याला काही मिळेना. त्याने तोंडाचा जो पट्टा चालू केला. त्याची आई जाम टेंशन मधे आली. '' काही नाही गं बंडल आहे ती सुरी. उगाच ह्याची नाटकं.. आम्ही काय रोज कांदे कापत नाही का.. पण ह्याचं मात्र भलतच. ह्याची हौस आणि आम्हांला बडबड.'', ती म्हणाली. आपण आधीच जेवण करून मोकळे झालो असतो तर इतका वेळ वाया गेला नसता असं वाटून ये रे बस रे हिच्यासोबत, ही का नेहमी येते, इथे वेळ दे, हवं तर आपण बाहेरून मागवूयात, असं काय करतो नी असं काय करतो.. त्याची बायकोही सासवेला पुस्ती जोडत होती.
ते त्याने ऐकलच.. तो तावातावाने धावत बाहेर आला.
''काय आहे ना की ह्या लोकांना जेवण करायची पॅशन नाहीये. ह्यांना काय कळणार शेफ्स नाईफ काय असते ते.. हिला दुबईवरून आणून दिली होती. त्याने ही काहीच कापत नाही. दहा वीस रूपयाची सुरी तीच हिला हवी.. ह्या लोकांना क्लासच नाहीये काही.. हे असलेच चीप आयटम वापरतात, त्यामुळे ह्यांचे पदार्थही ऑर्डिनरी होतात.'' तो तिला डिवचत होता.
एव्हाना एक कांदाही कापून झालेला नव्हता आणि सगळ्यांची तोंडं पटपट पटपट करतच होती. मी करू का आत जाऊन.. तुम्ही त्या सुरीवरून भांडत बसा, जीव घ्या एकमेकांचा मला भूक लागलीये, असं मी म्हणाल्यावर त्याची बायको फिस्सकन हसली आणि त्यावर तो अजूनच वैतागला.😀😀
मग भांड्याचा आवाज करत करत त्याचा स्वयंपाक चालू झाला.आवाज इतका की जगात ह्याच्याशिवाय अजून कुणीही कधी स्वयंपाक केलेलाच नाही. माझ्या चांगल्या किचनची आज हा वाट लावणार, त्याची आई सारखी पटरपटर करत होती. ''एवढं मोठं खोबरं घालून ठेवील आणि जाड जाड आंबोण करून ठेवील काहीतरी. ह्याचे बाबाही असच छळायचे.'' असं सगळं बोलून मुलाला डीमॉरलाईझ करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्या करत होत्याच.
त्याला तिथले बरेचसे जिन्नस सापडत नव्हते. पण कुणालाही आतच घेत नव्हता.. होपलेस माणसं आहेत घरातली. काही शिस्तच नाही. कुठलीही वस्तू कुठेही ठेऊन देतात.. बडबड चालूच.
मग अखेर जेवण तयार झाले. मटण आणि ढीगभर पाव. मी आणि त्याची बायको तयारी करायला लागलो. ताटे वाढून झाली. पहिला घास तोंडात घातला आणि माझ्या डोळ्यातून नाकातून पाणी वहायला लागलं. जाम तिखट झालं होतं मटण. सगळ्यांनी खाऊन पाहिले सगळ्यांचे शेंबूड पातळ झाले.
मग त्याची आई आणि बायको त्याला कसल्या सोडताएत..सगळ्यांनी तोंडसुख घेतले यथेच्छ. त्यातून त्याने स्वयंपाक घरात जाम राडा पसारा करून ठेवला होता. फ्रीजमधली आदल्या दिवशीची उरलेली भाजी काढून त्यासोबत पावाचे तुकडे तोडून आम्ही कसेबसे जेवलो. इतका उशीर करून ठेवला होता त्याने की कोणत्या हॉटेलातून जेवण मागवणंही दुरापास्त झालं होतं. मी चांगलीच वैतागले होते. समोर थेट शिव्या घालता येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याला व्हॉट्स अप वरून मी एक मेसेज पाठवला. '' तू चुतिया आहेस..'' त्यावर '' हो मान्य आहे.'' असा त्याचा तडक रीप्लाय आला.
स्वयंपाकघर सारे आवरून त्याची आई आली आणि तिने त्याच्या डोक्यावर कौतुकाने टपली मारली. म्हणाली.. येथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे. तो दोन दात काढून ओशाळवाणे हसला आणि मग सश्यासारखा आतल्या खोलीत पळून गेला.

Comments