आदित्य

माझा एक मित्र भारी खोडकर. लहानपणी तर डेंजरच असेल. माझ्यासमोर मिश्कील वगैरे वागे. मी नसताना हा कसा वागत असेल? मी त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीतच भेटे. मस्तीखोर मुलांची ते मोठे मोठे होतात तशी मस्तीही बदलू लागते. हा माझ्यासमोर सुतासारखा सरळ वागतो ह्याच्या मित्रांसोबत, घरी हा कसा असेल.. असे प्रश्न मला पडत. पण काल त्याच्या बायकोचा फोन आला आणि बरीचशी उत्तरं मिळाली. तिने तिच्या मुलाचे जे प्रताप मला सांगितले त्यावरून मुलाचा बाबा लहानपणी कसा होता ह्याचा साधारण अंदाज आला आणि जणू मला माझ्या मित्राचेच बालपण नव्याने अनुभवायला मिळाले.
तर मित्र त्याची बायको आणि मुलगा मुलगी एका लग्नासाठी शेवगावला गेले होते. मुलगा चार वर्षांचा. लग्न ज्या भागात होतं तिथं पाण्याचं दुर्भिक्ष्य. त्यामुळे लग्नघरी पाण्याचे मोठेमोठे जार आणलेले होते. पल्लवी, मित्राची बायको लग्नघरी कामांमधे व्यस्त होती. गावाकडे लग्नं असली की घरच्या सुनांना सारखे काम लागलेलेच असते. त्यामुळे आपण काम करत असताना आपला लेक ह्या लग्नात नक्की काय पराक्रम करणार ह्यानेच तिच्या बिचारीच्या जिवाला आधीच घोर लागला होता. त्यांची मुलगी शांत आहे.. ती अशी पराक्रमी नाही. पण मुलगा मात्र... लग्नकार्यात त्याला घेऊन जायचं म्हणजे त्याच्या आईच्या अंगावर भितीने काटाच उभा राहतो.
वय किती.. ४ वर्षं.
तर सकलजन आपापल्या कामात गर्क आहेत हे कळल्यावर त्याने सर्वप्रथम तिथल्या नुकत्याच जन्मलेल्या एक दिवसाच्या वासराकडे आपला मोर्चा वळवला. ते वासरू बाळ खाली जमिनीवर झोपलेलं होतं. बाळराजे तिथे गेले. लहान मुलांना कसली म्हणून भीती नसते. उत्सुकता ओसंडून वहात असते. परिणामांची फिकीर नसते. ते डेअर डेव्हील असतात.
वासरू शांतपणे झोपलेलं आहे हे पाहून आधी ह्या बाळराजांनी त्याच्या पोटावर डोकं ठेवलं आणि तरी वासरू काहीच करत नाही हे पाहून त्याच्या अंगावर पूर्णपणे झोपण्याचे प्रयत्न केले. मग काही लोकं धावत आली आणि बाळराजांच्या ह्या आनंदपरिक्रमेत त्यांनी अडथळे आणले. जायचं नाही हं बाळा तिथे.. त्याची आई आहे नं ती भलीमोठी हम्मा ती चिडत असती बरं का असं केल्यावर.... ती लाथ मारील... शिंग मारील... बै बै नको हं सोन्या.. लांब खेळ हं.. हे घे फूल खेळ हं.. काही समजूतदार महाबोअरिंग लोकं उगाच आपल्या मागे लागली आहेत ह्याने ते बाळ काही वेळ फुगून बसले होते. रूसून बसले होते.
मोठी माणसं निरूद्योगी असतात हे त्याला बहुदा फार लौकर कळले असावे. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून त्यानं परत आपला मोर्चा वासराकडे वळवला. ते पाहून त्याची आठ नऊ वर्षांची बहीण तिथं आली. तिने आपल्या लहान भावाला त्यानं चालवलेल्या संशोधनापासून परावृत्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. आई बाबांना हे कुटाणे सांगण्यात येतील, अशी शेवटची वॉर्निंगही तिने भावाला दिली. त्यावर बाळराजे खवळले आणि त्याने तावातावाने वासरापासून लांब होत बहिणीच्या नव्याकोर्या शरारार्यावरती हातात मावेल इतकी माती टाकली. शिवाय तिच्या पोटात गुद्दे मारून तिला बुकलून काढले आणि ये तो बस झाकी है आगे पिक्चर बहोत बाकी है; ह्याची तिथेच प्रचिती आणून दिली. ह्या प्रकाराने भेदरून गेलेली ती छोटी तिथून पळून गेली पण तिथल्याच एका झाडामागे लपून बसली. सारा आखों देखा हाल आईला सांगायचा होता मग..
तिचा शरारा मातीने पार भरून गेला होता.
आमच्या मित्राला शॉपिंगचा फार कंटाळा आहे. मग त्याची बायको मुलांना घेऊन बिचारी एकटीच बाजारात फिरून सण समारंभांसाठी कपडालत्ता घेणे त्यात वळवळ्या साखरेच्या पोत्याला सांभाळण्याची कसरत करत खरेदी आटोपण्याचे अवघड काम जिद्दीने पार पाडत असते. इथे तिथे फिरून मोठ्या हौसेने विकत घेतलेला आपला ड्रेस असा खराब झालेला पाहून छोटी सई रडवेली झाली होती. आई नक्कीच हे पाहून भडकणार आणि भावाला चांगले मोठे मोठे धम्मकलाडू मिळणार ह्याची तिला कल्पना आलीच होती. मग त्याचे अजून जास्तीचे उद्योग आईला सांगता यावेत म्हणून ती जागची हलली नाही. तिथ्थेच थांबली.
बहिणीला पिटाळून लावल्यावर बाळराज्यांनी पुन्हा ' मिशन वासरू ' हाती घेतले.
आता वासराचे तोंड नक्की कसे दिसते ह्याची पाहणी सुरू झाली. बहिणीवर माती फेकून झाल्यावर मातीने घाण झालेले हात वासराला लागू नयेत म्हणून राजेंनी ते आपल्या नव्याकोर्या झब्ब्याला पुसले. मग दोन बोटं तोंडात घालून नक्की अभ्यास कुठून सुरू करावा ह्यावर त्यांचा काही वेळ विचारमग्नतेत गेला.
मग ते वासराच्या कानापाशी आले. वासरू झोपलेलेच होते. वासराचा कान वर उचलून बघितला. व्यवस्थित मांडी घालत खाली बसून अभ्यास सुरू होता. पण तरीही नीट काही कळेना. मग आपली छोटी बोटं वासराच्या कानाच्याआत सरकवून हाती काय लागते का, ह्याचा शोध सुरू झाला. आता मात्र वासरू दचकून चांगलेच जागे झाले आणि त्याने मान हलवायला सुरवात केल्यावर घाबरलेल्या बाळराजाने तिथून धूम ठोकली.
हे सारे चालू असताना गाय काय करत होती ह्याचे डीटेल्ट उपलब्ध नाहीत.
बहिणीने ही घटना आईला तत्परतेनं सांगितल्यावर तिचे धाबे दणाणले आणि तिने नवर्याला दम भरला. ' लक्ष द्या नाहीतर आत जाऊन माझ्या जागी मदत करा.. बसलेत गप्पा हाणीत. तिथं पोरगा कुटाणे करून ठेवतोय.. आहे कुठे तुम्ही ? ' वगैरे चार तिखट शब्द सुनावल्यानं माझा मित्र जरा वरमला. त्याने आपल्या बाळाला काखोटीस मारले आणि जरा वेळ इकडे तिकडे केल्यावर पुन्हा त्याला मैदानात सोडून दिले. पुरूष किती वेळ सांभाळतात अश्या वेळी?

मिशन २
..
लग्नात पाहुण्यांना पाणी पिण्यासाठी आणलेल्या पाण्याच्या जारच्या भोवती कागदी पेले रचून ठेवलेले होते. तो फारच इंटरेस्टिंग प्रकार वाटल्याने मग बाळराजे मिशन नंबर २ कार्याला लागले. पेल्यात पाणी भरून तिथल्या मातीत टाकणे आणि मग झालेल्या चिखलात बॉल मारणे, असा D प्लॅन होता. तिथल्याच एक दोन मोठ्या दादा टाईप लोकांनी ते पाहून पुन्हा त्या कार्यात विघ्नं आणायचा वृथा प्रयत्न केल्यावर मातीने भरलेला बॉल हळूच त्यांच्या शर्टाला पुसण्याचे उद्योग झाले. हे पोरगं काही ऐकत नाही असं वाटून दादा लोकं तिथून निघून गेले. शिवाय त्यांना त्यांचे बालपण आठवले आणि ह्याला खेळू द्यावं आपण जास्त पिडू नये असा विचारही त्यांनी केला.
चिखलात बॉल मारण्याचा खेळ चांगलाच रंगात आला होता. एव्हाना तिथल्या दोन चार जारचा नळ पाणी घेण्यासाठी उघडून ते तसेच चालू ठेऊन दिल्याने तिथल्या फरशीवर बरेच पाणी साचले होते. ते पाहून; इथे कुणी म्हातारं माणूस घसरून पडेल आणि फार कुटाणे होतील बरं बाळा, अशं करू नये, शाणा ना तू... असे चार समजुतीचे बोल सांगायला गेलेल्या दोन मोठ्या बायांच्या भरजरी नव्याकोर्या साड्यांवर बाळराजेंनी कागदी पेल्यात चिखल भरून उडवला. बायका पसार झाल्या.
दुपारी जेवण करून थकून झोप काढल्यानंतर संध्याकाळी बाळराजे आदित्य जागृत झाले. आता आईच्या मोबाईलसाठी आग्रह. मग हट्ट आणि मग भोकाड पसरण्यात आले. काही झालं तरीही मोबाईल द्यायचा नाही हा आईचा अटळ मनोनिग्रह पाहून मोबाईल आणलेलाच नाही घरी विसरले आहे, ही आईने मारलेली थाप ओळखत बाळराजेंनी स्त्रियांसाठी खास ठेवलेल्या खोलीच्या दिशेनं प्रस्थान केलं. सार्या बायकांच्या साड्या, मेकअप, पर्सच्या लग्नं पसार्यातून त्याने आपल्या आईची पर्स बरोबर ओळखली आणि त्यातून मोबाईल काढला.
'' तू खोटं बोलतेस, हा मोबाईल तर आणलाय की तू इथे.. ''
आई भडकली. बाळाच्या हातून मोबाईल हिसकावण्यात आल्यावर बाळाने ब्लॅकमेल करायला सुरवात केली. तू मोबाईल जरा का मला खेळायला दिला नाही तर मी फार घाण घाण बोलीन, तुझ्या मुस्काटात मारील अश्या गोड गोड धमक्या द्यायला त्याने सुरवात केल्यावर आई अजूनच अडून बसली. मग त्याने शेवटे शस्त्र काढले.. बाळराजेंनी आईला अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला. जर तू मला गेम खेळायला मोबाईल दिला नाहीस तर तर.... तर..... मी इथे सर्वांसमोर चड्डीच काढील. बापरे.... हे ऐकून मला जाम हसू आलं होतं. असा होता तर माझा मित्र लहान असताना.. बाबाबाबा. अजब गजब.
मला हसताना पाहून मित्राची बायको म्हणाली, आहो हसताय काय.. हे म्हणतात की लहान असताना मीही असाच होतो म्हणे. थांबा हो मला आमच्या नव्या घरी जाऊ द्या.. ह्या पठ्ठ्याला एका खोलीत डांबून जाम तुडवून काढणार आहे त्याचे बाबा ऑफीसला गेले की. अत्ता मला सासू सासरे त्यांच्या नातवाला जरा फटका दिला तरी ओरडतात. नव्या घरी गेलं की त्याला बघणार आहे मी चांगलीच.
ती असं म्हणाली खरी पण नंतर स्वत:च बराच वेळ हसत होती. अशी मस्ती करणारी मुलं हवीत. त्याने आईपणही फार चांगले लक्षात राहते. आमचे तात्या जर का ह्या बाळराजेंना कधी भेटले तर दोघे मिळून काय कारवाया करतील.. हा विचार क्षणभर मनात आला आणि तेव्हा मात्र अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता.

Comments