चिंधी

घटस्फोटानंतर जे काही वाटोळे झाले ते केवळ जोडीदारामुळेच असे वारंवार सांगून लोकांकडून नक्की काय कन्फर्म करून घ्यायचे असते? आपण हलकट नाही हे? जिथे अगदी टोकाचा अत्याचार असतो, मारहाण जाळपोळ, फसवणूक इ. असते तिथेही अगदी क्वचित त्याबाबत वाच्यता करणे ठीक वाटते. अगदी ह्यात टोक गाठलेले असेल तर पुस्तकच लिहून टाकावे मग आणि ज्या मानसिकतेबाबत कीळस वाटते आहे त्याचा कोथळा काढावा पार. पण जिथे एकमेकांसोबत राहणं अशक्य आहे हे पटल्यावर परस्पर समंतीने काडीमोड झाला आहे तिथे तो एक अध्याय संपला नव्याने पुन्हा सुरवात असे पाहता आले तर बरे होणार नाही का?
सोशल मीडियावर अशी काही माणसं दिसतात जी घटस्फोटानंतरही गतायुष्यातील चांगल्या आठवणी ज्यांबद्दल घटस्फोट होण्याआधी ती गूळ पाडत असतात त्या सोयीस्कररित्या विसरलेली दिसतात. विसरली नसतील तरी ते मात्र हेतूपुरस्सर लिहण्याचे टाळतात. गेली ना ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यातून मग आता त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करून आपण कसे तोफ आहोत, हिरो आहोत हे दाखविण्याचा अट्टहास का? जगू द्या त्या माणसाला.. की तो वा ती आपल्याशिवाय भक्कम जगते आहे ह्याचाही त्रास होतो? अहंकार दुखावत असावा.
मिळाले की तुम्हांला हवे तसे खुले रान आयुष्य. मग जी काही प्रचंड घुसमट होत असे, जे काही कैद झाल्यासारखे वाटत असे, जो काही समजून न घेण्याचा प्रकार होता तो केवळ त्या जोडीदारामुळेच हे सांगण्याची अशी कोणती गरज पडत्ये?
आपण ज्यास सोडले त्या व्यक्तीने आपल्याला काहीच दिलेले नसते.. ?!!काहीच चांगल्या आठवणी नसतात दोघांमधे घडलेल्या.. की सारे वाईटच होते हमेशा? आपण आयुष्यातून वजा झाल्यानंतर ती व्यक्तीही सारे विसरून जाण्यासाठी किती प्रयत्न करत असेल? आपले एक्स सोशल मीडियावर असतातच की जर आपण असू तर. त्यांना हे इथून तिथून कुठून दिसले किंवा आपल्याबाबत फार वाईट लिहले जात आहे हे कळले तर त्यांना काय वाटेल ह्याचा विचार करणे जिथे अनावश्यक वाटते तिथेच त्या नात्यातले फोलपण नक्की कुणामुळे जास्त आले ह्याची उत्तरे स्पष्ट होत जातात.
आपले आपल्या जोडीदारावर प्रेम नाही. आता तो किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही. पण कधी काळी ते आयुष्याचा फार महत्वाचा भाग होते. त्यात प्रेम होते. मग आदर कुठे गेला? ज्यांना आपल्या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही, अश्या पब्लिकसमोर आपल्या बायकोबद्दल वा नवर्याबद्दल बोलताना किमान भान बाळगणे गरजेचे नाही का? लोकं चिखल उडवायला मोकळे असतात. त्यांना त्यात काठी मारू द्यायची का... तो चिखल उडाला तर त्याने नक्की कुणाला त्रास होईल? जी व्यक्ती आता आपल्यासोबत नाही त्यांच्याबाबत लिहणे इतके गरजेचे का आहे जिथे सभ्यतेच्या सार्या मर्यादा ओलांडून पुढे जातात माणसं.. प्रेम बिम सारा ढकोसला आहे का?
जोडीदार कसाही असो लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलताना योग्य तो सन्मान राखणं गरजेचं आहे. ते न झाल्यास लोकं मजा घेतातच शिवाय त्या जोडीदाराचा नाही तर त्याबद्दल सतत चहाडी करणार्याचा तोल गेलेला आहे हे अनुमान काढण्याइतपत लोकं सूज्ञही आहेत.
घटस्फोट तर दूरच राहिला पण फक्त प्रेमसंबंध असणार्यांमधेही दरी पडली की एक्स गर्लफ्रेंडला चक्क रांड वगैरे म्हणणारे चुतिये आधी त्याच प्रेयस्यांबाबत गझला कविता करत धूत असायचे हे आठवलं तरी अरेरे वाटतं. असल्या गाढवांच्या प्रेमात पडणं.. ते ठीक आहे. गधे पे दिल आया तो.. असं होऊ शकतं. पण नंतरही शिव्याशाप देणं सुरूच असेल तर आपली इज्जत आपल्या हाती. जिथे असा उद्धार करणे सुरू असते तिथेच लोकांसमक्ष नाडी खेचायला स्त्रियांनी मागेपुढे पाहू नये. असले पुरूष भ्याड असतात.. चिंधी.

Comments