आळशी बायका

घरकामात आळशी असलेल्या बायका मला खूप आवडतात. त्यांच्याकडे बोलायला वेळ असतो. आपणही बडबडत बसलं तर ते सारं ऐकायलाही चिक्कार वेळ असतो. बरं कामसू बायकांप्रती त्यांच्या मनात अपार आदर असतोच. कामसू बायकांचा आदर्श ठेवत आपणही एक दिवस म्हणजे एखाद्या वेळेपुरतं तरी किमान त्यांच्यासारख्या बनूनच दाखवू, अशी त्यांच्यात जिद्द असते. त्या काही सकाळी पाचला उठत नाहीत. त्यामुळे लौकर उठून घसाघसा काम करत जगावर करवादणार्या बायांमधे केवळ लौकर उठून सारे वेळेत आटोपल्याने जो एक अहंकार वाढीस लागतो तो आळशी बायकांमध्ये नसतो. आढ्यताखोर आणि हेकेखोर कामसू बायकांप्रमाणे चिकार वेळ असूनही उगाच लौकर उठून खुडबूड खुडबूड करीत काम करून घराला डोक्यावर घेण्याचा आळशी बायकांचा मुळी स्वभावच नसतो. आळशी बायका गोड्या स्वभावाच्या असतात. स्वत: झोपतात इतरांना झोपू देतात. उशिरा उठणार्यांना त्या कधी टोमणे मारत नाहीत. पांघरूण ओढून अनेक तास डोळे उघडे ठेऊन अमिबासाखं पसरून राहण्याची त्यांनी कमावलेली ताकद कामसू बायकांमधे नसते. कामसू बायका आळशी बायकांप्रमाणे मॅगी हेच पूर्णब्रम्ह असं समजून घेणार्या नसतात. त्यांना जरा म्हणून तडजोड करणं हे झेपतच नाही. कामसू बायका ह्या सासवा झाल्यावर सुनांना छळतात. मुलांना त्रास देतात. घरात भांडणं लावतात.

कामसू बायका पोरांकडे अती लक्ष देतात त्यामुळे ती पोरं लाडवतात. रोज रात्री झोपवायला त्यांना आई लागते. अाळशी बायकांना त्यांची पोरच झोपवतात. आळशी बायकांची पोरं लहानाची कधी मोठी झाली ते कळतही नाही. ते आपली काळजी आपणच घ्यायला लौकरच शिकतात कारण आळशी आई लक्षच देत नाही म्हणून. ती लौकर स्वावलंबी होतात. कामसू बायकांना घरातली सारी कामे स्वत:च करायचा अत्यंत वळवळणारा कीडा असल्याने त्यांच्या घरात आयतोबे जन्माला येतात आणि पुढे जाऊन बायकोच्या डोक्याला ताप देतात. खरं तर सतत काम करत राहणार्या बायकांमुळेच घराघरांत पुरूषप्रधान संस्कृतीची माकडं जन्माला येतात. कामसू बायका आपण पोरांना वाढवण्यासाठी किती खस्ता खाल्या ह्याचा सारखा पाढा वाचत राहतात. आळशी बायकांना पाढेच पाठ नसल्याने ते वाचण्याचा प्रश्न येत नाही.

आळशी बायका बाळंतवेदना होत असताना प्रामाणिकपणे ओरडतात किंचाळतात. कामसू बायका मात्र ह्याउलट बाळंतकळा आम्ही कश्या हसत हसत झेलल्या हूं का चूं केलं नाही असं सांगण्याचा दांभिकपणा हटकून करतात. चित्रपटांत बाळंत होणार्या सर्व स्त्रिया गळ्याच्या सर्व शिरा ताणून किंचाळून बाळं जन्माला घालतात हे आपण लहान असल्यापासून पाहिलेले आहे. त्यामुळे सोशिकपणाचा आपण कसा महामेरू आहोत हे दाखवण्यासाठी असह्य बाळंतकळांमधे सारे हसत हसत पार पाडणार्या कामसू बायका कोल्ड ब्लडेड आहेत की काय इतपत शंका यायला लागते. असं कश्यातही भाव खाण्याची कामसू बायकांची लालसा जागोजागी दिसून येते. कामसू बायका माहेरपणाला आल्या तरी माहेरी पालकांना अक्कल शिकवण्याचे प्रताप करतात. आळशी बायका पालक जे करतील ते प्रेमाने आपलं म्हणतात.

आळशी बायका कधीही आपल्या घरी आल्या तरीही आपल्याला त्याने कानकोंडं झाल्यासारखं होत नाही. त्या आपल्या घरातले इथले तिथले डाग दाखवत नाहीत. बोटाने फ्रीज टीव्हीवरची धूळ निपटून कामसू बायकांसारखी आपल्याला दाखवून ' काय हे ' असं विचारून मुद्दाम लाज काढत नाहीत. आपल्या घरातल्या पसार्यात आळशी बायका कुठेही पसरून त्या पसार्यातला एक भाग होण्याची क्षमता राखून असतात. त्यामुळे त्या कधी आल्या तरी आपण जरासं आवरलं तरीही त्या तोंडभरून एक तर त्याचं कौतुक करतात किंवा एकुणच पसार्याबद्दल काहीही बोलायचा आळस करून थेट गप्पा मारायला सुरवात करतात त्यामुळे वेळ व कामाचे नियोजन आणि त्यामुळे यश ह्यासारख्या फालतू वायफळ विषयांवर प्रदीर्घ बोलण्यातला वेळ वाचतो आणि त्यांच्यासोबत दिवस मजेत जातो.

आळशी बायका घरकाम करायला येणारी बाई न आल्यास पदर खोचून जुलाब होईपर्यंत केर लादी पोतं भांडी करत नाहीत. त्या यूज अॅण्ड थ्रो पेपर प्लेट वापरून घासायची भांडी दुसर्या दिवशी येणार्या बाईसाठीच ठेवतात आणि त्यांची हुषारीने खोड मोडतात. आळशी बायका एकदाच भरपूर भात करून फ्रीजमधे ठेवतात. मग दुसर्या दिवसापासून घरातल्यांना फोडणीचा भात, फ्राईड राईस, कोबी भात, आमटी भात, दही भात, दूध - दही- भात अश्या व्हरायटी खाऊ घालतात. कामसू बायका सारख्या ताजा ताजा स्वयंपाक करून कल्पकता गमावून बसतात आणि त्यांच्या घरातल्यांना रोज डाळ भात, आमटी भात किंवा खिचडीवर भागवावे लागते. सगळी कामे आपणच केल्याने कुणीही आपला सभा घेऊन सत्कार करणार नसतं, हे कामसू बायकांना पटतच नाही. त्यामुळे त्या काम करता करता मरून गेल्या की आता एक गडी गेला म्हणून घरातल्या सभासदांना दु:ख होते. याऊलट हाती घराचा व टीव्हीचा रीमोट ठेऊन सार्या घराला पळते ठेऊन कामे करून घेणे आणि घरावर वचक ठेवणे आळशी बायकांना भारी जमते.

आळशी बायका कायम हॉटेलमधे जायला तयार असतात त्यामुळे घरी खाण्याबद्दल कुटुंबियांना वाटणारे अप्रूप कायम टिकून राहते. कामसू बायका हॉटेलमधे खाणे कसे वाईट घरीच खाणे कसे चांगले ह्याचेच भजन किर्तन अख्खा वेळ पिटत राहतात त्यामुळे त्यांच्या नवर्यांची आणि मुलांची फार आबाळ होते. त्यांना मन मारून रोज घरीच खावे लागते. चुकून बाहेर गेलेच तर कामसू बायका तिथेही बाहेर खाण्यातला मनमुराद आनंद लुटू देत नाहीत. बाहेरच्या जेवणाला घरची चव काय, हे त्या सारख्या रटत राहतात त्यामुळे इतरांनाही त्यावर बळजबरी होकार द्यावा लागतो. कामसू बायका विघ्नसंतोषी असतात. दुसर्यांच्या खाऊगिरीत त्या व्यत्यय आणतात. मीच करीन ते चांगले, अश्या हुकूमशहा मोडमधे असणार्या कामसू बायका ह्या स्तुतीलोलुप असतात. त्यामुळे त्यांचे जेवण अतिशय वाईट झाले आवडले नाही तरी त्यांचा इमोशन अत्याचार नंतर पहायला लागू नये म्हणून सगळेच कामसू बायकांची तोंडावर स्तुती करतात. आळशी बायकांना जेवणाचे काही पडलेलेच नसते त्यामुळे त्यांना एक बाळंतपण झाल्यानंतर सुगरपण करण्यात जराही रस नसतो.

आळशी बायका स्मार्टली रसगुल्ले, शिरा, गिट्स चे गुलाबजाम, जेली, खीर असे गोडाचे प्रकार करतात. कधी काही न बनवणार्या ह्या आळशी बायकांनी एक खीर केली तरी त्यांनी कित्ती काय बनवलेले आहे, असा संभ्रम निर्माण करता येतो, हे त्या चाणाक्ष आळशी बाया जाणून असतात. दूध फाडले गोळे केले पाकात सोडले की झाले रसगुल्ले... अश्या झटपट होणार्या बाबौ रेसीप्या आळशी बायकांची खरी वेळ मारून न्यायची शक्कल असते हे अनेकांना कळत नाही. असं कामसू बाईला कुणालाही सहजी गंडवता येत नाही. सर्वांसाठी करून मी कशी थकले ह्याचा दिखावा करण्यातच त्यांना जी धन्यता वाटते त्याचा मोह आळशी बायकांना जराही नसतो. पुरणपोळी सारख्या फालतू पदार्थांकडे त्या ढुंकूनही बघत नसतात. चकल्या, करंज्या, चिरोटे वगैरे अतीसामान्य प्रकार त्या बाजारातूनच सरळ विकत आणतात. हे सगळे वेळखाऊ घाम काढणारे प्रकार दिवाळीच्याआधी करण्यात जेव्हा कामसू बायका मग्न असतात तेव्हा आळशी बायका कुठल्याश्या एसी पार्लरमधे फेसपॅक लाऊन गार हवेत पडलेल्या असतात. त्या कायमच निवांत असतात.
निवांत असण्यात जी मजा असते ती केवळ आळशी बायकांना कळते. त्या निवांतपणात त्या एकाच वेळी नवरा आणि बॉयफ्रेंड दोघांनाही झोपल्या झोपल्या सॉरी पडल्या पडल्या मॅनेज करू शकतात. कामसू बायकांना केवळ एकाच पुरषावर भागवावे लागते कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. कामसू बायकांचे आयुष्य निरस असते. ते कसे इंटरेस्टिंग आहे हे सांगण्याची त्यांना जी धडपड करावी लागते ती आळशी बायकांना जराही करावी लागत नाही.

फेसबूक पोस्टी झटपट व्हॉट्स अप फेसबुकवर लेखकाच्या नावाशिवाय व्हायरल करण्याची कामसू बायकांमधे फार खाज असते. आळशी बायका मात्र कामसू बायकांनी केलेल्या ह्या पाखंडी कृत्याला निषेध दर्शवायचा म्हणून कधीही असल्या फॉरवर्डकडे लक्ष देत नाहीत. कामसू बायकांना चांगले लिखाण, विचार व्हॉट्स अप फेसबुकद्वारे भराभर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात त्यामुळे त्या धांदलीत ते लेखकाला क्रेडीट देणे, लेख शेअर करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे इत्यादी करायला विसरतात, टाळतात कारण त्यांच्याकडे उसंत नसते. आळशी बायका वाचतात सोडून देतात. त्यांना आवडलेलं त्या फार शेअर करायला जात नाहीत कारण मग त्यावर चर्चा करा, ते का आवडलं ते सांगा, ते लिखाण चोरा, कॉपी करा ह्याने आरामदायी जीवन फार धावपळीचे होते, असे त्या समजतात. त्यामुळे मला आळशी बायकांबद्दल करावे तितके कौतुक कमीच असे वाटते.
आळशी बायका पुस्तकं उधार आणतात आणि ती वाचत नाहीत परतही करत नाहीत. कामसू बायकांना एवढेच जर त्यांच्या पुस्तकांबद्दल प्रेम असेल तर त्या येतील घरी, पसार्यात शोधतील पुस्तक व नेतील, असा विचार त्या करतात. कामसू बायकांना मात्र त्या काय विकत घेतात ह्याचं सातत्याने प्रदर्शन करत असतात. त्याच्याशेजारी चहा वा कॉफीचा मग ठेऊन पुस्तकांसोबत आपला फोटोही काढतात आणि फेसबुक अपलोडही करतात. अश्या शोबाजी व नौटंकीत आळशी बायकांना अजिबात पडायचे नसते. कामसू बायकांनी त्यांची पुस्तके कुणाला उधार दिलीत व ती त्यांनी परत केली वा न केली हे सारखे बोलून दाखवण्यात आणि एकूणच पुस्तकांच्या लेनदेन प्रक्रीयेमार्फत परस्परांमधे अप्रत्यक्षरित्या निर्माण होऊ पाहणारे बंध चिघळवण्यात जास्त आनंद होत असतो. पुस्तकं परत करा परत करा असा कामसू बायका सारखा धोशा लावतात त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हे जगात फक्त आळशी बायकांनाच जमते. एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्यात कामसू बाईला रस नसून तिला फक्त आपल्याला त्रास द्यायचा आहे, हे आळशी बायकांनी ताडलेले असते.

कामसू बायका साड्या नेसतात. पण आळशी बायका परकर पोलका घालून त्याला शरारा म्हणत मस्त मिरवू शकतात. आळशी बायका चप्पल कपाटात ठेवत नाही. त्यामुळे चपलेच्या कपाटातल्या गोंधळात त्यांच्या चपला हरवत नाहीत आणि त्या बाहेरच्या बाहेर फेकलेल्या चपला झटझट पायात सरकवून घरातून झटपट बाहेर पडू शकतात.
आळशी बायकांना नवर्यांबद्दल काही तक्रार नसते त्यामुळे त्या सतत कटकट करत नाहीत. आळशी बायकांची लग्नं पटपट तुटत नाहीत कारण.. जाऊ दे मरो इथून तिथून हाही पुरूष तोही पुरूषच असा विचार त्या करतात. घरं बदला नवा संसार थाटा, नव्याने नव्या नव्या पुरषांना त्यांच्या आयांनी न लावलेलं वळणं लावा, त्यांना शिकवा वाढवा हे त्यांना नकोच वाटते.
आळशी बायकांना आपण हातात चहा जरी नेऊन दिला तरी त्यांच्या चेहर्यावर इतका आनंद दिसतो की बाकीच्या सार्या कामसू आणि चंट बायका ह्या किती अल्पसंतुष्ट असतात असे वाटल्यावाचून रहात नाही. कामसू बायकांचे फक्त चहावर भागत नाही. त्यांच्याकडे गेल्यावर त्या इतके पदार्थ करून खायला घालतात की त्यांना घरी बोलवायचं म्हणजेही नकोच वाटतं. थोडक्यात कामसू कष्टाळू बायका पाहुण्या म्हणून घरी आल्या की आपण म्हणजे कर्जात बुडालेले शेतकरी आणि त्या बाया म्हणजे वसुलीसाठी आलेले दुष्ट सावकार हेच चित्र पुढे उभं राहतं आणि पोटात गोळा येतो. तुम्हीच बोलवा नी तुम्हीच खाऊ पिऊ घाला बा. आळशी बायका कश्या म्हणतात, मरो.. तू काही करू नको खायला आपण मस्त बाहेरून मागवू खाऊ नी गप्पा मारू. मला कसा कसा चारीठाव सैपाक येतोय हे दाखवून त्यांना मेडलं मिळवायची आज्जिबातच हौस नसते. त्यांच्या ह्या साध्या स्वभावानेच त्या इतर आळशी बायकांमधे प्रिय ठरतात. बाईला जिंकण्याचा मार्गही तिच्या पोटातूनच जातो ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो त्यामुळे कामसू बायकांप्रमाणे त्यांना पुरूष सैपाकाची कामं करू लागले की उगाच्च हुंदके फुटत नाहीत. जगा आणि जगू द्या ह्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या असतात.

आळशी बायकांना जग बदलायची घाई नसते. त्या कधी कुणाला उपदेश करायला जात नाहीत. सल्ले देत नाहीत. कुणाची आई व्हायचा प्रयत्न करत नाहीत. बस कधी वाटलच तर फार धाक जरब असलेल्या बापासारखं एखादं करकरीत वाक्य समोरच्याच्या चेहर्यावर फेकून त्या बाजूला होतात. जे ते जगोत त्यांच्या त्यांच्या कर्माने.. मरोत त्यांच्या कर्माने हे त्यांचं तत्व असतं. त्यांना कश्याचंही क्रेडीट नको असतं त्यामुळे त्या कधीच वैताग देत नाहीत. थटथयाट नसतो. पटलं तर घ्या नाहीतर रामराम अश्या टेचात त्या सदा राहतात. त्यांना कश्याने काही झाट फरक पडत नसतो. त्याच जगाला त्रासलेल्या असल्याने त्या ना कुणाच्या अध्यात न मध्यात अश्या असतात. आळशी बायका पझेसिव्ह नसतात. मालकी म्हणजे आवरणे, सांभाळणे मग ती माणसं असली तरीही.. हे त्या मनोमन ओळखून असतात. कामसू बायकांना सारेच हवे असते. सारेच सांभाळायचे असते. सगळ्यावरच मालकी हवी असते. कामसू बायका कंट्रोलफ्रीक असतात त्यामुळे त्यांचे कुणाशीच पटत नाही.

आळशी बायका फारश्या कुणाचे रंग रूप वजन ह्याबद्दल बोलून स्वत:वर आफत ओढवून घेत नाही. कश्याही अवतारात एकदम उत्साहात टवटवीत राहणार्या आणि एकदम पर्फेक्ट आवरणार्या आणि सदा तेज तर्रार दिसणार्या अश्या सार्याच बायांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच असते. आळशी बायका त्यांच्या मुलांना फार त्रास देत नाहीत. पास झालात.. आनंद... हे एक सूत्र त्यांनी ठेवलेले असते त्यामुळे मुले त्यांच्याचसारखी त्यांच्या संगतीत राहून शांत आणि सुस्वभावी होतात.

ज्या आळशी बायका वाचन करत नाहीत त्यांच्याशी बौद्धीक चर्चा करण्याचे आणि त्यात गंडण्याचे भय नसते. त्या फारच सेफ असतात. आळशी बायका एकाच जागी फार काळ पडून राहतात त्यामुळे सतत उठून ह्याच्या त्याच्या घरात जा, उखाळ्या पाखाळ्या करा, लावालाव्या करा, भांडणे करा मग ती निस्तरा ह्या व्यापापासून त्या कोसो दूर असतात. त्या कधीही फार आवाज चढवून बोलत नाहीत कारण तो उतरेपर्यंत फार वेळ व्यस्त रहावे लागेल आणि बराच काळ चर्चा चर्वित चर्वण ह्यात अडकावे लागेल ह्याची त्यांना भीती असते. मोहरी नसेल तर त्या जिरे आनंदाने फोडणीस घालतात. मोहर्रीच पाहिजे असे पोके हट्ट त्यांच्यात अजिबात दिसत नाहीत. कधी कधी मोहरी जिरे असं काहीच नसेल तर तेलासमोर उभं राहून त्या दोन वेळा ही घातली मोहरी हे घातलं जिरं असं म्हणतात फक्त आणि भाजी फडफडवून मोकळ्या होतात. अडून खेटून राहण्यापेक्षा भराभरा आवरून बेडवर लडद्यासारखं कधी पडायला मिळेल ह्याकडे त्यांचे पूर्ण लक्ष लागलेले असते. ह्या बायका म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशी आहेत, असा कुठल्या पळत्या म्हैशीने टोमणा हाणला तरी त्यांना ढिम्म फरक पडत नसतो.

आळशी बायका मिनिमलिस्टिक असतात. त्या अनेकदा एक किंवा दोन रंगातल्याच लिश्टीपच लावतात किंवा त्याचाही आळस आला तर ओठांवर जीभ फिरवून.. कधी आपलीच जीभ कधी त्याचाही आळस आल्यास दुसर्याची जीभ फिरवून घेत ओठांचा कोरडेपणा झाकतात आणि बाहेर पडतात. आळशी बायका कूल असतात. त्यांना जळमटांची डीझाईन्स खूप आवडतात. त्यांना धुळीने शिंका येत नाहीत. त्या जॉली नेचरच्या असतात. हातावर काढलेली लहानपणातली जॉलीसुद्धा त्यांच्या हातावर दिसण्याची शक्यता असते. त्या आपल्या जगात मग्न असतात व आपला मूळ स्वभाव प्रेमाने जपतात, आळस करण्याचा छंद मनापासून जोपासतात. त्यामुळे मला आळशी बायका खूपच आवडतात. 

Comments

  1. OMG!it's so fantastic! Superb! You made my day�� Loved it.Thank you.��

    ReplyDelete
  2. Can I please share as it is?

    ReplyDelete
    Replies
    1. yes you can share the link of the blog or you can share it from my facebook wall using share option. Avoid copy pasting on whats app instead share the link. thank you.

      Delete
  3. फार सुंदर. मजा आली वाचताना. :)

    ReplyDelete
  4. mala hi tumachi post khup khup aavadali. mi ghar kamavarun khup bolani khalli ahet.
    I just love this post. mala frame karun gharat lavayachi aahe chalel ka?

    ReplyDelete

Post a Comment