मी ह्या सगळ्याकडे कसं पाहते.. ?

आपली आपली म्हणता येणारी अनेक माणसं एकेक करत सोडून जातात. आधी वाईट वाटायचं आता थोडीफार सवय घालून घेतली. पूर्वी मी हातातून सुटून चाललेली नाती जपण्याचा खूप प्रयत्न करत असे. पण आता जाणार्याला शांतपणे जाऊ देते. थांबवण्यासाठी अजिबात प्रयत्नांची शर्थ वगैरे करून जिवाचे हाल करून घेत नाही. आपण कुठे चुकलो का ह्याचा भरपूर विचार करते. जेव्हा आपल्या बाजूने आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला पण समोरची व्यक्ती नाही समजू शकली ह्याची खात्री पटते तेव्हा मी चर्चा, स्पष्टीकरणं, तडजोड, वाद असं काही करायला जाणं सोडूनच दिलय जणू. कारण मला ह्या सगळ्याचा मानसिक थकवा येतो. अतिशय. हेही वाटतं की जिथे स्पष्टीकरणं द्यावी लागत आहेत, नको त्या गोष्टींचा पराचा कावळा केला जातो आहे, कायम आपल्यालाच ऐकावं लागणार आहे आणि समोरची व्यक्ती कायम आपली घुसमटच करणार आहे तिथे मलाही त्या नात्याबाबत, मैत्रीबाबत कोरडेपणा यायला लागतो. नात्याबद्दल कोरडेपणा येण्याची माझी स्टेज कधी फार काळानंतर तर कधी झटक्यात येते.
एकदा का व्यक्ती मनातून उतरली की ती माझ्यासाठी शहीद जरी झाली तरी पुन्हा ते प्रेम माझ्याकडून होणं शक्य नसतं. कारण ह्या सगळ्या भानगडीत आणि गुंतागुंतीत नात्यातल्या हिंदकळीतील सहजता निघून गेलेली असते. हे माझेच आहे असे नाही. बहुतांश कुभ राशीच्या माणसांचे असे असेल असे वाटते. आयच्या गावात ! डोक्याला शॉट. पण अनेकांचं असं असतं. मला झटक्यात राग येतो तसा जातोही. मानसिक पिळवणूक करणारे.. थोडक्यात पीळ करणारे, मी प्रेम आहे म्हणून सहन करू शकते पण डोक्याची पावडर व्हायला लागली की मला मनात जे आहे ते दाबून ठेवता येत नाही. जे आहे ते स्वच्छ बोलून मी मोकळी होते. ज्यांना हा स्वभाव झेपतो ते राहतात नाहीतर जातात.
गैरसमज करून आकाडतांडव करणार्या काही लोकांची आता मला बर्यापैकी अॅलर्जी निर्माण झालेली आहे. काहीजणं शांतपणेही प्रोलॉन्ग्ड आकाडतांडव करू शकतात. हुषारीने कुणालाही कळणार नाही अश्याही पद्धतीने आक्रस्ताळेपणा करू शकतात, गृहीत धरू शकतात, घाण करूच शकतात. आधी प्रेमाखातर अश्या लोकांसमोर फार कमकुवत असल्यासारखी मी वागे. माफी मागणे, गिडगिडणे असेही करे. पण आता फूट म्हणते. हे म्हणताना मनात माज असतो असे अजिबात नाही. आतून तुटत असतं भाजत असतं. पण मला आता व्हीक्टीम व्हायचं नाही. मानसिक छळ हाही गुन्हा आहे. अनेकजणं तो नात्यात, मैत्रीत, प्रेमसंबंधांत छुप्या पद्धतीने खेळत असतात. मी आता अश्या खेळांना बळी न पडण्याइतपत मजबूत झालेली आहे. मैत्रीच्या नावाखाली स्त्रिया स्त्रियांनाही असा त्रास देतात. पुरषांमधे मात्र असे फालतू गेम्स खेळण्याचा प्रकार कमीच दिसतो. त्यांना बिचार्यांना बर्यांचदा काही कळत नसतं.
माणसं सोडून गेली की हताशा येते. पण मला हल्ली वेगळच वाटतं. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एक योगायोग म्हणून येत नसावा. त्याची भूूमिका असते तिथे. ती पार पाडली की तसंही त्याचं आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर काय काम.. मग तो एक्झिट घेतो. तिथे जागा हवी असते. एक नवं नाट्य घडवून आणण्यासाठी नव्या कलाकाराची, नव्या नात्याची, नव्या माणसाची गरज असते. केवळ म्हणून काही ताटातूटी होत असाव्यात आणि काही ऋणानुबंध जुळत असावेत कायमचे.
माणसं कोणत्याही कारणाने आयुष्यातून कमी झाली की मी दु:खी होते. पण मी निराश होत नाहीये हे नक्की. 

Comments

  1. Bahutek he Vrishabh Rashisarakh asav. Jo sahasa ragavat nahi pan raag aala ki samorachyachi Khair nasate. Uttam likhan aahe. Chhu Gaya dilako...

    ReplyDelete
  2. आवडलं..अगदी मनातलं लिहिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  3. जे सोडून जातात ते स्वार्थी असतात....

    ReplyDelete
  4. एकदा का व्यक्ती मनातून उतरली की ती माझ्यासाठी शहीद जरी झाली तरी पुन्हा ते प्रेम माझ्याकडून होणं शक्य नसतं.
    Google - INFJ door slam.

    ReplyDelete
  5. योग्य भावना

    ReplyDelete
  6. खरंय👍👍👍👌👌👌

    ReplyDelete
  7. पारदर्शी.....अगदी सहमत....👍

    ReplyDelete
  8. लाजवाब. Proper analysis.

    ReplyDelete
  9. १००% खरं आहे, मलाही हाच अनुभव येवून गेलंय, पूर्वी असं वाटायचं की आपणच कुठे तरी कमी पडतोय नाती मैत्री जपण्यात... पण जेंव्हा हे वारंवार घडू लागलं तेंव्हा जाणवलं की मीच समोरच्याच्या जास्त क्लोज जाती, व त्याला खूप कंफर्त द्यायच्या भानगडीत पडतो मग ती व्यक्ती त्याच अपेक्षेने जवळ घुटमळत राहते व एखाद्यावेळी जरी निराशा झाली की मी गुन्हेगार असल्याचं भासवून नाते तोडून त्याचा आरोपांचा हार बनवून माझ्याच गळ्यात घालून मागे फिरून न पाहता निघून जाते.... पण आता मी बदललो आहे. खूप खेटून देत नाही आणि खेता ही नाही सगळ्यांना... आणि कोणी गेलं सोडून तर शब्दनेही समजावण्याचा भमगडीत पडत नाही.... आणि आश्चर्य आता सोडून जाण्याचे प्रमाण अगदी घटले आहे....

    ReplyDelete
  10. खूप सुंदर..����

    ReplyDelete

Post a Comment