विकृत माणसं व त्यांच पिशव्या प्रेम

चंग्या - बेबी..
बेबी - क्कॅय्ये सारखं सारखं झोपेच्या आधीच काहीतरी विचारायचं असतं बया.. तुमचा फक्त गप्पांना उपयोग बाकी आनंद. बाकी पण छंद करत जावं अधेमधे ते नाही सारख्या चौकश्या बेबे नी बेबे..  
चंग्या - ते कश्याला पिंकुला आपल्या एव्हढी बडबडत होती गा ? तोंडात ऊस टाकला असता तर चरक्यात गेल्यासारखा पिळून रस बाहेर आला असता इतकी टकळी चालू. आता थांबशील नंतर थांबशील नाही. तुझा पिळ चालूच. माझी बहीण गरीब आहे बिचारी किती बोलावं माहेरवाशणीला. 
बेबी - हां बोलत असती म्हणे. ही माहेरवाशीण बघावं तेव्हा माहेरच्याच भिंतीना ओल आणायची कामं करती. अावो कधी पण माहेरी आली तरी इथून काही नेताना तिला पिशव्या द्याव्या लागतात. डबे द्यावे लागतात. ते परतही करत नाही. कितीवेळा सांगायचं... तिच्याकडे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पिशव्या नी डबे आहेत. मी मागच्यावेळा म्हणले की एक दे मला तर त्यावर काहीच न बोलता अच्छा बाय म्हणाली.
चंग्या - धन्य तुम्ही बायका आणि धन्य तुमचं पिशव्यांचं प्रेम. एसटीत ओकायला, वाटेत हगायला, भाजीला, खरेदीला, मिरवायला सगळ्या प्रकारच्या पिशव्या न बॅगा असतात तुमच्याकडे. आपल्या तर डोक्याच्या बाहेर आहे हा कारभार. बेडखालच्या खणात पिशव्या, गादीखाली पिशव्या, कांदाबटाट्याच्या बास्केटमधे पिशव्या नी चंच्या, छोट्या छोट्या पर्स.. इतकं काय खजिना भरून ठेवायचा असतो पिशव्यांमधे. अश्या पिशव्या साचवणार्या तुमच्यासारख्या बायका मला विकृतच वाटायला लागलेत भौ. आमची आई एक विकृत होतीच आधी घरामधे. त्यात तुझी एक भर.
एकदा दादा शिर्डीला गेले होते दर्शनाला. तर दादांचे प्रत्येक प्रकारचे कपडे आईनं वेगवेगळ्या पिशव्यांमधे भरून त्ये बॅगेत भरले. त्यांचा गोंधळ होऊ नये आणि सर्व कपडे त्यांचे त्यांना मिळावे म्हणून. आंघोळीला जाताना अंडरपॅण्ट बनियनची पिशवी दादा बाथरूमात घेऊन गेले आणि तिथेच विसरून आले. मग तिथून दुसर्या गावाला गेले तेव्हा दोन दिवस बिनधास्त विदाऊट अंडरपॅण्टच फिरत होते निस्ती पॅण्ट घालून. म्हणून मला मी भरतो तशी अस्ताव्यस्त बॅगच प्रवासात आवडत आसती. बायका जेव्हा नीट काही ठेवतात तेव्हा शंभर टक्के वस्तू वेळेवर मिळत नाहीत आणि वस्तू हमखास हारवतातच. बरं दादांन्ला अंडरपॅण्ड मिळाली नाही त्याचं आईला काहीच वाटलं नाही. अंडरपॅण्ड बनियन ठेवायला तिने दिलेली जाळीची पिशवी हरवली म्हणून तिनं दादांशी दोन दिवस अबोला धरला. अश्या विकृत माणसांच्या घरात माझ्यासारखा सॉर्टेड मानूस कसं काय जन्माला आला, मला तर कधीकधी प्रश्नच पडतो. हे पिशव्यांचं जे ऑब्सेशन आहे ते का आणि कसं जन्माला येतं ह्यावर एक मोठा प्रबंध होऊ शकतो. हा अभ्यासाचा विषय आहे. बायका पझेसिव्ह असतात. हेच त्याचं मूळ आहे असा माझा निष्कर्ष आहे.
बेबी - बरं काल तुम्हांला ऑफीसमधे डबा न्यायला पिशवी दिली होती. डबा आणि पिशवी दोन्ही विसरून आलात. उद्या पुन्हा मलाच मागाल. ते दोन्ही आधी परत आणा आणि तोवर कॅण्टीनमधेच खावा.
चंग्या - 😨

Comments

  1. Aai gggg hasun hasun khallaass

    ReplyDelete
    Replies
    1. पूजा... म्हणजे पटलं पटलं है ना..

      Delete
  2. मस्त लिहिलंय ,कहर आहे

    ReplyDelete

Post a Comment