गदळ

फळं गोड होऊन पिकायला लागली की लोकं ती पाडण्यासाठी दगड मारायला लागतात, असं मला माझ्या एका लेखक मैत्रिणीने दोन वर्षांपूर्वी फार प्रेमाने सांगितलं होतं. काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत, त्यातलं हे एक आहे. ह्याचा खूप चांगला अनुभव नंतरच्या काळात सावकाश यायला लागला. ज्या गोष्टींचा माणसांचा त्रास होतो त्यांना प्रयत्नपूर्वक महत्व न देणं, थोडसं जमायला लागलं. जी माणसं आपला द्वेष करतात त्यांची एकंदरीत नियत काय आहे, ह्याबद्दलचे ठोकताळे बरोबर निघायला लागल्यावर आपण त्यांच्यापैकी एक आहोत का, हा फार महत्वाचा प्रश्न पडायला लागला. अलगद त्या लोकांपासून, त्यांच्या विचारांच्या गदळातून स्वत:ला सोडवूनही घेता येऊ लागलं. काही ठरावीक माणसं एखाद्या चांगल्या हेतूचा चुथडा करू शकतात, काही चांगल्या जागेत गदळ निर्माळ करू शकतात व काही चांगले लोकही अश्या गदळीला मनोरंजनासाठी प्रोत्साहन देऊ शकतात, असे निष्कर्ष घाईघडबडीत नाही तर सबुरीने काढता येऊ लागले. ह्या सगळ्याला थेट उत्तर म्हणून अश्या हिणकस, निरूपयोगी, संसर्गजन्य, रोगट, मानसिकदृष्ट्या आजारी,धूळकस्पटासम वृत्तींना उंबरठ्याबाहेरची कचरापेटी दाखवून कांगावाखोरांना थेट उत्तर देता येऊ लागली. कांगावा आपल्याला ऐकू येणार नाही अश्या अंतरावर जाऊन बसलं की आपण शांत राहतो आणि समोरच्याची चीडचीड होते, हे सूत्र आचरणात आणता आलं. जाणती मोठी माणसं आपल्याला जे सांगतात त्याहीपेक्षा वाईट अनुभव आपल्याला खूप चांगलं शिकवून जातात नै?

Comments