हे सारं विषारी आहे

कुणी कुणाच्या पाणवठ्यावर गेलं, कुणी कुणाच्या पाण्याला हात लावला, कुणी कुणाच्या विहिरीत आंघोळ केली म्हणून त्यांना नागडं करून त्यांची धिंड काढण्यापर्यंत मजल जाते. इतकी हिंमतच कशी होऊ शकते.. ह्याचाच अर्थ कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार आहे ह्याची आपल्याला भीडभाड तर राहिलेलीच नाही. शिवाय ही सारी जातपात मोडून काढण्याासाठी ज्यांनी इतके कष्ट घेतले त्यांचीही आपल्याला काही किंमत नाहीच. 
अजूनही अनेक ठिकाणी विविधा जातीवर्गांसाठी वेगळ्या वस्त्या पाण्यासाठी वेगळ्या विहिरी, त्यांपर्यंत जाण्यायेण्यासाठी वेगळे मार्ग... 
मागायसवर्गिय हा शब्दच भयानक लागतो. टोचतो. खूप चीड येते. तसेच बुद्धाचे नाव घेऊन, आंबेडकर, फुले, सावित्रिबाई ह्यांच्या नावाचा ढोल पिटत, त्यांची मंदिरं बनवून फक्त जयंती आणि सोहळे करणारे आणि उच्चवर्गीय, मोठ्या जातीतले, ब्राह्मण, मराठा नी आणि काय काय ह्यांच्यावर आग ओकणारे आणि त्यांच्याबद्दल घाण लिहणारे.. एकुणात हे सगळेच ह्या सगळ्या तिरस्कारात पुढे कुठेच का जाऊ शकत नाहीये, हा प्रश्नं वारंवार पडतो. साला जिथे तिथे कोणत्याही जातीचे असोत मराठी माणसं शिपाई, घरगड्याची कामं करताना दिसतात. बेवडा मारून सारेच आडवे. मग ते मागासवर्गीय असतो वा उच्चवर्णिय का उच्चवर्गीय काय ते. फेसबुकवर तर ह्या सगळ्या जातीय तिरस्काराचा भडीमार दिसतो. अमुक ढमुक ब्राह्मणाची औलाद म्हणून असं म्हणतोय, किंवा हा बामण एका बापाचा नाही म्हणून ढमुक ढमुक. हे सारं पाहूनही ओकारी येते आणि डोकं भणभणतं. बरं आजपासून मी बुद्ध स्वीकारला ह्याचा दहावेळा ढिंडोरा पिटून मग स्त्रियांबद्दल गलिच्छ लिहणारे किडे तर डोळ्यादेखत असतात तरी त्यांचं अभिनंदन करायला सरसावणारी माणसं पाहिली की त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो, की नक्की काय हवं होतं बुद्धाला, काय शिकवण होती बुद्धाची? बुद्धाचे नाव पुढे करून वाहवा मिळवायची आणि मग भांडत तंटत बसायचे व त्या सार्या विचारांनाच काळिमा फासायची.. अश्या माणसांना कुणी हे का विचारत नाही की बुद्धाचे, आंबेडकरांचे नाव घ्यायला तुम्हांला लाज वाटत नाही का? महामानवाचे नाव घेऊन कुणी मोठं होत नसतं. कदाचित त्यांचे विचार आचरणात आणल्याने आपण शांतपणे त्यांच्या विचारांना पुढे नेतो आहोत, हे समाधान तरी मिळेल. कदाचित त्या विचारांवर चालत आपले व आपल्या बांधवांचे कल्याण करत राहणे फार थोड्या लोकांना जमले आहे, असावे.
कधी पडणार आपण सारे मंदिर, मसजिदी, धर्म आणि जातीच्या बाहेर.. माणसांना नागडं करण्यापेक्षा आपल्या मनाचं बिभत्स नागडेपण कधी झाकणार आपण.. तिथले सारे आचारविचार माणुसकी पूर्णपणे बाटलेली आहे. हा भेकडपणा झाकण्यासाठीच कदाचित घोळक्यांनी आपल्यापेक्षा प्रसंगी कमकुवत वाटणार्या लोकांना नागडं करायचं, त्यांच्यावर बलात्कार करायचे, हाणायचं, दगडांनी ठेचायचं आणि दहशत पसरवायची, असले धंदे करावे लागत असतात का.. 
दोन वेगळ्या जाती, वर्गांमधेच हे दिसतं असं नाहीये ना.. 
एकाच जातीतल्या लोकांच्या भावक्या, त्यांच्यातली भांडणं आणि राजकारणं तर इतक्या घाणेरड्या थरांना पोहोचलेली असतात की तिथे उच्चवर्णीय ( असं म्हणवल्या जाणार्या.. मला हे सारे वर्ग नी जाती पाती काही कळतही नाहीत आणि डोस्क्यातही ते काही घुसत नाही. ) म्हणवल्या जाणार्यांचा काही संबंधही नसतो, तिथेही त्यांच्या त्यांच्या जातभाईंना वाळीत टाकणं, त्यांना एकाच गावातले एकाच वस्तीतले असून त्यांना घरच्या कार्यक्रमांना, सणावारांना, सार्वजनिक ठिकाणी भरवल्या जाणार्या सभांना, बैठकांना न बोलावणं, त्यांच्या घरी न जाणं, त्यांना घरी न बोलावणं असे सामाजिक बहिष्काराचे प्रकार चालतात. हे तर मराठा, ब्राह्मणांमधेही चालतं. अमकी ढमकीने जी कोकणस्थ ब्राह्मण आहे तिने देशस्थ ब्राह्ममणाशी प्रेम केले तरी ओळखीच्या स्त्रियांना नसलेल्या गोट्या येऊन त्या त्यांच्या कपाळात जाण्यापर्यंत प्रचंड गॉसिप्स केली जातात. त्यांच्यावरही बहिष्कार घालण्याचे प्रकार होतात, जे छुपे असतात आणि चर्चा भांडणं नकोत म्हणून असे अन्याय कुटुंबं बिनबोभाट गावाकडे सहन करत राहतात.
आपला संबंध हा फक्त दुर्दैवाने का होईना शाळेचे फॉर्म भरताना जातीपातीशी असतो तितकं ठीक आहे वाटतं. कारण त्यामागे काही विचार असावेत. त्यापलिकडे मात्र जात हा प्रकार डोक्यात जातो. नको तिथे सगळ्यांची शक्ती, उर्जा वाया जाते, मग मोर्चे जाळपोळ अधिकार मागणे प्रकार. कश्यासाठी हे सारं वाटतं.. आणि किती वर्षं तेच तेच. हे सारं करण्याची वेळ यावीच का.. दुसर्या जातीतल्या मुलाशी प्रेम केलं म्हणून बायकांना झाडाला नागडं करून बांधणे आणि त्यांना झोडणे, मुलाबाळांच्या डोळ्यादेखत हे जातकारण खेळून त्यांनाही त्याच विचारांत वाढवणे व त्यांनीही पुढे मोठं होऊन हेच करणे ह्याच विचारांच्या डबक्यात सडणे ह्याने कोणत्या जातीची अस्मिता अभिमान जपला जातो माहीत नाही.
दारू पिऊन पेट्रोलपंपावर मरून पडलेले आणि कुटंबाला उध्वस्त करणारे, कर्ज करून पोटच्या लहान पोरांच्या डोळ्यादेखत फाशी घेणारे, बायकोवर सार्या घराचा डोलारा सोडून जाणारे अनेक नामर्द उच्चवर्णीयही पाहिले आहेत आणि तसेच भांडाभांड करत बोंबलत हिंडणारे इतर जातीतील माणसंही पाहिली आहेत. सगळे इथून तिथून सारखेच. मग कसली जात नी कसला त्याचा माज नी कसला त्याचा अभिमान. सगळंच गचाळ आणि गलिच्छ वाटतं त्यावर बोलावंही वाटत नाही आणि कधीतरी हे बोलणं फार महत्वाचं आहे असंही वाटतं.
विविध जाती वर्गातली स्तरांतली खाद्यसंस्कृती, सणवार, त्यांची राहणी ह्याबाबत बोलताना जेव्हा जात ह्या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा तो जराही खटकत नाही. पण त्यापलिकडे सारे विषारीच वाटते.

Comments