फनीमाऊ

तात्या आता जिद्दीलाच पेटलेत ह्या घरात मांजर आणायचीच आणि मी पण काय ऐकायला नाही. ह्या घरात मांजर नाही जिराफ आणायचाच ! पेच काही सुटत नाहीये. काल रात्री घरात ह्यावरून युद्ध पेटले. घराच्या उंबर्यापाशी सदा घुटमळणार्या आणि सदैव गर्भार असलेल्या भाटीने काल आम्ही इथे आल्यापासून माझ्या पाहण्यात २१ व्यांदा वेळा पिल्ले जन्माला घातली.
ह्या मांजरीला आम्ही शिल्पा शेट्टी म्हणतो. काय फीगर आहे राव तिची ह्या. शॉल्लेट्ट. आणि आणि ते आपलं हे.. काय ते.. हां. तिला नं साला ढीगाने प्रियकर मिळतात. अल्ला... तिच्या पोटात सारखी सारखी पिल्लं का येतात माणसाच्या पोटात सारखी सारखी ह्या वेगाने पिल्लं का येत नाही, अशी विचारणा अजून घरात झाली नाही, हे माझं नशीब.
तर पाचांपैकी एक पिल्लू उचलून ते खोक्यात घालून तात्या घरीच आणायला निघाले होते, अशी खात्रीलायक बातमी बिडलिंगच्या गुरख्याकडू कळली. आमच्या हिथं खाणार्या त्या भामटीने पिल्ले शेजारच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर प्रसूत केली तर तात्या तिचं बाळंतपण कराला पार तिथवर पोहोचल्याचं कळलं. घरात साधा पाण्याता ग्लास उचलून ठेव सांगितलं तर मी मोठा झाल्यावर माझी बायको करेल सर्व कामं मी का क्रू? पासून ते ह्या घरातली सगळी कामं मीच क्रू का.. असं सारखं ऐकवतात पण नको तिथे ह्या आजकालच्या पोरांचा कामसूपणा तरी बघा बघा कसा ऊतू जातोय ते. बाळंपणं करताएत मांजरांची हूं.
ती पिल्लं जन्माला आल्यापासून कबीर, आरूष, हृदान व र्हेहान तिथेच ठाण मांडून बसलेले होते. मग तिसर्या मजल्यावर पडलेल्या अॅमेझॉनच्या पार्सलचा कचर्यात फेकण्यासाठी दाराबाहेर ठेवलेला बॉक्स जिन्यांची चढउतर करत तात्या पुन्हा पाचव्या मजल्यावर घेऊन गेले आणि त्यांनी त्यात सरळ एक त्या मांडरीचं पिल्लू भरलं. तेव्हा मांडरींच्या पिल्लांना कौतुकाने पाहण्यासाठी तिथं उपस्थित असलेले त्या इमारतीतले प्रौढ सदस्य भयभीत झाले आणि त्यांनी तात्यांना असे करण्यापासून अटकाव केला विनंत्या केल्या पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मग तात्यांच्या वडलांना सांगावा धाडण्यात आला की या आणि आपल्या लेकाला चार समजुतीच्या गोष्टी सांगा म्हणून. त्यामुळे तात्या आधीच कावलेले होते.
त्या मांडरीला मात्र ह्याचे काही वाटले नसावे. कारण कुठेही पिल्ले घालून ती अखेर बाळंतपणाला तात्यांच्याच दरवाज्यापाशी येते. इथे चांगली दूध तूप रोटी खाते.तिला मासे पाहिजेत, चिकन पाहिजे. मोट्टी शेठाणीच आहे ती नाय का? आम्हीच तिची पिल्ले वाढवतो मग एक दिवस आयदर ती बोके खाऊन नेतो ऑर ती कुणी उचलून नेतो. पण आम्ही म्हणजे कबीर व त्याची वडील तिचं व त्या पिल्लांचं इतकं प्रेमाने सारखं करत र्हातात की एक पिल्लू कबीरने उचलून जरी घरी नेलं तरी पिल्लाची काही ताटातूच व्हायची नाही, आबाळ व्हायची न्है, ह्याची मांजरीला खात्री असावी. ती तेव्हा शांतच होती म्हणे.
शेवटी बाबापुता करून तात्यांचे वडील त्यांना घरी घेऊन आले. मग रात्री मांजर की जिराफ असे भांडण घरी रंगले आणि अखेर भांडता भांडता, ठिके आपण जिराफच आणूया घरी म्हणजे कधी लिफ्ट बंद पडली तर आपल्याला सातव्या मजल्यावरून त्याच्या मानेवरून घसरत खालपर्यंत जाता येईल हा माझा सल्ला झोपेच्या अंमलाखाली तात्यांनी कबूल केला आणि ते डाराडूर पंढरपूर झाले. आता उठल्यावर पुन्हा सुुरू.. 😱😱 पण मी घरात जिराफच आणणार. मला जिराफाचं दूध खूप आवडतं. ते अतिशय पौष्टिक असतं. ते बाहेर खूप महाग मिळतं.😌😌

Comments

  1. जिराफ टेरेसवर ठेवा. त्याच्या मानेवर चढून वानखेडेवरची म्यॉच पाहता येईल.

    ReplyDelete

Post a Comment