मी आणि माझे एक सुकट दु:ख

सुकटाचे विविध प्रकार अगदी चांगले येणार्या त्याबद्दलची सारी माहिती असणार्या, म्हणजे ते चांगले कुठे मिळते वगैरे हमखास माहिती असणार्या, ते कसं साठवावं, ते कसं साफ करावं, ते कोणत्या मौसमात कसं खावं, कश्यासोबत खावं, आम्ही कसे सोड्याचा भात, सोडे घातलेले पोहे, किसनूर का मेलं ते किसमूर आणि तांदळाची भाकरी चापली, सुक्या बोंबलाची चटणी आणि चुलीवरची गरम भाकरी स्लSSSSर्प, सुक्या बोंबलाचं कालवण, सुक्या बोंबलाचे लोणचे.... वगैरे वगैरे बोलणार्या बायका पाहिल्या की माझा तिळपापड होतो. तोही करपलेला पापड. आमच्या घरात सुकं म्हणजे पाहिजेच ताटात बाजूला.. हे अस्सं घ्यायचं भाजायचं नी खायचं.. असं म्हणणार्या समोर आल्या की तर मला त्यांचे गळेच दाबावे वाटतात. का कुणास कळे मला हे सारं काही माहीत नाहीये कसं करावं नी काय काय कुठे कसं घ्यावं ते असं सारखं वाचत राहतं. हे सारं आम्ही लहानपणापासून खातोय, आमची आई काय बनवायची सुकट आणि आज्जी तर... असं वगैरे बोलायला लागलं की मला भयंकर म्हणजे अतीभयंकर कॉम्पेक्स येतो.
जवळ्याला ' जवला ' म्हणणारे जवल्याच्या की त्या जवळ्याच्या अधिकच जवळचे आहेत, असा माझा पक्का समज आहे. जवळ्याला जवला म्हणणार्यांचे प्रकार जास्त स्वादिष्ट होत असणारच हमखास. तसेच ह्या साला जवला जवला करणार्यांना माश्याचे खास परंपरागत माश्याचे मसाले  घरच्या घरी तयार करण्याचे फॉर्म्युले माहीत असतात जे ते कुणाशीही शेअर करत नसतात, हेही मला माहीत आहे.
आमच्याही ताटात लहानपणापासून घरी बनवलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड असे हो, असं सांगायलाही हिंमत होत नाही. कारण तेही त्यांच्या आया आज्या आणि आता त्यांनाही सहज येत असतं. माझा जन्म सीकेप्यांच्या घरात का झाला नाही, ह्याचं मला खूप वाईट वाटतं. युट्यूबवर हे सारं शिकायला मिळतं. पण एकूणच आपण सुकट बाजारातून विकत घेत असताना हे नक्की कोणतरी अडाणी आहे, हे ओळखून मला समोरची बाई की ताई फसवणार आणि काहीतरी दोन नंबरचा माल गळ्यात मारणार असं उगाच वाटत राहतं. 😟
एकदा मी हिंमत करून सुके बोंबिल आणि प्रॉन्स विकत आणले. मग खूप घाण वास येतो म्हणून टाकून दिले. 😨😨 त्याला वास नष्टच येतो ते टाकण्याआधी विचारायचंस तरी, असा एक शेरा आल्यावर इतका संताप संताप झाला की पुढे काही विचारायची हिंमतच झाली नाही. मलाही हे सारे बनवायला शिकायचं आहे आणि सीकेपी, मालवणी बायकांसारखा जरा माज करायचा आहे. मी काय क्रू ?

Comments

  1. सध्या हा प्रॉब्लेम सर्व शहरात राहणार्‍या मुलीं साठी आहे. जिभेला तर चट आहे पण बनवता येत नाही

    ReplyDelete
  2. मस्त Blog..तोंडाला पाणी सुटलं गं...

    ReplyDelete

Post a Comment