तू कायम असशील माझ्यापाशी

खूप काळ आपल्यासोबत असतात काही माणसं. आपल्या आयुष्याचा आपल्या शरीराचा भाग असल्यासारखी. काहीजणं असतात आपले डोळे काही कान काही जण श्वास बनून गेल्यासारखे असतात नै. वारा आल्यावर एखाद्या मोठ्या शुभ्रधवल ढगाचे तुकडे होऊन जसे पुंजक्यांमध्ये विखुरतात आणि स्वतंत्र ढगांसारखे नांदायला लागतात अगदी तशीच ही माणसं कालोघात आपल्यापासून तुटून न जाणे का कशी कुठे वाहत जातात. ह्या मोठ्या अवकाशात माहीत नाही त्यांचे आपल्यात मिसळलेले तुकडे कुठे जातात.. ते जाताना आपलाही रंग गंध घेऊन जातात हे नसेल का आठवत कधी? त्यांना अगदी काही लक्षात रहात नसावं का.. एकत्र जागवलेल्या रात्री, गप्पा, हसण्याचा कलकलाट, एकमेकांचे टिपलेले अश्रू, दिलेला अखंड आधार.. अगदी काहीच कसे न आठवावेत ते क्षण त्यांना.. असे नक्की काय होते की ह्या सोनेरी क्षणांपेक्षा अगदी क्षुद्र शुल्लक घटना व अप्रिय घटना आठवणी गैरसमजुतींतून झालेल्या जखमा जास्त ताज्या भळभळत्या ठेवाव्या वाटत असाव्यात.. 
माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक क्षणाचाही जो वेळ लागत नव्हता तो आता का लागतोय इतका.. का झालेत ते आधीचे सुंदर क्षण इतके लहान. ते क्षण एक सुंदर काच फुटल्यावर खाली पडलेल्या अणुकुचीदार तुकड्यांसारखे पायाखाली सारखे येत आहेत. आठवणींच्या चतकोर तुकड्याचे मुटकुळे ताटात वाढलेली आहेत. जी खाता येत नाहीत.. ज्याने पोट भरत नाहीये हा भयानक अनुभव चिरंतन झाल्यासारखा का.
माणसं शरीराने मरून गेली की हळहळ करून काय उपयोग? ती तशीही आता जिवंत असताही तुम्ही मारून टाकलीत त्यांचे अस्तित्व नाकारून.
की कुणावर प्रेम करणं, विश्वास ठेवणं हे चुकाय? त्या प्रेमात काही स्वातंत्र्याची, कधी चुकायची मोकळीकच नाहीये का? असं झालं नसतं तर हरवला नसतास तू किंवा तुझ्यासाठी मीही. ते असं होणं म्हणजे काय हे तरी तू मला सांगायला हवं होतस.. आता फक्त उरला आहेस एका चिठ्ठीपुरता ज्यात तू लिहलं होतस तू कायम असशील माझ्यासाठी. खात्री आहे तू नाहीस पण ती चिठ्ठी मात्र कायम असेल माझ्यापाशी.

Comments

  1. किती खणावे खोल खोल पाणी का न लागेना
    मरुभुमी म्हणावे मन आमुचे नयनीची ओल
    का न संपेना

    ReplyDelete

Post a Comment