४०

चाळीस वय झालं की
कधी शब्दांच्या शेकोटीवरती
कधी खमंग बेसनाच्या ऊन ऊन धगीवर
बरं वाटतं हात शेकायला

दुसरं मला काहीच येत नाही
मला फक्त वळता येतात
मनात विरघळणार्या काही गोष्टी आणि
तोंडात विरघळणारे बेसनाचे सोनेरी लाडू
हे दोन्ही मी विकू शकत नाही
फक्त वाटू शकते
ज्या क्षणी हे विकण्यासाठी करावं लागेल
तेव्हा त्यात हातची चव उतरणार नाही

किती मजा आहे ही
अजूनही मी एक लहान मुलगीच आहे, चाळीस वर्षांची.
जिला तिशीत चाळिशीतही
कसं वागायला हवं नकोय ते
मुळी कधी समजणारच नाहीये.
ह्या समजेविषयी समजावणारं
हवं असतं कुणीतरी
त्यातल्या मायेची ऊब हवीहवीशी वाटते
कितीही खर्च झाली तरी बरीच सुकी लाकडं
शिल्लकच राहतात आत बाहेर जाळण्यासाठी 
तुमच्यात नी माझ्यात
हे समजायला चाळीस वर्षं खर्च झाली 
पाहता पाहता.


Comments

  1. एकदम apt रेणुका, बर्फी शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या

    ReplyDelete
    Replies
    1. माझा वाढदिवस नाहीये ना मी अद्याप ४० वर्षांची आहे. पण ह्या वयाच्या आसपास असल्याने काही जाणवतं ते लिहलं.

      Delete
  2. ज्या क्षणी हे विकण्यासाठी करावं लागेल
    तेव्हा त्यात हातची चव उतरणार नाही...
    वाह... खूप सुंदर विचार

    ReplyDelete
  3. मला पन्नाशीतही हेच वाटतंय. अडाणीपण संपत नाही.

    ReplyDelete

Post a Comment