मग हंड्रेड परसेंट राडा

सौंदर्यसाधना आणि त्यातून स्वत:चे मनसोक्त लाड करू घेण्यासाठी ब्युटीपार्लर व स्पामध्ये जाण्याचे स्वातंत्र्य, डोक्याचे मनाचे लाड करून घेण्यासाठी वाचनालये शाळा, पुस्तकांची दुकाने पालथी घालण्याचे स्वातंत्र्य, दणकून शॉपिंग करता यावे आणि हवा तसा पैसा उडवता यावा ह्यासाठी मॉल्स व दुकाने येथे प्रवेश, जिभेचे चोचले पुरवता यावे म्हणून हॉटेलांत जाता येणे, विचार मांडता यावेत ऐकता यावेत ह्यासाठीची व्यासपिठे वापरता येण्याबाबतचे स्वातंत्र्य, सोशल मिडीयावर विचार व अनगिनत सेल्फी टाकता येण्याचे स्वातंत्र्य, हवे ते लिहिता बोलता व्यक्त होता येण्याचे स्वातंत्र्य, सेक्सच्युअल प्रेफरन्स असेल त्याप्रमाणे हवा तो पुरूष, स्त्री वा दोन्हीची निवड करता येण्याचे स्वातंत्र्य, त्यांच्यापासून वेगळे होता येण्यासंदर्भातील स्वातंत्र्य, सेक्स हवे असेल तेव्हा हो किंवा ठणकावून नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य, निरोध वापराबाबत आग्रही असण्यापासून ते तो कोणत्या फ्लेवरचा हवा ह्याचा आग्रह धरण्याचे स्वातंत्र्य, पाळीच्या दिवसांत बाजूला बसणार नाही असा हट्ट धरण्याचे स्वातंत्र्य, घरात पाव्हणेरावळे आलेले असताना पुरषांच्या जोडीला बसून ऐश करण्याचे व हसण्याचे मोठाले लफ्फे सोडता येण्याचे स्वातंत्र्य, रांधणे न रांधणे हा आपला चॉईसे बॉस हे सांगता येण्याचे व त्याबरहुकूम वागता येण्याचे, हवे ते सिनेमे नाटके पाहता येण्यासाठी सिनेमाघरे, नाट्यगृहे येथे प्रवेश आणि टीव्ही, मोबाईलसकट कोणत्याही प्रकारचे गॅजेट वापरता येण्याचे स्वातंत्र्य, व्यसनं करता येण्याचे व व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वैद्यकीय मदत घेता येण्याचे स्वातंत्र्य, कमावलेला पैसा साठवण्यासाठी काढण्यासाठी बॅंकांमध्ये प्रवेश, गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य, मालमत्ता खरेदी विक्रीसंदर्भात निर्णय घेता येण्याचे स्वातंत्र्य, हवा तो व्यवसाय नोकरी निवडीबाबतचे स्वातंत्र्य, प्रमोशन मागण्याचे आणि ते अकारण मिळत नसल्यास त्यासाठी भांडण्याचे स्वातंत्र्य, वाटेल ते खाण्यापिण्याचे, हवी ती वस्त्रप्रावरणे परिधान करण्याचे, ती हवी तेव्हा काढता येण्याचे, ऐश करता येण्याचे स्वातंत्र्य, वाटली तर मुलं जन्माला घातली न वाटल्यास तसेच राहता येण्याबाबत पूर्ण स्वातंत्र्य, लग्न करावे वाटले केले व लग्न केल्यानंतर संसार मोडावा वाटला तर तो मोडून मोकळा श्वास घेता येण्याचे स्वातंत्र्य, कोणत्याही डॉक्टरकडे, हॉस्पिटलमध्ये जाता येण्याचे स्वातंत्र्य, वाहनं चालवता येण्याचे स्वातंत्र्य, अन्यायाविरोधात पोलिसांकडे जाता येण्याचे आणि कधी वाटलेच तर एखाद्या भिकारचोटाच्या थोबाडीत मारता यावे ह्याबाबत स्वातंत्र्य व जे इथे नमूद करणे राहून गेले असतील असे अतिशय महत्वाचे वाटणारे स्वातंत्र्यविषय हे स्त्रियांना एखाद्या मंदिरात प्रवेश करता येण्याबाबतच्या स्वातंत्र्यापेक्षा अतीमहत्वाची आहेत.
वर नमूद केल्या गेलेल्या कोणत्याही स्वातंत्र्यावर जर का कुणी आच आणण्याचा प्रयत्न केला तर बायका पेटून निघतील आणि मग राडे होतील हे निश्चित.



प्रार्थना करण्याच्या ज्या कोणत्या जागेत स्त्रियांना प्रवेश करायला बंदी आहे अश्यांच्या पायरीला स्त्रियांनीच काय पुरषांनीही पाय लावण्याची काय गरज आहे? आपला देव आपल्या मनात असेल तर प्रार्थनेसाठी कोणत्याही मंदिराचीही गरज कश्यासाठी भासावी स्त्रियांना? असल्या सडक्या विचारांचा विरोध करणं म्हणजेही त्यांना अंशमात्र किंमत देण्यासारखे होईल. स्त्रियांना तिथे जाण्यासाठी मज्जाव असणं हे चूक असले तरीही असे नियम करणार्यांपुढे देवानेही हार मानलेली आहे, हे लक्षात येतय का? ह्यावर चिडून देव आलेलाच नाहीये मंदिरांच्या भिंती तोडून फोडून बाहेर. ह्या सर्व अनिष्ट, अयोग्य, अतिरेकी, मूर्ख गोष्टींना ओलांडून काळ ज्या गतीने पुढे जातो आहे, त्यासोबत प्रवाही होण्यासाठी स्त्रियांनी प्रयत्न केला पाहिजे. जिथे आपल्याला प्रवेश नाही तो आपल्या वाटेतला न कधी अडथळ होता न असेल ह्याची जाणीव झाली तर फुटकळ गोष्टीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडा करण्यात वाया जाणारा वेळ निश्चित सत्कारणी लावता येईल. प्रवेशबंदी करणार्या अश्या जागांना आपणच वाळीत टाकले आहे असे समजावे खुशाल. आपल्याला कधीच गरज नसते कुठे जायला नी कुठे यायला कुणाच्या परवानगीची आवश्यकता.

Comments

  1. Combination of very sensible and some immature thoughts. Freedom of feeling and expressing own thoughts. That counts. Once you agree to it, there is no need to confront anything.

    ReplyDelete
  2. होतय की सावकाश का होईना. आणी काही बाबतीतले स्वातंत्र्य आम्हाला पण का नाही म्हणुनच फक्त आग्रह आआहे.यातील बर्याच बाबी नंतर तुम्हालाच नको असतील

    ReplyDelete

Post a Comment