कम्फर्टेबल निरसता


परस्परांचे कपडे, साड्या, वस्तू वापरणं हे अगदी सर्रास अनेक ठिकाणी होतं. मी पहिल्यापासून एकटी रहात असल्याने कोण्या बहिणीची आईची आत्या मावशी मैत्रिणी कुणाचीही कधी एकही वस्तू मी वापरल्याचं स्मरत नाही. माझ्या वस्तू अनेकींनी घेतल्या वापरल्या पण मला कुणाची वस्तु वापरणे जमतच नाही. कुणाची पर्स, घड्याळ, चप्पल, रूमाल, अंतर्वस्त्र, गॉगल.. नाही होत मला. मला कीळसच येते जणू काही. कीळस नाही तरी उमम नक्को असं होतं.
माझ्या एका मैत्रिणीला अश्या वस्तु कपडे वापरण्याचा खूपच सोस. तिच्याकडे पैशाची कश्याची काही कमतरता नाही. पण मुंबईतल्या लोकांचे सामानच भारी असा काहीसा पगडा तिच्या मनावर होता. तिला मी मुंबईहून अनेक नवे कपडे घेऊन जात असे. पण तिला माझेच कपडे घालून पाहण्यात भारी रस होता. माझे टॉप्स अजूनही एक दोन मैत्रिणींनी वापरले आहेत. पण त्यांना ते देण्यात मला काहीच वावगे वाटले नाही कारण त्या अगदी घट्ट मैत्रिणी शिवाय असे कपडे त्यांनी कधी वारंवारही मागितलेले नाहीत. मागितले असते तर मी ते दिलेच असते.
मध्यंतरी माझ्या एका बहिणीकडे गेले होते. तिने तिचे खूप सुंदर स्कर्ट्स मला दाखवले. मला एका कार्यक्रमासाठी जायचे होते आणि मी कधी स्कर्ट फार घातले नाही. तिचा एक स्कर्ट तिने मला ट्राय करून पहा असे सांगितले आणि तो फारच छान बसला. तेव्हा मला आग्रहाने तिने तो स्कर्ट दिला आणि हवा तितका वापर आणि परत नाही दिलास तरीही चालेल पण कार्यक्रमात नक्की घाल असे म्हणाली. मी तो घेऊन आले पण लगेच दुसर्या दिवशी वेस्टसाईटला जाऊन आले आणि काही वनपीस पाहिले. एक दोन घेतले आणि त्या ताईने जसा स्कर्ट दिला होता तसाच काळ्या रंगाचा एक स्कर्टही मला मिळाला. पण मी काकूबाईसारखी त्या कार्यक्रमाला पंजाबी ड्रेसच घालून गेले. 😂😂 कधी सवय नाही तर उगाच पहिला प्रयोग कार्यक्रमाच्या वेळी नको असे झाले. झाले झाले झाले तो ताईने दिलेला आणि मी नवा विकत आणलेला असे दोन्ही स्कर्ट घरातच. 😃
आमच्या इमारतीत एक राजू म्हणून दादा रहायचा. हो, मला अगदी आठवतं. त्याच्याच तोंडून ऐकलं आहे हे वाक्य.. नाचता येईना ढुंगण वाकडे. उगाच आगाऊपणा करून स्कर्ट वगैरे घालून आपण जाऊ आणि तिथे धडपडून पडू स्टेजवर ह्याचा मला एकदम आत्मविश्वास होता. तेव्हा ते राजूदादाचे वाक्यही सारखे आठवले आणि स्कर्ट घालण्याचा मनसुबा मी रद्द केला होता.
पूर्वी मला कपडे ढुंडाळण्याचा सोसही खूप होता. त्यात मजाच मजा होती. हिंदमाता, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड मी किती तरी फिरत असे. एखाद्या ठिकाणी नाही आवडलं तर रीक्षा करा आणि दुसरीकडे जा पण शॉपिंग केल्याशिवाय परतायचे नाही. मग मॉल्स बोकाळले. कपड्यांचे ऑप्शनही चिक्कार आले. पण हळूहळू गर्दीत फिरणं, इथे तिथे कपडे पाहणं, चपला कपडे ह्यांच्यासाठी भटकणं हा अतिशय आवडीचा उद्योग कमीच व्हायला लागला. आता मला गर्दी आवाज ह्यानेही थकवा येतो. गर्दीत शॉपिंगसाठी फिरण्याच्या कल्पनेनेच मला गुदमरायला होतं. नको ते सेल आणि नको ती गर्दी. कपड्यांच्या बाबतीत मी अगदीच साधी झाले आहे आणि वाट्टेल ते घालते. मॅचिंग, त्यात चवी परी ह्याबाबत मी निरस झाले आहे हे माझ्या पूर्वीच्या मैत्रिणींना झेपणारच नाही पण असे झाले आहे खरे.
असच काहीतरी एक विचित्र आहे अजून कपड्यांच्याबाबत. मला न आवडणार्या लोकांनी दिलेले कपडे साड्या मी नाही घालू शकत. अगदी महागाच्या मला दिलेल्या विविध प्रांतांच्या साड्याही मी मोलकरणीला देऊन टाकल्या आहेत. का तर त्या ज्यांनी दिल्या ती माणसं मला आवडत नाहीत म्हणून. हे अगदीच विचित्र आहे असे वाटेल. माणसं आवडली नाही तर त्याचा राग वस्तुंवर का.. पण आहे हे असे आहे.
एका बाईने मला लग्नात आसामी साडी दिली होती. अतिशय सुंदर होती. पण तिच्यावर माझा खासा राग होता म्हणून मी ती साडी सासरी डबे भांडी विकणार्या एका स्त्रीला अशीच देऊन टाकली आणि त्याबदल्यात एक चमचासुद्धा तिच्याकडून घेतला नाही. अश्या किमान पाच ते दहा हजार रूपये किंमत असलेल्या साड्या मी अश्याच फुंकून टाकल्या. मी स्वत: तीन हजाराहून अधिक जास्त किंमतीची साडी कधी विकत घेतली नाही. मोजून चार ते पाच साड्याच स्वत:साठी विकत घेतल्या आहेत. मला खरेदीचा खूप शौक आहे. पण तो हवा तसा पुरवता येत नाही आणि जेव्हा पुरवता येतो तेव्हा मला हल्ली त्यावर वारेमाप खर्च करणे नकोसे वाटते. तेच पैसे जमवून प्रवासाला वापरावे आणि मोजक्या दोनचार ट्रॅक पॅण्ट, टीशर्ट, शूज घेऊन फिरावे असेच वाटते.
आपण सजत नटत नाही, काहीच विकत घेत नाही म्हणजे अगदी वाढदिवसाला ठोकून दोन ड्रेस तरी घेणार्या सर्वसामान्य स्त्रीसारखीही आपण आपली हौस पुरवत नाही ह्याचेही हल्ली काहीच वाटेनासे झाले आहे.
खरेदीतला आनंद आपण हरवला आहे आणि तो पुन्हा मिळवायला हवाय गं.. आनंद असतो त्यात, असे वाटते आणि हिरमुसायला होते. मग हेही वाटतं कश्याला... आहे ते बरं आहे. वस्तु जमवत नाहीस तेच बरं कुठे डोक्यावर घेऊन जाणार आहेस का..

Comments

  1. asach zalay maza, tu nagarchi ka, amrut kirana javal rahaychi ka? chehra thaavto baki nahi kahi athavt pan tuzya eka sis cha chehra khup aathvto.

    ReplyDelete

Post a Comment