तू असा कसा असा कसा ‘वेगळा’



‘सोशल मीडियावरील पुरषांचा मला आलेला अनुभव हा विषय लिहायला सांगण्यामागची भूमिका काय आहे हे मी
समजू शकते. कारण पुरषांचे वर्चस्व असलेला हा समाज आहे तर... त्यात रहायचय की नै बायांना ! मग कश्या
काय बरं त्या निभावत असतील व्यक्त होताना अश्या पुरूषप्रधान समाजात? सोशल मीडियावर व्यक्त
होणार्या स्त्रियांसमोर आजघडीलाही आव्हान असावी ही दुर्दैवी पण न नाकारता येणारी बाब आहे. पण पुरूषही
मोकळेपणी व्यक्त होतात का? खरोखर पुरषांच्या ह्या जगात व्यक्त होणं इतकं कठीण आहे की हा एक
बबल निर्माण करण्यात आलेला आहे, हे मला ह्या निमित्ताने आता पाहता येईल. ह्याचा इतका विचार आजवर
कधी केला नव्हता कारण व्यक्त होताना मी कधी कोणतीच भीडभाड ठेवली नाही.
माझ्या फेसबुक भिंतीवर लिखाण आणि फोटो ह्यांचे प्रमाण खूप जास्त असून दुसर्याने लिहलेले किंवा
माहितीपूर्ण पोस्ट शेअर करणे हा प्रकार क्वचितच. तिथे माझा स्वत:चा मालमसाला जास्त असल्याने लोकांची
गर्दी हळूहळू वाढायला लागली. अगदी ट्रॅफिक जॅम व्हावे असा प्रकार इनबॉक्समध्ये व्हायला लागला. बहुतकरून
प्रशंसा करणारे संदेशच इनबॉक्समध्ये जास्त असत. माझ्याविषयी प्रेम वाटते हे सांगणार्या पुरषांचे प्रमाण
आधी चिक्कार होते. सहसा लेखकाला असं कुणी सांगतं का.. बरं हे प्रेम कोणत्या प्रकारचं? तर ते प्रेम नक्की
लिखाणासाठी होतं की फक्त व्हर्च्युअल जगातील माझ्या वावराबाबत निर्माण झालेले आकर्षण आहे ह्या
प्रश्नांचा मी विचार केला नाही. असे मेसेज करणार्यांबद्दल मला कधी राग आला नाही.
मनातल्या भावना व्यक्त करताना कोणत्याही पुरषाला भीती न वाटणं हे स्क्रीनशॉट्स पडण्याच्या
जमान्यातली खूप मोठी गोष्ट असावी. जरा कुणी प्रेमाने किंवा आपुलकीने काही लिहलं की त्याबद्दल
तिरमिरून त्याचे स्क्रीनशॉट्स लगोलग टाकणार्या बायांमधली मी नाही. मी असल्या गोष्टींचा बाऊ करणार नाही
ह्याची त्यांना खात्री असावी. अगदी मी विवाहीत आहे, मूलबाळ आहे सारे नीट चाललेले असून मी ३७ वर्षांची
सणसणीत मोठी बाई आहे असे पोस्ट टाकूनही, असे असले तरी मला तू आवडतेस आणि तुझे लग्न झाले
नसते तर मी तुला प्रपोज केलेच असते, मला तुझ्यासारखीच बायको हवी होती, अश्या स्वरूपाचे संदेश अनेक
आले. पण इतके झाल्यावर ते पुरूष पुढे अजून कोणताही वाह्यातपणा करायला गेले नाहीत वा त्यांनी अन्य
कोणत्याही स्वरूपातील त्रास मला दिला नाही. जसजशी दोन वर्षांवरून वर्षं अजून पुढे गेली तसा इनबॉक्सातील
पुरषांचा ओघ सहाजिक आटला.
अगदी प्रेम वगैरे नाही पण माझ्याशी येनकेणप्रकारेण मैत्री ठेवता यावी ह्यासाठी पहिल्या दोन वर्षांत अगदी
जॉब असल्यासारखं रोज इनबॉक्सात मेसेज करण्यात खाडा न करणारेही चिक्कार पुरूष. हे मी जरा वाढवून
चढवून सांगते आहे असे कुणाला वाटत असल्यास त्याला ईलाज नाही. मी शेवटी वैतागून फ्रेंड रीक्वेस्ट
पाठवण्यासाठी असलेला पर्याय बंद करून फक्त फॉलो ऑप्शन खुला ठेवला. घरातही जे सकाळ संध्याकाळ

कुटुंबियांना गुड मॉर्निंग गुडनाईट म्हणत नसावेत असे सगळे मिशीवाले माझ्या इनबॉक्सात चंद्राची
गुडनाईटवाली रोम्यांटिक चारोळी लिहलेली स्टीकर्स नित्यनेमाने पाठवायला लागल्यावर मला त्यांना झापावं
लागलं. जपून जपून जारे पुढे धोका आहे टाईपातल्या पोस्टी अनेकदा टाकल्यावर काही पुरषांची डोकी
ठिकाणावर आली. मध्ये एकदा ब्लॉक मारलेल्या लोकांची जवळपास अडीचएक हजार नावांची यादीच फेसबुकवर
देऊन टाकली. ह्या महामायेला फार गृहीत धरता येणार नाही, हे एव्हाना लक्षात आले असल्याने इनबॉक्सात
गूळ गाळण्याचे प्रकार कमी व्हायला लागले.
माझ्याबाबतील अश्लील घाण मेसेज करणे, मला त्रास देणे, विचित्र विकृत प्रकार करणे असले प्रकार
कुठल्याही पुरषाने कधीच केले नाहीत. त्यांना तुझी भीती वाटत असेल, असे काहीजण म्हणतात. माहीत नाही.
कदाचित असं झाल्यावर मी गप्प बसणारी नाही आणि फेसबुकवर त्यांची शब्दांमधून पूजा बांधेन ह्यावर
विश्वास असावा. माझ्या वॉलवर व्यक्त होण्यासाठी धीर करण्यापासूनही काहींची सुरवात आहे.. म्हणजे अश्या
‘बोल्ड’ लिखाणाखाली आम्ही कमेंट केल्या तर माझी बायको काय म्हणेल माझी आई काय म्हणेल माझी
गर्लफ्रेंड चिडेल का... मला बाकीचे पुरूष समाज काय म्हणतील, अश्या विचारांमध्येच बुडून अर्धमेले झालेले
अनेक पुरूष आहेत. अश्या अडचणी फक्त बायकांच्याच नसतात तर पुरूषही बिनधास्त लिहायला घाबरतात हे
फार गंमतीदार आहे.
ज्यावर आपल्याला लिहताना बुजायला होतं ते लिखाण म्हणजे बोल्ड असा समज सोशल मीडियावर
पसरवण्यात काही उल्लू दे पठ्ठे अगदी यशस्वी झालेले आहेत. लिखाण वाचून एक बोल्ड टाईप विषय लिहून दे
आपण त्यावर चित्रपट करू असे मेसेज करणारे घंटासिंगही कमी नाहीत. बोल्ड लिहून दे म्हणजे काय...?
म्हणजे एक बाई सगळ्या समाजाविरोधात, सिस्टीमविरोधात, अन्यायाविरोधात पेटून कशी लढा देते वगैरे वगैरे.
भडक विषय.. अश्या अपेक्षा. कंटाळावाणं आहे हे माझ्यासाठी. फेसबुकवरचं लिखाण वाचून अश्या मागण्या
करणार्या पुरष दिग्दर्शकांपासून मी लांब पळाले.
इनबॉक्समध्ये एक ठरावीक अंतर राखत संवाद साधणार्या पुरषांशी चांगले जमले. त्यांना डोकं होतं असं मी
म्हणेन. ही इथे लिहते आणि अधेमधे हिच्याशी बोललं तर ही बोलेले का हे आधी जोखणारे. मी बोलले तर
माफक बोलून टाटा बाय बाय करून जाणारे, कायम शिस्तीत वागणारे आणि कुठेही तोल ढळू न देणारे असेही
अनेक. इनबॉक्समध्ये आय लव यूचे मेसेज करणार्या बायकांचं प्रमाण हे पुरषांपेक्षा प्रचंड जास्त होतं हे सांगूनही
विश्वास बसणार नाही. बरं पुरषांचं एक बरय... तू मला उत्तर का देत नाही, माझ्याशी का बोलत नाही, माझ्या
कमेंट्सना लाईक लव्ह का देत नाही, मला वेळ का देत नाही अशी बायकांसारखी रॅ रॅ ते करत नाहीत. ते
कोणतीही गोष्ट विनाकारण उगाच गांभिर्याने घेत नाहीत.. चिवडत बसत नाहीत, हा मला त्यांचा आवडणारा
ऑसमेस्ट गुण आहे. पुरूष हे बायकांपेक्षा कूल असतात. बोलली तर बोलली नाहीतर दुर्लक्ष करून कोलली असा
त्यांचा साधा हिशोब. जो मला भावतो. त्यामुळे बायकांपेक्षा अनेकदा पुरषांसोबत जास्त मोकळेपणा वाटतो.

इथे माझ्या लिखाणावरून टिंगल टवाळी करणारे, त्यावरून घाण लिहणारे, माझ्या लिखाणातील शीर्षकांचा गाळ
करून ते माझ्याबद्दलच आहे असं सूचक लिहणारे गचाळ पुरूषही भेटले. त्यांच्यात माझं नाव घेऊन काही
चिखल उडवण्याची हिंमत नव्हती. मी अजिबात भाव न दिल्याने दुखावलेले असे हे बिचारे कीवपात्र पुरूषही इथे
दिसले. त्यांच्यासाठी लिखाण हे महत्वाचं नव्हतं. तर मनात येईल ते थेट लिहणार्या ह्या बाईला मोडायचं कसं
हात मुख्य उद्देश होता ज्यात ते सपशेल गंडले. असं करणार्या बायकाही पैशाला पासरी भेटल्या. असूयाग्रस्त,
कॉपी करणारे, उलट्या बोंबा मारणारे चोर प्रकार पुरूष आणि बायका दोघांमध्ये समसमान पाहिले आणि ह्या
सर्व पालापाचोळ्याला पायाखाली तुडवत लांब निघून जात मजा म्हणूनही पाहू शकले.
फोटोंखाली किंवा पोस्टखाली.. हे सेक्सी आहे, हे सुंदर आहे.. हे जीवघेणं आहे टाईपातल्या कमेंटस ह्या
सेक्सिस्ट स्वरूपातल्या आहेत असं समजलं जातं. होतं काय की एखाद्या बाईच्या फोटोखाली अशी कमेंट
करण्यापूर्वी पुरूष शंभरवेळा विचार करतोच कारण त्याला लगेच वुमनायझर समजण्याचा बावळट प्रकार
व्यायलाय. पण माझ्या भिंतीवर केवळ पुरूषच नाही तर स्त्रियाही एकेक असल्या इरसालपणा करतात की इथे
सगळा बिनधास्त मामला होऊन जातो. असं का.. कारण मी लगेच इतक्या तितक्याश्या गोष्टींचा बाऊ करत
नाही. सेक्सी हा शब्द वापरल्याने आपला कोणताही विनयभंग होत नसतो. हे एखाद्या बाईने म्हटले तर चालते
पण पुरषाने त्याच्या भावना व्यक्त केल्या तर तो लगेच घाण असेल असे काही माझे बुरसट समज
नसल्याचे वाचकांना माहीत असल्यानं ते कदाचित बिनधास्त व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य घेत असावेत. बरं
एकदा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हक्क मिळाला की त्यास धरून येणार्या मर्यादांचं भान असेलेले पुरूष सुदैवाने
माझ्या भिंतीवर येतात.
शहरी असतील वा ग्रामीण भागातील असतील; फालतूगिरी करणारे हे कोणत्याही भागातून, समाजातून, धर्मातून
आलेले असतात. अतिशय घाण कमेंट करणारे आणि झाडले की कमेंट डीलीट करून ब्लॉक मारत पळून जाणारे
फेक किंवा खरे अकाऊंट असणारे पुरूष जितके आहेत त्याहून जास्त रिकामटेकड्या ढोंगी नाव मोठे पण लक्षण
खोटे बायका सोशल मिडियावर चिकार आहेत. त्यांना दोन हात दाखवले की आपल्याबद्दल गरळ ओकत त्या
त्यांचे बाहेरचे सडके ३२ आणि त्यांच्या आतले किडूक ३२ दात दाखवतात. पुरूष त्यामानाने सोडून देतात. तेच
तेच दळण दळण्याचा त्यांचा स्वभाव जरा कमी असतो. ‘ मला पहा फुले वहा’ टाईपातल्या इथल्या अनेक
मान्यवर स्त्रिया मारे कितीही फेमिनिस्ट असण्याचा आव आणत असल्या तरीही जुने हिसाबकिताब पुरे
करण्यासाठी त्या गलिच्छ लिहणार्या पुरषांच्या डोक्यावर तेल थापत थंडा रख, असं सांगताना दिसलेल्या आहेत.
ही बाई पुरषांविरोधातच लिहते किंवा ही जहाल फेमिनिस्ट, फेमिनाझी फेक फेमिनिस्ट आहे वगैरेही ओकार्या
काढणारे आंबट पुरूष आणि त्यांच्या दुपटीने बायका इथे दिसल्या. पण वाचकांमधल्या स्त्री पुरषांनी त्यांच्याकडे
दुर्लक्ष केले. लोकांना वाचायला ताजा कटेंट लागतो व त्यांना असल्या भांडणात, आरोपांमध्ये कमी रस असतो
त्यामुळे माझ्याविरोधात जरी काहीजणांनी आगपाखड केली असली तरी त्या काळात सोशल मीडियावर मला
अजिबात पडू न देता माझ्यासोबत ठामपणे जश्या स्त्रिया उभ्या राहिल्या तसे पुरूषही उभे राहिलेले आहेत. हो

मात्र ही साथ निभावत असता काहींना सगळ्यांसमोर कसे व्यक्त व्हावे हे दडपण होते व ते पुरषांमध्ये जास्त
होते हे सांगतानाही गंमत वाटते. बाईला पाठिंबा दिला तर बाकी समाज काय म्हणेल तो पाठ दाखवेल का..
की काही अमंगळ चर्चा ह्यानिमित्ताने होतील अशी ती भीती होती. ह्याचा अनुभवही काही पुरषांना सणकून
आला. केवळ मैत्री आहे म्हणून माझे नाव त्यांच्यासोबत जोडून अतिशय गलिच्छ भाषेत कॅरॅक्टर असॅसिनेशन
करण्याचे हिणकस प्रकारही काही पुरषांनी गटबाजी करून केले. त्यांना मी उडवून लावल्याने चवळताळलेल्या
त्यांनी माझे लिखाण कसे घाण आहे हे वारंवार लोकांसमोर घाण भाषा वापरतच मांडायला सुरूवात केली आणि
नंतर त्या पुरषापुरूषांमध्येच भांडणे लागली. ते सारे पाहणे फार मनोरंजक होते. ही एक स्त्री लैंगिक विषयांवर
सतत लिहते असे आरोप करत असताना ते सर्व पुरूष स्वत: स्त्री शरीराच्या चौकटीबाहेर कधी पडू शकलेले
नाहीत व त्याव्यतिरिक्त त्यांना अन्य काही लिहता येत नाही हे दिसू लागले.
लिखाणासोबत फोटो टाकले नसते तर कोण वळले असते ह्या लिखाणाकडे इथपर्यंत टोमणे हाणणार्या बायकांचे
प्रमाण पुरषांपेक्षा जास्त होते आहे. अनेक पुरूष आधी पोस्टखाली व्यक्त होत असत ते नंतर दिसेनासे झाले
तश्याच अनेक स्त्री वाचकही आधी सतत चकरा मारायच्या त्या निघून गेल्या. ह्यात कंटाळा येणे किंवा
आपल्याला कमी महत्व दिले जाते, किती सांगितले तरी ही काही भेटत नाही वगैरे अश्या मिश्र बालिश भावना
असाव्यात. पुरषांमध्ये राहून लिहताना मनाजोगे लिहता न येण्याचे आव्हान माझ्यासमोर कधीच नव्हते त्यामुळे
लिहिलेल्या काही विषयांबाबत अनेक पुरषांना अचंबा वाटला खरा. इतका की; एक स्त्री असून तेही भारतात
असून तुम्ही हे असले लिखाण करूच कसे शकता... तुम्ही स्त्री नाहीच.. फेक आयडी काढून लिहणारे तुम्ही एक
पुरूषच आहात. हिंमत असेल तर तुमचे आधारकार्ड दाखवा, अश्या मागण्या करणारे महामूर्ख शिरोमणी भेटले.
हे असले लिखाण म्हणजे काय...? बाईच्या जगात घडणार्या गोष्टी मोकळेपणी लिहणार्या बायका जगभरात
आहेत. पण ते काहीच माहीत नसलेले अनाडी असे प्रश्न विचारणारच.
‘तुमच्या पोस्टी चोरल्या तर त्याचा इतका भोंगा कश्यापायी वाजवताय.. त्यात कोणतं इतकं दैदीप्यमान
उत्कृष्ट साहित्य गेलं तुमचं की त्याची चोरी झाल्यावर अशी बोंबाबोंब करायला हवीये... माझे आईबाबा तर
बिनधास्त फेसबुकवरचे उत्तम साहित्य कॉपी पेस्ट करतात आणि ते सगळ्यांना व्हॉट्स अप करून करून बोअर
करतात’, असं सांगणारी डोक्यावर सपशेल आपटलेली डॉक्टरीण बाई व तिच्या ह्या कमेंटवर दात काढणारे दोन
चार बाद उच्चशिक्षित अडाणी पुरूष बाया इथेच फेसबुकवरील एका सीक्रेट ग्रूपमध्ये दिसल्या. बरं अश्या
साहित्य चोरीबाबत चर्चा सुरू असताना वेळ नाही अशी सबब सांगत गप्प बसणारे व एरव्ही ग्रूपबाहेर वेळात
वेळ काढून ह्याच्यात्याच्या पोस्टवर टवाळक्या करणारे बनेल लेखकही तिथे पाहिले. बाई काय आणि पुरूष
काय... सोशल मिडीयावर घाणीचे प्रकार सगळ्यांमध्ये पाहिले आणि तसेच निर्मळ माणसेही अनेक दिसली.
माझी बायको मला आवडते पण गर्लफ्रेंडही आवडते मी काय करू? किंवा तिचं लग्नं झालय. पण तिला
माझ्याकडे परतायचं आहे. तिला नवर्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे मी काय करू? तुम्ही माझ्याशी बोलला
नाहीत तर मला काय करायचे ते सुचणार नाही मी अगदी अस्वस्थ झालोय एकदा तर माझ्याशी बोला... असं

सांगणारे पुरूष. अहो मी काय इथे समुपदेशनाची कन्सल्टन्सी चालवते का, असं सणसणीत म्हणावं वाटतं. पण
मग का येतात हे माझ्याशी बोलायला? त्यांना माझ्या लेखनातून त्यांचे आयुष्य कुठे तरी मांडले जाते आहे,
त्यांचेच अनुभव मी लिहते आहे, त्यांच्या मनातलं मी बोलते आहे असं वाटत असतं. असं अनेकजणं सांगतात.
स्त्री आणि पुरूषही... ते का खोटं असेल.. की ते फक्त तोंडपुजेपणा करण्यासाठी असेल? मला नाही तसं वाटत.
सारखं असं वागायला कुणाला वेळ असतो? मला जमलं तर मी बोलते. थोडक्यात माझं मत सांगते. पण पुरूष
माझ्याशी त्यांच्या आयुष्यातलं अगदी जपून ठेवलेलं गुपित स्त्रियांसारखेच सांगून एका झटक्यात मोकळे होऊ
शकतात ह्याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, चढउताराचे क्षण, सेक्स लाईफ, कुणावर प्रेम
आहे, कुणी दगा दिला.. विषयाला बंधन नाही.. बिनधास्त बोलतात. हो.. पुरषालाही सगळीकडे बिनधास्त व्यक्त
होता येत नाही.. तोही अडकलेला घुसमटलेला असतो. माझ्या सोशल मिडीयावरील लिखाणात त्यांना कुठेतरी
हवी तशी मैत्रीण सापडत असावी.
कधी कुणी भेटायला बोलावतं. कुणी फोन नंबर मागतं. मला ह्याचा नाही त्रास होत. सगळ्यांना वेळ देणं शक्य
नसतं. ते मी स्वच्छ सांगते. काहीजणं समजून घेतात. काही ह्याचा राग मानून आपल्या भिंतीवर धूर काढत
बसतात.
लास्ट बट नॉट द लिस्ट पंखाखाली घेत गॉडमदर होण्याचा प्रकार स्त्रियांमध्ये जास्त दिसतो. पुरूष काळजीने
चार पाच वेळा सूचना करतात नंतर विषय सोडून देतात. त्यांना काळजी असते पण ते अती पझेसिव्ह होत
सोशल मिडियावरील स्त्री लेखकांना चोक अप करण्याचा यत्न अजिबात करत नाहीत, हे माझे निरीक्षण आहे.
बरं ज्या काही सूचना सल्ले ते देतात त्याचा वारंवार सगळ्यांसमोर उल्लेख करण्याची घाणेरडी सवयही पुरषांना
नसते. उगाच जुलाब लागल्यासारखे इनबॉक्सात लव्हचे बदाम देत सुटणं आणि नंतर पादर्याफुसण्या
कारणांवरून भांडत बसणे हे पुरषांकडे नसते. निदान सोशल मीडियावर लिहणार्या स्त्रिया आणि आपली प्रेयसी
वा बायको ह्यांच्यातला फरक कळण्याइतपत ते निश्चितच सूज्ञ आहेत हे खरे.
..
( पुरूष स्पंदन २०१८ दिवाळी अंकात प्रकाशित. )

Comments