ब्रेकअप सुंदर असतो

पाऊस कोसळताना दिसतो तेव्हा मनात झालेली पडझड दुरूस्त होते आणि पुन्हा भिंती उभ्या राहतात. आपल्यासाठीच ह्या पावसाला पाठवलेलं आहे. धुंवाधार लगातार पावसाच्या झडझडीची गरज होती मनाला देहाला. प्रियकराच्या आठवणीतलं साठवणीचं पाणी इथे तिथे घुटमळत दुसर्या वाहत्या पाण्यांसोबत मिसळून पाहता पाहता वाहून जायला लागलं. त्या स्मृतींच्या धूळीत उमटलेल्या त्याच्या पावलांची आता छोटी तळी झाली आहेत. पाऊस कणाकणात घुसतोय.
भरल्या पावसात स्वतःसोबत असणं हळूहळू जास्त सुखाचं वाटतय.
आपण एकटं असताना आपल्यासोबत काय करायचं असतं? उणिवांचं, रिक्त जागांचं, कोरड्या जगण्याचं काय करायचं असतं? ह्या नको वाटणाऱ्या आणि टाळताच न येणाऱ्या डबक्यात साचून राहिलेल्या प्रश्नांची थेट उत्तरं न देताही पाऊस रिकाम्या संध्याछायेच्या उदास पखाली भरून टाकतोय. पाऊन धोधावत येतो आणि प्रश्नं, उत्तरं सगळं धुऊन टाकतोय.
फाजील मनाला प्रियकराच्या आठवणीची सर धडकून गेलीच तरी चेहर्यावर काठोकाठ सुख दिसतं आता. गाडीच्या काचेवर साचलेल्या कचर्याला साफ करणारे वायपर्स डोळ्याला लागलेत जणू. पुढची गारेगार निवांत हिरवं वळणं स्वच्छ दिसत आहेत.
त्याची सवयीची डूब नजर, त्याचे जाड मऊ हात, त्याची रेशमी ऊब, त्याचा सूक्ष्म गरम श्वास ह्या गजबजलेल्या पावसात आता तितका त्रास देत नाही इतका पााऊस ऑक्युपाईड ठेवतोय. थेंबांकडे खुळ्यासारखं पाहण्यातली रमलता झुळझुळत्या प्रसन्न क्षणांची आठवण करून देतय आता फक्त.





धुतलेल्या स्वच्छ रस्त्यांवर सांडलेल्या चांदण्यात संथ गतीने चालणार्या चार पायांची साथ आणि धाप लागलेले श्वास ऐकू येतात क्वचित, पण ते पावसाची लज्जत वाढवतात. उपभोगलं आपण प्रेम, मग फार काहीच कठीण करून न घेता वेगळे झालो. आयुष्यात मळभ आल्यावर झोप लागेपर्यंत रडलो. डोळे सुजले, तोंड सुजलं, उपाशी राहिलो, शून्यात गेलो आणि ह्या पावसात वाटतय की शून्यात जाणं होतं ते शून्यापासून सुरूवात होते नव्याने म्हणून बहुदा.

जिथून वेगळे झालो ते ठिकाण ती शेवटची भेट पावसामुळे घमघमणार्या हवेत बसून खिडकीबाहेर पाहताना आठवावी वाटत नाही इतकी शुल्लक ठरतेय. आपण जगण्याच्या रोलरकोस्टमध्ये कायम धास्तावलेले असतो आणि एकसारखे गचके बसून वाकड्यातिकड्या दगडासारखे झाले असताना पावसाच्या ओल्याओल्या वासाने ते सारं ओबडधोबड कायच्या काय सुंदर दिसायला लागलय. निरूत्साह झटकून ओली मान झडझडून टाकत पुन्हा आपल्याच रूपाच्या प्रेमात पडायला लागलोय. सोडून जाताना त्यानं मागे ठेवलेल्या स्वातंत्र्याच्या अंगलगड भावनेचं रोज बदलतं रंगरूप नव्याने अनुभवायला येतय.
मस्त वाटतय ब्रेकअपनंतरही हे पावसालाच सांगता येतय. तो होता तेव्हाही छान होतं सगळं आणि तो नसतानाही सगळं छान आहे हे मान्य करता येतय. तरंगायची एक हल्लक तलप असीम आहे आणि ती केवळ एका माणसावर अवलंबून नाही. ते तरंग विविध कारणांमुळं, विविध वेळी जेव्हाही उमटतील थांबून पहावे वाटू लागले. मग ते तरंग पावसांच्या थेंबांमुळे आलेले असतो वा त्याने जाताना टाकून दिलेल्या सूईदार खड्यामुळे असोत आता ते पहायला वेळ आहे फुरसत आहे. हे तो नसताना कळतय. पावसामुळे कळतय वळतय. प्रियकराचं सोबत नसणंही सुंदर असतं. वेळच वेळ मिळतो. पावसासाठी. स्वत:साठी. बंधनं नाहीत, अपेक्षा नाहीत, हरकती नाहीत. अशी बंधनं हवीहवीशी वाटतात हे त्या बंधनात असतानाच वाटायचं. त्या कड्यांची कुलुपं पावसाचा हात धरला कशी काय उघडतात रे..
पावसाला मातीवर पुन्हा पुन्हा प्रेम करता येतं. तो फक्त जमिनीच्या एकाच तुकड्यावर बरसत नाही. जिथे सरी रिमझिमतात तिथे गारवा फुलतो हिरवळ डोलते. तू सुद्धा अशीच बरसत रहा, मस्त रहा, वाहती रहा असं तो सांगतो. ऐकणार का मी ?
ऐकेन पण दोन चार ओळी लिहून मग मी त्याच्याबद्दल बोलायची थांबेन..




हुनहुन्या पावसात तो भिजत असेल का ?
की, छत्री मिटून ओलेत्या रस्त्यावरून कोरडामोरडा चालत असेल ?
हिरव्या गवताचा पेप्सीकोला चघळत पडला असेल का ?
की, ओठांना लागलेल्या गरम चटक्यांच्या ऊबेत शेकत बसला असेल ?
पावसाळी काव्य एका नखाने खरडत खोडत बसला असेल का ?
की, कागदाच्या घडीवर डोक्याला मिटून शांत बसला असेल ?
शांत असावं त्याने. पावसाला ऐकावं त्याने
जसं मी विसरतेय तसं मलाही विसरावं त्याने.

Comments

Post a Comment