जांने दे जांने दे

मी गेल्यावर गाणगापूर आणि गोंदवल्याला एक एक हजार पाठव. काकांचं पालुपद चालूच असतं. काकू गेल्यावर मला ते कार्य बिर्य करायला लावून उगाच खर्च करायला लावला त्यांनी. मला ह्या गोष्टी पटतात त्यांना पटत नाहीत. बॉटमलाईन. त्यांची बायको त्यांची इच्छा. मी चूपचाप केलं सगळं. पण माझी इच्छा म्हणून तिच्यासाठी मी आसाम पूरगस्तांच्या मदतीसाठी मला शक्य ती मदत पाठवली. प्रत्येकाचे फंडे वेगवेगळे असतात मान्य पण आपण सणवार, खरेद्या, देवदेवतार्जन ह्यांसाठी पैसेच नाही पैसेच नाहीत म्हणता म्हणता बर्यापैकी उधळत असतो. एक वेळेस सिनेमाला गेलं की तिकीट, समोसे, कोक, पॉपकॉर्न धरून हजार रूपये जातातच. हौसमौज करतो. पण दुसर्यांसाठी काही करावं म्हणून ह्या सगळ्याला काही महिने काट देऊन त्यातले छाटलेले पैसे ज्याला भयंकर गरज असते तिथे पाठवता येतील का ह्यासाठी विचार करताना मात्र... काही जण कश्यासाठी बरीच मदत मिळते अश्यांना, वायासुद्धा जातं, नीट पोहचत तरी असेल का अश्या शंका उपस्थित करतात. तोही ज्याचा त्याचा चॉईस. बरं जे मदत करतात त्यांनी सांगितलं तर बघा बघा कशी जाहिरातबाजी करतात, असही म्हणायला धोधावून पुढे येणारे असतात. जे मदत करत असतात आणि त्याबद्दल सांगतात ते खरच मदत करतात आणि त्यामुळे अजून चार जण मदत करायला पुढे येत असतील तर त्यात काय बिघडलं.. हाही ज्याचा त्याचा फंडाच आहे की. त्यावर टीका कायको? 🙁
काकांना मी सांगितलेलं आहे की त्यांच्या पश्चात मी कार्य वगरे करणार नाहीये. काकू गेल्यानंतर नातेवाईक किती पहायला आले, कोण किती वेळ दिला हे पाहून ते वारंवार कष्टी होत असतात. तेव्हा तेही म्हणाले, मी गेल्यावर काही करू नकोस. आता बास झालं. तू तुला हवं तसच वाग. पण मुळचा त्यांचा पिंड अध्यात्मिक असल्यामुळे आणि आपण असं काही बोललो हे लक्षातच रहात नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा देवळांना मी देणगी द्यावी असं अधेमधे बोलत राहतात. आपण जे कमावतो ते फक्त आपल्यासाठी नसतं आपण कुणाला तरी देणं लागतो हे मी लहान असल्यापासून त्यांच्याकडून अनेकदा ऐकलेलं आहे. तसं वागतानाही पाहिलं. देवाबिवासाठी मात्र त्यांनी जे काही खर्च केले ते मला कधी पटलेच नाहीत. पण त्यासाठी मी त्यांना छेडलं नाही. कारण ते माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत त्यामुळे त्या वयातल्या माणसाला काही समजवायला जाऊ नये हे मला क्लीयर आहे.
..

कपाटात, बॅगेत, माळ्यावर वर्षानुवर्षे पडून राहिल्या आपल्या सासूच्या आईच्या जपलेल्या, दुर्लक्षित, कधी तरी घालू म्हणून पडून राहिलेल्या साड्या, न होणारे ब्लाउझ, ड्रेस, आपल्या लहान मुलांची जपलेली दुपटी, त्यांचे चांगल्या अवस्थेतले कपडे, फ्रॉक, टी शर्ट, बॉक्समध्ये भरलेली जुनी आठवण म्हणून ठेवलेली आजेसासूची, आजीची कुणाकुणाची भांडी, मुंबईत कधीही न लागणारे आणि भेट म्हणून आलेले खितपत पडलेले स्वेटर्स, शाली, बेडशीट, टॉवेल, पंचे, शर्ट, पॅन्ट ह्या सगळ्यांचा जीव घरात तसाही घुसमट असतो. वस्तू वापरात असली तर त्या वस्तुतही जीव असतो. ज्यांना गरज आहे अश्या लोकांसाठी आपण ते देऊन टाकलं तर अत्ता खरा उपयोग आहे.
मी गेली अनेक वर्षे साड्या घातल्याचा नाहीत आणि उत्साहात येडपटासारख्या मागच्या काही वर्षांत ज्या क्वचित प्रदर्शनात इथे तिथे खरेदी करून बॅगेत भरून त्या वरच्या कपाटात वर्षानुवर्षे बंद करून ठेवल्या आहेत. लग्नात नेसलेली व नंतरच्या आलेल्या घेतलेल्या अश्या एकूण दहा बाराच साड्या असतील. मी आजवर फक्त मोजून तीन साड्या विकत घेतल्या. त्यातली एकच नेसली. बाकीच्यांना फोल पिको लाऊन नेसू नेसू करत बॅगेत ज्या ठेवल्या त्यांना सूर्यप्रकाशच कधी मिळाला नाही. अश्या कितीतरी साड्या, कपडे मी स्लिपिंग ब्युटी अवस्थेतून जाणीवपूर्वक प्रयत्नाने बाहेर काढल्या आहेत पण तरीही बाईचं मन असल्यामुळे लुताळेपणा कसा तो कमी व्हायचा हो? तरीही एक दोन बॅगेच आहेतच स्लिपिंग ब्युटी घड्यांमध्ये पडलेल्या. त्या साड्यांचे पडदे करू, उश्यांना खोळी शिवू मग असे प्लॅन चालू होतात. बायका अशक्य असतात. ब्लाऊज तर एकही बसत नाही पण उत्तम स्थितीत आहेत. घातलेच नाहीत कधी. हौसेने शिवले आणि आळसाने बाजूला पडले. मुलाच्या लहानपणीची आठवण म्हणून बरीच दुपटी आहेत. मी स्वतः त्याला फ्रिल लावून शिवून घेतलीत. इतकी जास्त दुपटी शिवली की मुलाचा जन्म झाल्यावर फक्त तीन दुपटी पुष्कळ होतात हे आई झाल्यावरच समजले.
पण हे सगळं खरच मला गरजेचं आहे का?
नाही. जगण्यासाठी आणि तगून राहण्यासाठी ह्याची अनेकांना गरज आहे. आपण असं सामान दिल आणि ते खरोखर गरजवंत लहान मूल, म्हातारी माणसं, स्त्रिया ह्यांच्यापर्यंत पोहोचलं तर हळूहळू त्यांना उभं रहायला मदत होईल.
काकू गेल्यावर बाबा गेल्यावर मी त्यांच्या घरातलं एकूण एक सामान डोनेट केलं. काकूच्या साड्या दिल्याच पण दोन चार जरीकाठाच्या वगळल्या मला आठवण म्हणून. ह्यातली एक साडी माझ्या लग्नात तिने नेसली. बाकीच्या दोन तिने कैकदा नेसल्या सणावारांमध्ये. सुंदर दिसायची ती अश्या साड्यांमध्ये. पण हे सर्व साचवून ठेवण्यात काही फायदा नाही यार... ह्या जरीच्या साडीला कवटाळून बसण्यापेक्षा तिला मुक्त केल्यानेच जास्त समाधान मिळेल मला कळलय.
अगदी लगेच नाही पण पुढचे काही दिवस असं चांगल्या अवस्थेतलं सामान मी गोळा करणार आहे. नवीनही घेईनच. काकांना जे देवळांना पैसे पाठवायचे होते ते त्यांचे व त्यात माझी भर घालून थोडे थोडे जमतील तसे पाठवता येतीलच. माणूस गेल्यावर त्याच्यासाठी काही करण्यात आणि त्यांच्या वस्तु जमवून ठेवणं हे व्यर्थ. माणूस जिवंत असताना त्यांच्यासाठी काही करता आलं तर अर्थ.
काकूच्या ह्या साड्या देणार आहे. लांबच्या अनामिक काकूसाठी. तिच्यापर्यंत पोहोचलं की माझ्या काकूलाच मिळाल्यासारखं आहे. आयुष्यभर कणकण जमवलेलं सांभाळलेलं उभं केलेलं राखलेलं तिचं घर वाहून गेलं असेल. ती नेसेल. एका क्षणात घर उद्वस्त होणं आणि सगळं शून्यावर येणं त्यात स्वत:ला पाहणं आणि त्यातून मान वर करून वर येण्याचा प्रयत्न करणं अत्यंत कठीण असतं.
नवर्याला विचारलं.. काय करू देऊन टाकते हे सगळं काय वाटतं तुला. तो म्हणाला, तुला जे वाटेल ते कर. नवर्याचं हे एक बरं आहे. तो शंभरातल्या ९९.९९ टक्के गोष्टींना होकार देत असतो. 

Comments

  1. Tedx var javalpas asach arthacha ek video ahe. Sathvun thevnyachi mansachi naisargic vrutti aste. Pan tyamule ahe te ayushya ani ahe ti vel jagnyanach rahun jata....Mansane anand udyavar taku naye.

    ReplyDelete

Post a Comment