रसिकतेचा शोऑफ

चित्रप्रदर्शनात चित्रांसमोर उभे राहून सेल्फी काढण्याची खाज दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. 

अनेकदा पाहते माणसं चित्रप्रदर्शन, शिल्पप्रदर्शन पहायला जातात. चित्रांच्या शिल्पांच्या, इंस्टॉलेशन आर्टच्या समोर उभं राहून कधीकधी गॅलरीतली भिंतीवर मांडलेली कला ( चित्र, म्युरल, शिल्प जे काही असतं ते ) अक्षरश: झाकून त्यासमोर उभं राहून स्वत:चा फोटो काढतात आणि ते लोकांना दाखवत सुटतात. काय पहायचं काय आम्ही... तुम्हांला पहायचं की तुमच्या मागून डोकावणार्या केविलवाण्या चित्राकडे पहायचं? विचित्र नाही वाटत का हे? तुम्ही टाका की स्वत:चे वेगळे फोटो शंभर झेलतो ते आम्ही सतत. झेलू हो. पण कुण्या कलाकाराची कला पहायला पहा आम्ही कसे आलोय हे दाखवण्यासाठी त्या निर्मितीला पार झाकून वा त्या चित्राच्या गळ्यात गळे टाकून उभं रहात फोटो घेण्याची इच्छा होतेच कशी? हा त्या कलाकाराचा त्याच्या निर्मितीचा अपमान आहे, असं वाटत नाही का?
हे खूप हास्यास्पद आणि लज्जास्पद वाटते असे अनेकजण म्हणतात. अश्या वर्तनाने आपल्याला कलाप्रदर्शनला येणे हा निव्वळ टाईमपास वाटतो का, असा प्रश्न पडतो. मग ताजमहालासमोर आपला फोटो काढला तर ताजमहालाचा अपमान होतो का, अशी वाद घालण्याची इच्छा होत असल्यास प्लीज त्यावर व्यक्त होऊ नये. दालनांत लावलेली चित्र आणि ताजमहालाच्या आकारात मोठा फरक आहे. तुम्ही ताजमहालाच्यासमोर उभे राहिल्याने ताजमहालाला झाट फरक पडत नसतो. पण दालनांत चित्रांचे प्रदर्शन करण्याचा हेतू वेगळा असतो. चित्रकारांना आपले काम मांडायचे असते, विक्री व्हावी हा हेतू असतो, ओळख बनवायची असते वगरे. हा डोक्याबाहेरचा विषय आहे असं वाटत असल्यास सोडून द्या.  
भोपाळला चित्रकार वासुदेव गायतोंडेंचे पेंटिंग पाहिले तेव्हा त्याचा फोटो काढून नवर्याला जळवण्यासाठी पाठवला होता. त्या पेंटिंगशेजारी उभं राहून स्वत:चा फोटो काढण्याची हिंमतच काय तसा विचारही मनात आला नाही. कसा येईल? त्या चित्रासमोर माझे अस्तित्व शून्याइतकेही उरलेले नव्हते. आपली लायकीच नाही तेवढी, हे मला कळतं. जी कला पाहून तुम्ही भारावून जात नाही त्याचे कौतुक करण्यासाठी मग फोटो काढायची तरी गरज काय असते? जर भारावून जाणं होत असेल तर फक्त ती कलाकृतीच लोकांना दाखवणं महत्वाचं वाटत असेल ना. आपण कसे विविध कलाविषयांत रस राखून आहोत हे दाखवण्यासाठी चसका म्हणून चित्रकारांची प्रदर्शनं अटेंड करणं आणि त्याचा शोऑफ करणं एका मर्यादेनंतर केविलवाणं वाटू लागतं. चित्रकारासोबत फोटो काढणं, लेखकासोबत फोटो काढणं हे वेगळं पण त्यामिनित्ताने स्वत:चे कौतुकसोहळे चालवणं बालिश वाटतं.
दुसर्याला महत्व शोऑफ करण्यासाठी नाही तर जेन्युईनली त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याबद्दल काही वाटतं म्हणून द्यावं. त्या व्यक्त होण्यात जेव्हा समोरची व्यक्ती तिचे काम राहिले बाजुला तुम्हीच दिसू लागता, मी मी मी असं दिसायला लागतं तेव्हा कुणाच्या कामाप्रती असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल पाहणारे साशंक होतात. 
तसच लेखक कवी ओळखीचा आहे मित्र आहे म्हणून तो वा ती आपल्याला फुकट पुस्तक देईलच ही अपेक्षा ठेवणं. त्यांनी स्वत:हून प्रत आपल्यानावे पाठवली आपल्याहाती दिली तर गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या ओळखीच्या लेखकाचे कवीचे पुस्तक हवे असल्यास आपण ते विकत घेतले पाहिजे. बाकी फालतु ठिकाणी हवे तसे पैसे खर्च करतो आपण छानछोकीसाठी पण एखाद्याच्या लिखाणासाठी त्याने घेतलेल्या कष्टासाठी दोन तिनशे पाचशे काय शंभर रूपये मोजायलाही जिवावर येतं? का बुवा? पुण्यात एका लेखकमित्राची काही पुस्तकं विकत घेतली. तो म्हणाला मी दिले असते तुला ह्यातले पुस्तक. दोन तीनशे रूपये खर्च झाले असतील माझे. तो मला भेटण्याआधी मी दुकानात गेले होते. मला पुस्तकं हवीच होती त्याची. तो भेटेल मग मला पुस्तक फुकट मिळेल मग मी ते वाचेन कश्यासाठी.. मान असतो तो लेखकाचा. ते पुस्तक वाचण्यासाठी आपण अधीर असणं व ते आपण हून घेणं.. हे वेगळं आहे ना ! त्या दुकानात अजून एकदोन मित्रांची पुस्तकं होती. ती बरीच आधी आलेली आहेत व ती बाकीच्या मित्रमैत्रिणींकडे असावीत. तीसुद्धा घ्यायची इच्छा होती पण बिल आधीच बरेच झाले होते त्यामुळे मोह टाळला. ती मी मित्रांकडून मिळवून वाचेन. ती पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांनी पैसे खर्च केलेच असतील त्यामुळे ते त्यांच्याकडून घेऊन मी वाचणं ही फुकटची प्रोसेस आहे असं मला पूर्णपणे वाटत नाही त्यामुळे मी तसे करीन. त्यात आळस केला आणि पुस्तकाच्या दुकानात गेल्यास ती विकतही घेईन. आपण विकत घेतो म्हणजे त्या कलेला योग्य तो मान देतो असं मला वाटतं. कदाचित माझं चुकतही असेल माहीत नाही. 

Comments

Post a Comment