कोरोना काळा



दिवाळीनंतर ऑर्डर मंदावल्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात थोड्या ऑर्डर येऊ लागल्या. पैसे गुंतवले. माल आणला. लगेच लॉकडाऊन घोषित झाला. माल पडून. नेणार कोण घेणार कोण. इनकम बंद. तरीही उद्या हातात आलेल्या मालापासून प्रोडक्ट बनवणार आणि ज्यूट बॅग भरून ठेवणार. त्याकडे बघत बसायचं. डोळ्यात नक्कीच पाणी येईल. हे सगळं वाया जाईल का? ह्या विचारानेही ओठांवर विचित्र हसू असेल. कदाचित. वाट पाहण्याची आणि आशा बाळगण्याची मुभा निदान अत्ता फुकट आहे. ज्यांच्या नोकर्या नाहीत आणि रोज काम केले तर पैसे असे हातावरचे पोट आहे ते काय विचार करत असतील? कुठून काहीच आर्थिक सेक्युरिटी नसलेल्यांवर माझ्यावर अचानक ओढावलेल्या आर्थिक बेकारीने जे फिलींग आलय त्याच्या हजारपट बेकारीने दिलेलं बेक्कार फिलींग असेल. कसं वाटतं असं झाल्यावर ते लक्षात येतय. दिवस वाईट आहेत. हेही दिवस जातील म्हणताना खूप शक्ती एकवटावी लागेल.माझ्या ह्या बिझनेसमुळे मी माझ्या वयस्क काकांची काळजी घेऊ शकत असे. त्यांना पेन्शन आहे पण त्यांच्यासाठी चोवीस तास मदतनीस ठेवलेले आहेत गेली पाच वर्षे. ते काढता येत नाहीत. पेन्शनचे पैसे येणार्या मदतनीसांचे रोजचे पगार द्यायलाही पुरत नाहीत. प्रचंड प्रमाणात डायपर्स लागतात. किलो किलो कापूस रोल लागतो. हॅण्डग्लोव्हज लागतात. औषधं, साफसफाई सगळं मिळून किती हजारात जातं त्याचा आकडा इथे न सांगितलेला बरा. हे डायपर्स खूप महाग असतात. त्यांना आधी चार तर आता दिवसाला सात आठ कधी त्याहून जास्त लागतात. दहाचा एक पॅक असतो. एक पॅक पावणे चारशे कुठे पाचशेचा येतो.  मला हे सर्व परवडत नाही पण मी नेटाने चालवते. ह्यावर काही डीस्काऊंट नसतं. ह्यात काही कमी करता येत नाही. तरी मी हे सर्व करू शकते ते माझ्या कामाच्या जोरावर. ह्या कामाने मला खूप मदत केली आहे. आता अचानक बंद आलाय सगळ्यावर. कधीकधी डायपर्सची टंचाई होते. जर आमचा एरिया सील झाला तर काकांसाठी येणारे हेल्पर्स येणंही अशक्य होईल. ते रात्रभर झोपत नाहीत दिवसाही नाही. पाच पाच मिनिटांनी हाक मारत राहतात. हे सर्व पाहून घर पाहणं, कबीरला वेळ देता न येणं, पुढे काय होईल ही भीती असते. हेल्पर्सना आणायला सोडायला नवर्याला रोज सकाळी बाहेर लांबवर गाडीने जावच लागतं. खूप भीती वाटते. पण हसण्याखेळण्याचं बळकट असण्याचं अवसान आणावं लागतं. हेच ते... तरी मी हे करू शकते. ज्यांची आर्थिक स्थिती अगदीच ढासळलेली आहे त्यांच्याही घरी वयस्क असतील. त्यांच्यासाठी काही गोष्टी आणाव्याच लागत असतील किंवा आता कदाचित त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हा पर्याय काहींनी निवडला असेल. वास्तव खूप भयानक असतं. अनेकांना ते बोलून दाखवता येत नाही व्यक्त होता येत नाही. जी मुभा मला आहे पण जे ह्या सोशल मिडियाच्या पटलावर कुठेच नाहीत त्यांची अश्या ह्या काळात काय दैना उडाली असेल? आमच्या घरी कामाला येणार्या कविताचे सासरे आमच्या काकांसारखेच बिचारे अंथरूणास खिळून. त्यांना डायपर मिळतच नाही. ना कुणी त्यांना साफ करत. ही कामावरून परत गेली की त्यांना साफ करते. ती जाईपर्यंत ते रागाने सर्व भिंती घाणीने हाताने सारवून ठेवतात, असं ती म्हणते. आता त्या लोकांना इतका कंटाळा आलाय की त्यांना नाशिकला ते कुठेतरी ठेऊन आले. मरेपर्यंत तिथेच रहायचं. त्यासाठी तिचा दीर पैसे देऊन आला. एका घरात अकरा माणसं त्यात अशी वयस्क असतील तर ते काळजीचा सगळ्यात शेवटचा विषय ठरतात. लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच त्यांनी त्या वयस्क काकांवर गिव्हअप केले होते. रस्त्यावरून चालणार्या कित्येक माणसांना मी पाहिले सगळे पाहतात. त्यांच्यात अंथरूणाला खिळलेले वयस्क स्त्री पुरूष कुठे आहेत? नसतील का असे जे अत्यंत दैन्यावस्थेतील कुटुंबाचा भाग असतील..? कुठे सोडले असेल त्यांना की नसतातच गरीबांकडे बेडरीडन वयस्क? माझे वडील आणि काकू हे सर्व पाहण्याआधी वेळेत गेले त्याचे मला आता दुर्दैवाने म्हणते पण बरेच वाटते. खूप क्रूर वाटतं सगळं जेव्हा फक्त कर्तव्यभावना उरते. काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या नवर्याची मावशी अशीच बेडरीडन आहे. वृद्धाश्रमात होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिला घरी घेऊन जा असा फोन आला. कोणत्याही हॉस्पिटलने ठेऊन घेण्यास नकार दिला. आता ती एका हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे मैत्रिणीच्या नवर्याला दिवसातून तीनवेळा जाऊन जेवण द्यावं लागतं. काका रोज म्हणतात मला हॉस्पिटलमध्ये ठेव. त्यांचा विश्वासच बसत नाहीये बाहेर जी स्थिती आहे त्यावर कारण हे असं त्यांनी त्यांच्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात पाहिले नाही. मी शांतपणे सांगते, नाही ठेवता येणार. आता जे काही होईल ते इथेच. खरं तर डॉक्टरांनी खूप आधीच त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन उपयोग नाही हे सांगितलेले आहे. पण काकांचे समाधान होत नाही. शारीरिक आरोग्यासोबत ह्या इमोशनल टर्मोईलला तोंड देणं, यातना सतत समोर पाहणं, यातनांत मृत्यू हे सर्व मी गेली दहा वर्षे पहात आले आहे. त्यात हे कोरोना आल्यामुळे आता ह्याहून अधिक वाईट ते काय.. असाच प्रश्न पडतो आणि कश्याचेच काही वाटेनासे झालेले आहे. त्यामुळे रोज थोडं हसायचं, चहाटळपणा करायचा आला दिवस गेला करायचा हेच महत्वाचं वाटायला लागलेलं आहे.
ह्या सगळ्यात सिगरेटही परवडत नाहीये. कश्याला हवी ती नकोच परवडायला हे म्हणणं सोपं आहे. योग्यही. पण इतके वर्षं जेव्हा विविध गोष्टींनी लागलेली असते तेव्हा ही भेटल्यापासून लागते आताशा. म्हणून लागते हे काही कारण असू शकत नाही आणि होय, असतही.
उद्यापासून उटणं शिकेकाई तयार करण्याची तयारी करणार आणि काम संपवणार. मैत्रीण जान्हवी म्हणाली तसं हा फक्त जगण्याचा भाग नाही पण त्यात आनंद आहे म्हणून. हे वाचून सेकंदभर बरं वाटलं. काम संपवून करून कसं वाटले ह्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. 

Comments