रंगीत सॅण्डविच

रंगीत सॅण्डविच
( ह्यात आठ सॅण्डविच तयार होतील. चार माणसांसाठी )
..
साहित्य - मैद्याचा स्लाऊस ब्रेड, अमुल बटर, चीझची वीट किंवा स्लाईस पॅक, मीठ, एक लहान चमचा साखर, चार पाच मिरी, सात आठ बारीक लसणी, आलं, दोन लहान मिरच्या, चार पाच कडिपत्त्याची पाने, पाच सहा पुदिन्याची कापलेली पाने, अर्धी लहान वाटी बारीक कापलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, लाल - पिवळ्या - हिरव्या सिमला मिरचीचे ( कॅप्सिकम ) लहान चौकोनी तुकडे प्रत्येकी अर्धी वाटी, एका मध्यम कांद्याचे चौकोनी लहान तुकडे, उकडलेल्या दोन मध्यम लहान बटाट्याचे चौकोनी तुकडे, उकडलेले मक्याचे दाणे एक वाटी.

कृती - कुकरमध्ये बटाटे दोन शिट्ट्या काढून पाच मिनिटं गॅस बारीक करून शिजवून सोलून कापून ठेवले. पातेल्यात पाणी व मीठ घालून त्यात मक्याचे दाणे फडफडीत पंधरा वीस मिनिटं शिजवले व गाळून घेतले. सिमला मिरच्या सुरीने अर्ध्या कापून सगळ्याचे तुकडे केले बाकीची सिमला मिरची ठेऊन दिली. कांदा कापला. मिरची कापली. चॉपरच्या गोल यंत्रात हे काहीच कापलं नाही कारण ते तुटलय. :P शिवाय त्यात हे जिन्नस बारीक केले तर त्याचा रस सुटतो आणि सॅण्डविच गिचगिचीत होईल. त्यामुळे सुरी चालवण्यावाचून पर्याय नाही. मक्याचे दाणे कापले नाहीत बरं ! हे सर्व घटक कापलेले, काही अख्खे अर्धवट शिजवणार असल्याने सॅण्डविचमध्ये ना कच्चे लागतात ना भुगाळ लागतात. मस्त दाताखाली येतात वितळलेल्या चिझच्या मिठीत. त्यामुळे दाताखाली चावताना भारी वाटतं.
हिरव्या मिरचीचे तुकडे, काळी मिरी, आल्याचं पेर, लसूण, कडिपत्त्याची पानं, असं सगळं खलबत्त्यात खलून घेत एकजीव करून घेतलं. लसणी लहान असल्यानं त्या सहा सात घेतल्या. पाकळ्या मोठ्या असल्यास तीनच पुरतील.
कढईत तेल तापत ठेवले. एक दीड चमचा.
तेल तापल्यावर गॅस बंद केला. त्यात खलबत्त्यातील ऐवज घालून जरा चमच्याने सारखे केले. खाली चिकटू नये म्हणून गॅस बंद केला. मग त्यावर कांद्याचे तुकडे घातले. साखर घातली. मग ते ढवळून गॅस पुन्हा सुरू केला. आता त्यात बटाटे, मक्याचे शिजलेले दाणे, सिमला मिरची टाकली. मीठ टाकले. कांदा लालगुलाबी करायला आपण भाजी करत नाहीयोत हे लक्षात ठेवावं. झाकण न लावताच गॅस जरा तेज करून वाफ येईपर्यंत परतत राहिले. मग त्यात कापलेली पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालून लिंबुरस वरून टाकला व सर्व ढवळून गॅस बंद करून झाकण ठेवले. वाफेवर सर्व शांत मुरू दिले दहा मिनिटे. मक्याचे दाणे कुकरमध्येच बटाट्यांसोबत का नाही वाफवले. तर ते बसतात. मोकळ्या भांड्यात उकळत्या पाण्यात माफक शिजतात आणि टरटरीत फुगतात. ज्युसी लागतात जास्त.
ब्रेडच्या आतल्या बाजुंना आधी बटरचा हलका हात लावला. त्यात चमच्याने कढईतले मिश्रण दोन चमचे भरले. आलं किसायच्या किसणीने चीझची वीट वरून किसून मिश्रणावर चीझ सेट केले. त्यावर बटर लावलेला दुसरा ब्रेड दाबला. पुन्हा वरच्या बाजुने तयार सॅण्डविचवर बटरचा हलका स्प्रेड लावला असे सर्व तयार करून घेतले. तव्यावर उचटण्याने दाबत दाबत सॅण्डविच सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतले. बटरवर भाजलेल्या ब्रेडचा मादक गंद घरभर पसरला आणि भुका पेटल्या. सॅण्डविच मधून तिरके कापून सर्व्ह केले. सोबत सॉस चटणी काही घेतले नाही.
तिखट चवीसाठी ह्यात फक्त चार पाच मिरे, लसूण आणि आले घातले. जास्तीचे चिली फ्लेक्स चाट मसाला असे काही घातले नाही. तसे घातले की हे जिन्नस कमी करावेत म्हणजे चव फारच उग्र होत नाही; पण आंबट खारट तिखट गोड चव चीझ बटर ब्रेड व मिश्रणासह एकजीवत मिळून येते. एखादी चव फार वर आली की त्रासल्यासारखं होतं. म्हणून लवंगही टाळली. एखाद्या वेळेस फक्त लवंग आणि लसणीचा स्वाद घेता येईल. मिरची पूर्णपणे टाळता येईल. असे प्रयोग करून पहायचे. आयतं बटर नी चीझमध्ये तळून नी भाजुन मिळालं तर ब्रेडमध्ये कागदाचा लगदासुद्धा चविष्ट लागेल त्यात काहीच शंका नाहीये.
असा ब्रेकफास्ट दिला आणि पाच मिनिटांनी पुदिना आलं घालून केलेला चहा दिला. नवरा म्हणाला अतिशय सुरेख झाले आहे.. चार वेळा म्हणाला. म्हणजे जमलच असेल. 

Comments